रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीमुळे कंटेनरच्या रांगा
नवी मुंबई : जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची संख्या वाढल्याने आम्रमार्गावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. किल्ले गावठाण चौक तसेच त्यामागील रेल्वे उड्डाणपुलावरील दुरुस्तीचे काम सुरू असल्याने शुक्रवारी या मागार्वर वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या.
महापालिका मुख्यालयासमोरील उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच उरणच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एक तेलवाहतुकीचा टँकर बंद पडला होता. त्यामुळे शुक्रवारी दुपारी उरण फाटय़ाच्या दिशेने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक उड्डाणपुलाखालून वळवण्यात आली होती. किल्ले गावठाण चौकात मागील दोन वर्षांंपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे नेहमी या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्यात हलकी वाहने उलटय़ा मार्गाने जात असल्याने यात भर पडत आहे. बेलापूर खिंडीत उड्डाणपूल बांधूनही वाहतूक कोंडीची समस्या सुटली नाही. आम्रमार्गाच्या दोन्ही बाजूला मोठय़ा प्रमाणात रहिवासी वस्ती आहे. एकीकडे एकता विहार दुसरीकडे भीमाशंकरसह मोठमोठय़ा सोसायटय़ा आहेत.
या मार्गाच्या बाजूलाच नेरुळमधील रायन इंटरनॅशनल स्कूल आहे. तसेच पुढे पालिकेचे व नवी मुंबईकरांचे पर्यटनस्थळ ठरलेले वंडर्स पार्क आहे. पारसिक हिलवरील महापौर निवासाकडे जाण्यासाठीचा चौक आहे. आम्रमार्गालगतच्या परिसरात जाण्यासाठीच्या जोडरस्त्यामुळे छोटी वाहने मुख्य रस्त्यावर येतात. यामुळे अपघात होत असतात.