केंद्रांबाहेर लांब रांगा; लस न मिळाल्याने अनेक जण माघारी
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या वाढत असून नवी मुंबई महापालिकेने वेगवान लसीकरणासाठी शहरात १०४ लसीकरण केंद्रांचे नियोजन केले असून त्यातील ७४ केंद्र प्रत्यक्षात कार्यरत असताना दुसरीकडे शासनाकडून अत्यल्प लसपुरवठा होत असल्याने मागील काही दिवसांपासून शहरातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर लस घेणाऱ्यांची लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र आहे. रांग लावूनही काही नागरिकांना लस मिळत नसल्याने माघारी जावे लागत आहे.
नवी मुंबई शहरात करोनाची दुसरी लाट ओसरत असताना शहरात पुन्हा करोनाचे आकडे वाढायला लागल्याचे चित्र आहे. दररोजची करोना रुग्णांची संख्या २००च्या दिशेने जात असल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण असून नागरिक लस घेण्यासाठी केंद्रावर जात आहेत. सकाळी लवकर उठून रांगा लावत आहेत. परंतु तासन्तास रांगेत उभे राहिल्यानंतर अपुऱ्या लसपुरवठय़ामुळे त्यांचे हाल होत असल्याचे चित्र सर्वच केंद्रांवर पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे पालिकेला ठाणे येथून लस प्राप्त होत असून तिचे प्रमाण अत्यल्प असल्याने पालिकेच्या नियोजनाचा सावळागोंध्उडत आहे. सोमवारी सकाळी नेरुळ येथील सीबीएसई शाळेच्या केंद्राबाहेर नागरिकांनी भलीमोठी रांग लावली होती. एकाच रांगेत सर्वच गटातील लसीकरणासाठी आलेले नागरिक उभे राहिले होते. रांगेतील ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला.
शहरात पालिकेच्या वतीने १०४ केंद्रे सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात ७४ केंद्रांवरच लसीकरण करण्यात येत आहे. माजी नगरसेवक भरत जाधव यांनी सांगितले की, पालिकेने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. कारण सर्व वयोगटाची एकच रांग केली तर नागरिक आशेने उभे राहतात. त्यांचा क्रमांक येईपर्यंत लस संपलेली असते. याबाबत पालिका आयुक्तांनाही निवेदन देणार आहे.
नवी मुंबईतील नागरिक लस घेण्यासाठी सकाळी ६ वाजल्यापासून केंद्रावर जात आहेत. परंतु सगळ्या गटासाठी एकच रांग लावली जाते. त्यामुळे लांबच्या लांब रांगा लागतात. मी ४ तास उभा राहून मला दुसरी मात्रा मिळाली नाही. पालिकेने योग्य नियोजन करावे आणि नागरिकांचे हाल थांबवावे.
– बबन घोडेकर, सीवूड्स, सेक्टर ४८
लसीकरण वेगवान होण्यासाठी पालिकेने केंद्रे वाढवली आहेत. परंतु लसपुरवठाच नीट होत नाही. सोमवारी प्रत्येक केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे लस वाढवून देण्यासाठी मागणी केली जात होती. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी पालिका योग्य ती काळजी घेत आहे.
– डॉ. रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख