नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सचिव पी. एल. खंडागळे यांच्या दालनातील खुर्चीवर स्लॅब कोसळल्याची दुर्घटना सोमवारी सायंकाळी घडली. ईद निमित्ताने कार्यालय बंद असल्याने सुदैवाने सचिव बचावले व कोणतीही जीवितहानी झाली नाही. एपीएमसीमध्ये दरवर्षी पावसाळ्या त कमानी छताचा स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे एपीएमसीमधील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मुंबई कृषि उत्पन्न बाजारसमितीचे मुख्यालय हे २० ते २५ वर्षे जुने आहे. कांदा बटाटा बाजाराबरोबरच याची उभारणी करण्यात आली होती. कांदा बटाटा बाजार आता धोकादायक यादीत समाविष्ट आहे मात्र त्याचवेळी बांधलेले हे मुख्य प्रशासकीय इमारत धोकादायक यादीत समाविष्ट का नाही असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा…नवी मुंबई : क्षुल्लक कारणावरून हत्येचा प्रयत्न; गुन्हा दाखल

या ठिकाणी काही कार्यालयांत लोखंडी टेकू देऊन तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. आतून तात्पुरती डागडुजी करण्यात आली असली तरी येथील इमारती जीर्ण झाल्या आहेत.

एपीएमसीच्या मुख्य इमारतीमध्ये आमदार, खासदार, मंत्रालयातील अधिकारी तसेच बड्या नेत्यांची ये-जा असते, येथे महत्त्वाच्या बैठकी पार पडतात. या ठिकाणी गेस्ट हाऊसदेखील आहे. राज्यातील मुख्य बाजार समित्यांचे कामकाज मुंबई एपीएमसी मुख्यालयातून चालते. या मुख्यालयात राज्याच्या विविध बाजार समित्यांमधून शेतकरी प्रतिनिधी येतात. यामध्ये सभापतींसह संचालक मंडळ, प्रशासकीय अधिकारी व सचिव असतात, तसेच या मुख्यालयात बसलेले अधिकारी-कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करतात.

हेही वाचा…करंजाडे ते पनवेल स्थानक बसच्या मार्गातील वाहतूक कोंडी दूर करा

दरवर्षी पावसाळ्यात कांदा बटाटा बाजारात छताचे स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत आहेत. आता मात्र सचिवांच्या दालनात स्लॅब कोसळला आहे. कार्यालयाला सुट्टी असल्याने जीवितहानी टळली आहे. यानिमित्ताने पुन्हा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा…नवी मुंबईतील पोलीस भरती दोन दिवस पुढे ढकलली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे तातडीने संरचना परीक्षण करण्यात येणार आहे. तशा सूचना अभियांत्रिकी विभागाला देण्यात आल्या आहेत. – पी. एल. खंडागळे, सचिव, एपीएमसी