नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे नवी मुंबईत हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ताज्या आकडेवारीनुसार, रविवारपासून शहरातील हवेची गुणवत्ता पातळी सुधारली आहे. सोमवारीही शहराच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३६ इतका नोंदवला गेला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील हवा सध्या स्वच्छ आणि आरोग्यदायी स्थितीत असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगितले गेले असून, शहरातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून शहरातील हवेचा दर्जा ‘मध्यम’ ते ‘खराब’ श्रेणीत नोंदवला गेला होता. १९ ते २१ ऑक्टोबरदरम्यान शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी १७० ते १९० दरम्यान नोंदवला गेला होता. मात्र, गेल्या तीन दिवसांतील पावसाच्या मालिकेमुळे हवेतील धूलीकणांचे प्रमाण घटले असून, शहरातील हवा पुन्हा स्वच्छ झाली आहे. शुक्रवारपासून शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक अनुक्रमे ५०, ५८, ४० आणि सोमवारी ३६ इतका नोंदवला गेला. जो हवा गुणवत्ता निर्देशांक पातळीतील ‘चांगला’ या श्रेणीत मोडतो.

नवी मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारपासून शहरातील हवेची गुणवत्ता सुधारली असून, पावसासोबतच वातावरणातील बदल याला कारणीभूत आहेत. ही परिस्थिती कायम रहावी म्हणून प्रशासनातर्फेही उपाययोजना केल्या जात असून, फॉगर यंत्रणा, शहर स्वच्छता या सारखे उपक्रम राबविले जात आहेत.

पावसाच्या थेंबांमुळे हवेतील सूक्ष्म धूलीकण जड होऊन खाली बसतात. या प्रक्रियेला ‘वेट डिपॉझिशन’ म्हणतात. त्यामुळे हवा स्वच्छ होते, दृश्यमानता वाढते आणि श्वसनासंबंधी तक्रारींमध्येही घट होते. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील १० दिवस शहरातील वातावरण ‘समाधानकारक’ स्थितीत राहणार आहे. – सतीश पडवळ, प्रादेशिक अधिकारी-वाशी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

हवा गुणवत्ता निर्देशांक (२७ ऑक्टोबर)

महापे : ४५

नेरुळ : ३२

सानपाडा : ३३

कळंबोली सेक्टर-२ई : ३०

तोंडारे-तळोजा : ४०

(केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘समीर’ ॲपच्या माहितीनुसार)