उरण : शुक्रवार पासून व्रतवैकल्य आणि विविध सणांचा महिना असलेल्या श्रावणाला सुरुवात होत आहे. मात्र पावसामुळे व मागणी वाढल्याने भाज्या महाग होतात. याच काळात शेतकऱ्यांनी आपल्या परसात,रानात आणि शेताच्या बांधावर लावलेल्या स्थानिक भाज्या तयार झाल्याने यांची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे खवय्यांना दिलासा मिळणार आहे. यात भेंडी,परवल, दुधी व शिराली आदी प्रकारच्या भाज्या बाजारात दाखल होऊ लागल्या आहेत.
ग्रामीण भागात शेतकरी आणि ग्रामस्थ मे – जून महिन्यात स्थानिक भाज्यांची लागवट करतात. या भाज्या श्रावण महिन्यात तयार होतात. त्यामुळे याकाळात उपवास आणि व्रतवैकल्ये पळाले जात असल्याने या भाज्यांचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे याच काळात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्याचीही जोड मिळते. मात्र पावसामुळे मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाज्यांची आवक कमी होत असल्याने याकाळात आवक कमी आणि मागणी जास्त अशी स्थिती निर्माण होते. परिणामी भाज्यांच्या दरात वाढ होते.
उरण तालुक्यातील नागाव,केगाव,चाणजे तसेच चिरनेर, कळबुसरे, विंधणे, रानसई, पुनाडे,सारडे, पाले, गोवठाणे,आवारे,कोप्रोली आदी परिसरात भात शेतीच्या जोडीला भाज्यांचे पीक ही घेतले जाते. या भाज्यांची लागवट ही मे महिन्यात करण्यात येते. त्यामुळे जुलै अखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या म्हणजे श्रावण महिन्यात या भाज्या तयार होतात. याची विक्री बाजारात केली जाते. यामध्ये करंजा परिसरातील शिराली,दुधी व काकडी यांना चांगली मागणी असते.
परसातील भाजीत घट : ग्रामीण भागात घराच्या मागे किंवा पूढे अंगण आणि परस असतो. या परसात आपल्या कुटुंबासाठी भाज्या पिकविण्याची परंपरा आहे. मात्र सद्या वाढत्या नागरीकरणामुळे घरा सभोवताली असलेल्या जागाच कमी झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांना बाजारातील भाज्यांवर अवलंबून रहावे लागत आहे. त्याचप्रमाणे शेतीही झपाटयाने नष्ट होऊ लागल्याने शेताच्या बांधावर पिकविण्यात येणाऱ्या भाज्यांचे प्रमाण ही घटू लागले आहे. यात खाऱ्या जमीनीवर उगवणारी भेंडीही कमी झाली असल्याचे मत चिरनेर येथील कृतिशील शेतकरी प्रफुल्ल खारपाटील यांनी दिली आहे.
तर यावर्षी मे महिन्यात आलेल्या अवेळीच्या पावसाने या भाज्यांवर परिणाम झाला असल्याने उत्पादनात घट झाली असल्याची माहिती नागाव येथील जेष्ठ शेतकरी काका पाटील यांनी दिली आहे.पेण मधील रानातील भाज्यांचा आधार : मुंबई गोवा मार्गावरील पेण परिसरातील रान व डोंगर परिसरात येथील स्थानिक शेतकरी आणि आदिवासी मोठया प्रमाणात भाज्यांची लागवट करतात. या भाज्या श्रावण महिन्यात तयार होऊन बाजारात येत असल्याने त्यांचाही आधार खवय्यांना होतो.