जयेश सामंत
नवी मुंबई : अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळय़ाला दहा दिवस उरले असताना त्याचे पूर्वरंग शुक्रवारी मुंबईतील विकास प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळय़ात दिसून आले. शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूपासून नवी मुंबईतील कार्यक्रम स्थाळापर्यंत उभारण्यात आलेल्या श्री रामाच्या भव्य प्रतिमा, वारंवार होणारा श्री रामाचा जयघोष आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर राम मंदिराबद्दल मोदींना दिलेली मानवंदना कार्यक्रमात लक्ष वेधून घेत होती.
नाशिक येथील कार्यक्रम आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सायंकाळी चारच्या सुमारास शिवडी येथे आगमन झाले. तेथून ‘अटल सेतू’वरूनच पंतप्रधानांचा ताफा नवी मुंबईतील चिर्ले येथील कार्यक्रमस्थळी गेला. या दौऱ्यासाठी राज्य सरकारमधील तिन्ही घटक पक्षांनी विशेषत: भाजपने मोठी तयारी केल्याचे दिसून आले. भाजपचे पनवेल आणि उरणचे आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांच्याकडे पंतप्रधानांच्या स्वागताची विशेष जबाबदारी सोपविण्यात आली होती. मोदींचे स्वागत करताना हा कार्यक्रम केवळ विकास प्रकल्पांपुरता मर्यादित न ठेवता त्यातून हिंदूत्वाचा नारा बुलंद करण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले.
हेही वाचा >>>पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अजितदादा गटाला होर्डिंगवर मानाचे स्थान
चिर्ले ते नवी मुंबई विमानतळ या साडेपाच किलोमीटर अंतराच्या मार्गावर पंतप्रधानांचा रोड शो करण्यात आला. त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा आगरी-कोळी समाजातील महिला-पुरुष पारंपरिक वेशात मोदींचे स्वागत करत होते. त्यांना ढोल-ताशा पथकांची जोड देण्यात आली होती. मात्र, या मार्गावर जागोजागी उभारलेले श्रीरामाच्या जयघोषाचे फलक लक्ष वेधून घेत होते. श्री रामाच्या मोठय़ा प्रतिमा आणि सोबत पंतप्रधानांची छबी असलेले अनेक फलक या मार्गावर होते. अटल सेतूच्या दोन्ही बाजूस समुद्रात मोठय़ा संख्येने बोटी तैनात करण्यात आल्या होत्या. या बोटीतून ‘जय श्रीराम’ गोंदविलेले उंच फुगे सोडण्यात येत होते. काही ठिकाणी ‘विकासाच्या वाटेवर समर्थ भारताचे पुनरुत्थान’ असा संदेश देणारे फलकही उभारण्यात आले होते. विकासप्रकल्पांच्या लोकार्पणासाठीच्या शासकीय सोहळय़ाच्या सभामंडपातही श्री रामाच्या प्रतिमा दिसून आल्या.
मोदींना मानवंदना
लोकार्पण सोहळय़ादरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंतप्रधानांना श्री रामाची मूर्ती आणि राम मंदिराची प्रतिकृती भेट देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणादरम्यान राम मंदिर उभारणीचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मोदींचे आभार मानले. एवढेच नव्हे तर, याबद्दल सभामंडपातील सर्वानी दोन मिनिटे उभे राहून पंतप्रधानांना मानवंदना द्यावी, असे आवाहनही केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सभामंडपाने टाळय़ांचा कडकडाट केला.पंतप्रधानांचे स्वागत करताना हा कार्यक्रम विकास प्रकल्पांपुरता मर्यादित राहणार नाही याची खबरदारी महायुतीच्या नेत्यांनी घेतल्याचे पाहायला मिळाले.
अटल सेतूमुळे नवी मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहेच शिवाय या विकासाला आध्यात्मिक पाया असल्याने पंतप्रधानांच्या स्वागतासाठी आम्ही राम मंदिराचे बॅनर सर्वत्र उभारले होते. राम मंदिराचे इतक्या वर्षांचे स्वप्न ज्यांच्यामुळे पूर्ण झाले त्यांचे आभार मानण्याचा हा प्रयत्न होता. -महेश बालदी, आमदार उरण