पनवेल- सिडको महामंडळाने विक्री केलेला राे हाऊससाठीचा भूखंड मालक परदेशात कामानिमित्त गेल्यावर परस्पर हडपल्याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून, तीन संशयीत आरोपींपैकी एकजण सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. विशेष म्हणजे, संबंधित रो हाऊसची बनावट कागदपत्रे ज्यावेळी बनविण्यात आली त्यावेळेस संबंधित सेवानिवृत्त पोलीस अधिकारी हे नवी मुंबई पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरिक्षक पदावर कार्यरत होते हा या प्रकरणातील सर्वात मोठा योगायोग आहे.

नवी मुंबई पोलीस दलातील काही पोलीस अत्यंत प्रामाणिक, तर काही पोलीस अधिकाऱ्यांचे प्रताप सेवानिवृत्तीनंतरही पाण्यावर तरंगत उजेडात येत आहेत. कळंबोलीतील रो हाऊस हडप प्रकरण हे त्यापैकी एक आहे. सूरेश पाल या व्यक्तीचा हा सेक्टर १४ येथील भूखंड क्रमांक ए १८ हा भूखंड आहे. सूरेश पाल हे सध्या सौदी अरेबियात कामानिमित्त आहेत. २७ वर्षांपूर्वी संबंधित भूखंड सिडको मंडळाची सर्व प्रक्रिया पार करून पाल यांना मिळाला. त्यानंतर ते परदेशात कामानिमित्त गेले. सूरेश पाल यांचे नातेवाईक हे वर्षा सहा महिन्याला येऊन त्यांच्या जागेची पाहणी करत होते. मात्र, करोनापूर्व काळात व त्यानंतर पाल व त्यांच्या नातेवाईकांचे येणे कमी झाल्याने संबंधित भूखंड हडपण्याचा डाव रचण्यात आल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा – कुठूनही ११२ डायल करा, हवी ती मदत मिळणार …..

सूरेश पाल यांचे नातेवाईक सनतकुमार चौहान यांनी कळंबोली पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, वर्षभरापूर्वी (जानेवारी २०२२) सूरेश पाल आणि सनतकुमार संबंधित भूखंड पाहण्यासाठी गेल्यावर त्यांना त्याजागी इमारतीचे बांधकाम झाल्याचे दिसले. तीन मजली इमारत त्यामध्ये तळमजल्यावर दोन दुकाने अशा या इमारतीच्या प्रवेशव्दारावर रघू पार्वती व्हीला, स्वप्नील अ‍ॅण्ड श्रद्धा, लता अ‍ॅण्ड कोंडीराम पोपेरे असे लिहिल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पाल यांनी जवळच्या सिडको कार्यालयात धाव घेतली. तेथील सिडको अधिकाऱ्यांनी त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनूसार, पाल यांचे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड बनवून खारघर येथे राहणाऱ्या अमित पाठक याने संबंधित भूखंड सुरुवातीला खरेदी केला. त्यानंतर या जागेची विक्री पाठक याने स्वप्नील कोंडीराम पोपेरे याला केली. बनावट कागदपत्राने आणि सिडको अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा सर्व व्यवहार झाल्याचा आरोप करत तक्रारदाराने पोलिसांत अर्ज केला. दोन दिवसांपूर्वी कळंबोली पोलिसांनी याप्रकरणी तोतया सूरेश पाल, अमित पाठक, स्वप्नील पोपेरे व इतर संशयितांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : हापुसची आवक वाढली; दरात घसरण; सोमवारी देवगडच्या ३०० पेट्या दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस ज्या अमित पाठक याचा शोधत आहेत त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात आहे. या प्रकरणात संबंधित भूखंडावर इमारत कोणी बांधली, याचा छडा तपास अधिकाऱ्यांना करावा लागणार आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे कठोर शिस्तीचे आहेत, असे बोलले जाते. मात्र, सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा या प्रकरणात थेट लाभार्थी आहे का, त्याचीच फसवणूक झाली याचाही शोध तपास अधिकाऱ्यांना घ्यावा लागणार आहे. मात्र, संबंधित लाभार्थीला रो हाऊसचे मालकपण सिद्ध करण्यासाठी सिडकोची कागदपत्रे दाखवणे हेच या प्रकरणातील आव्हान असणार आहे.