उरण : तालुक्यातील प्रमुख मार्ग असलेल्या उरण-पनवेल या राज्य महामार्गाचे सिडकोच्या माध्यमातून रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती सिडकोकडून देण्यात आली आहे. उरणमधील वाढत्या नागरी व औद्याोगिकीकरणामुळे लोकसंख्या आणि वाहनांतही अनेक पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील अपघातांतही वाढ झाली आहे. त्यामुळे जुना नवघर फाटा ते उरणच्या कोटनाका दरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी करण्यात आली होती. यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने काही महिन्यांपूर्वीच नवघर फाटा ते बोकडवीरा पोलीस चौकी असा चार ते साडेचार किलोमीटर लांबीचा मार्ग सिडकोच्या ताब्यात दिला आहे. त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.

मात्र बोकडवीरा पोलीस चौकी ते उरण शहरातील कोटनाकापर्यंतच्या एक ते दीड किलोमीटरच्या मार्गाचे काय होणार, या मार्गाचेही रुंदीकरण होणार का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी बोकडवीरा पोलीस चौकी ते कोटनाका दरम्यानच्या रस्त्यालगतची अनधिकृत दुकाने, व्यवसाय यांच्यावर सिडकोच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाने कारवाई केली होती. त्यामुळे हा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे संपूर्ण मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा : बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा

कांदळवनांचा अडथळा येणार का ?

उरण-पनवेल मार्गावर बोकडवीरा येथील वायू विद्याुत केंद्र कामगार वसाहत ते फुंडे महाविद्यालयपर्यंतच्या मार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात कांदळवनांचे वृक्ष आहेत. त्यामुळे रस्तारुंदीकरणात अडथळा निर्माण होण्याची शंका व्यक्त केली जात आहे.