पनवेल : महाड येथील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात जुलै महिन्यात ८८ कोटी रुपयांच्या अमलीपदार्थाचा साठा रायगड पोलिसांनी जप्त केला होता. या प्रकरणाला महिना उलटला आहे. परंतू रायगड पोलिसांनी या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्याचा संकल्प केला आहे. यासाठी महाड येथील ‘रोहीत केमिकल कंपनी’मध्ये अंमली पदार्थ बनविण्यात आले. ते अमली पदार्थ बनविण्यासाठी लागणारे रसायने कोणकोणत्या कंपन्यांनी पुरवली याचा कसून शोध रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक ऑंचल दलाल यांचे पथक घेत आहेत. आतापर्यंत रायगड पोलिसांनी महाड औद्योगिक क्षेत्रातील १४ कारखान्यांना याबाबतची माहिती मागवली आहे. या माहितीमध्ये त्या कारखान्यांनी गेल्या अनेक वर्षात उत्पादनासाठी वापरलेली रसायनांचा साठा आणि त्यांनी उत्पादित केलेल्या मालाची माहिती मागविली आहे.

पोलिसांच्या नोटीस मुळे उद्योजकांचे धाबे दणाणले आहे. शनिवारी पनवेल येथील लघु उद्योजकांसोबत जिल्हाधिकारी यांचा सुसंवादाचा कार्यक्रम फडके नाट्यगृहात पार पडला. याच कार्यक्रमात रायगड पोलीस अधीक्षक दलाल यांनी त्यांची या प्रकरणातील आतापर्यंतची माहिती उद्योजकांसमोर मांडून या प्रकरणातील तपासाला सहाकार्य कऱण्याचे आवाहन केले. 

पोलीस अधीक्षक दलाल यांच्या पथकाने केलेल्या तपासात आतापर्यंत मोठे यश या प्रकरणाला आले आहे. या प्रकरणात चार आरोपी अटक केल्यानंतर राजस्थान येथून आरोपी अटक केले आहे. याच प्रकरणाशी मध्यप्रदेश येथील एका प्रयोगशाळेचा (लॅब) संबंध समोर आला आहे. या लॅबमध्ये महाड औद्योगिक क्षेत्रातून कच्चा माल या लॅबसाठी पुरविला जात असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे महाड औद्योगिक क्षेत्राचा समावेश अमली पदार्थ बनविणा-यांच्या यादीत राज्य व देशात होत असल्याने ही चिंतेची बाब उद्योग सुसंवादामध्ये पोलीस अधीक्षक दलाल यांनी बोलून दाखवली.

महाड औद्योगिक क्षेत्रातील ई.२६-३ या भूखंडावर रोहीत केमिकल कंपनीमध्ये २३ जुलै रोजी पोलिसांनी धाड मारून ३४ किलो किटामाईन पावडर आणि १३ किलो लिक्वीड किटामाईन जप्त केले होते. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली होती. कायदेशीर उत्पादनाच्या नावाखाली अमली पदार्थ बनविण्यासाठी या कंपनीचा वापर केल्यामुळे या काळ्याधंद्यात अनेक लहान कारखानदार सुद्धा जाणते व अजाणतेपणाने रोहीत केमिकल कंपनीच्या सामिल असल्याचा पोलिसांचा संशय आहे. रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक ऑंचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली याप्रकरणी सखोल तपास सुरू आहे. शनिवारच्या उद्योग सुसंवाद बैठकीत उद्योजकांच्या विविध समस्या समजावून घेताना महाड एमआयडीसी क्षेत्रातील उद्योजकांच्या संघटनेचे अध्यक्ष अशोक तलाठी यांनी महाडमधील १४ कारखानदारांना १५ ऑगस्टला नोटीस आल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्यांमुळे चार वर्षांची माहिती द्यायला तयार आहेत. मात्र चार अजून आठ दिवसांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली. यावर पोलीस अधीक्षक दलाल यांनी असे करता येणार नाही असे स्पष्ट करताना हे पूर्ण प्रकरण उपस्थित सर्व उद्योजकांना समजावून सांगीतले. 

महाड येथील रोहीत कंपनीमध्ये यापूर्वी सुद्धा २०१५, २०१८ आणि २०२० या सालांमध्ये अशाप्रकारे अमली पदार्थ बनविल्यामुळे त्यांच्यावर डीआरआय आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली होती. रोहीत कंपनीत एमडी बनवत होते. हे बनविण्यासाठी इतर कारखाने वापरत असलेली टोलीन व ब्रोमीन यासारखे रसायन लागतात. रोहत कंपनीला नेमके कोणी ही रसायने पुरवली याचा शोध घेत असताना अनेक कंपन्यांची संशयीत नावे पुढे आली. या कंपन्या ३० ते ३५ वर्षांपासून येथे काम करत आहेत. मात्र या कारखानदारांकडे सुद्धा कोणताच कायदेशीर परवाना नसल्याचे सुद्धा समोर आले. अशा कारखान्यांना एमपीसीबी आणि औद्योगिक सूरक्षा विभाग आणि इतर महत्वाच्या परवाना नसताना अनेक कारखाने महाड येथे अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे तपासात समोर आले. अमली पदार्थसारख्या निर्बंध असलेल्या उत्पादनाची निर्मितीची जबाबदारी कंपनीमालकांची सुद्धा आहे. मात्र लघुउद्योजक या प्रकरणात जाणते व अजानतेपणाने सहभाग दिसत असल्याने यापूर्वी सुद्धा संबंधित कंपन्यांना स्थानिक पोलिसांनी तोंडी सांगीतल्यावर त्यांनी माहिती न दिल्याने त्यांना १५ ऑगस्टला नोटीस बजावली. संशयीत गुन्हेगाराला न्यायालय १४ दिवसांच्या वर पोलीस कोठडी सूनावत नसल्याने या कारखान्यांनी लवकरात लवकर त्यांची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक दलाल यांनी केले.