आमचा जीव सुरक्षित करा!

प्रकल्पात अतिज्वलनशील नाफ्ता तेलाचीही साठवणूक केली जात आहे.

ओएनजीसी प्रकल्पग्रस्तांचे सुरक्षित पुनर्वसनासाठी आंदोलन

उरण : उरणमधील ओएनजीसी प्रकल्पात आगीच्या व तेलगळतीच्या घटना वाढीस लागल्याने प्रकल्पाच्या शेजारी राहणारे नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यामुळे ओएनजीसी व सिडकोने प्रकल्पापासूनच्या ८० मीटर अंतरावर सुरक्षापट्टा तयार करून प्रकल्पाशेजारील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी एका प्रकल्पग्रस्ताने कुटुंबीयांसह उपोषण सुरू केले आहे. ओएनजीसी विस्थापित एकता कमिटीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

उरणमध्ये १९७५ मध्ये ओएनजीसीला सापडलेल्या तेल विहिरीतील कच्च्या तेलावर प्रक्रिया करणाऱ्या एका शुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी नागाव येथे करण्यात आलेली आहे. समुद्रातून अडीचशे किलोमीटर अंतरावर टाकण्यात आलेल्या तेलवाहिन्यांतून हे क्रुड तेल या प्रकल्पात आणले जाते. त्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून त्यामधून तयार होणारे तेल, वायू यांचे वितरण केले जाते.

यामध्ये प्रकल्पात अतिज्वलनशील नाफ्ता तेलाचीही साठवणूक केली जात आहे. या तेलाच्या साठवणूक टाक्यांतून गळती होऊन तेल नागरी वस्तीतून जाणाऱ्या नाल्यातून बाहेर आल्याने आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे काही जणांना प्राणाला मुकावे लागले आहे. सप्टेंबरमध्ये लागलेल्या प्रकल्पातील आगीत चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. या घटनांमुळे नाल्याशेजारीच राहणाऱ्या नागरिकांच्याही जिवाला धोका निर्माण झाला होता. त्याकरिता प्रकल्पापासून ८० मीटर लांबीवर येथील विस्थापितांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करून ‘आमचा जीव सुरक्षित करावा’ अशी मागणी विस्थापितांनी केली आहे. याकरिता मंगळवारी विस्थापित कमलाकर कडू यांनी आपल्या कुटुंबीयांसह उपोषणही सुरू केले आहे. तर अशाच प्रकारचे आंदोलन पुकारणार असल्याचा इशाराही ओएनजीसी विस्थापित एकता कमिटीनेही दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Save life ongc project project sufferers rebuild movement akp

ताज्या बातम्या