नवी मुंबई : शहरात पडणाऱ्या पावसामुळे वातावरण काही काळ स्वच्छ झाले होते. मात्र, पावसाची काहीशी उघडीप होताच वाशी परिसर पुन्हा एकदा वायुप्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. बुधवारी पहाटेपासूनच वाशीतील कोपरी गावपासून ते सेक्टर २६, २८ व २९ भागांत धुरकट वातावरण आणि दुर्गंधीयुक्त वास पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या पुन्हा उफाळून आल्या आहेत.

या परिसरालगत असलेल्या औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांतून उत्सर्जित होणाऱ्या धुरामुळे वाशी आणि कोपरखैरणे परिसरात अनेकांमध्ये श्वास घेण्यास त्रास, घसा खवखवणे, डोळ्यांत जळजळ तसेच सर्दीसारखी लक्षणे जाणवत आहेत. परिसरात दाट धुक्यासारखा धूर पसरल्याचे दृश्य रात्री उशिरा आणि पहाटेच्या वेळी निर्माण होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रदूषण अधिक वाढत असून, नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे.

वाशी व घणसोलीलगतचा संपूर्ण पट्टा महापे औद्योगिक क्षेत्राशी जोडलेला असल्याने स्थानिकांना यास कायम तोंड द्यावे लागत आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी वातावरणातील बदल आणि ऊन-पावसामुळे परिसरात ‘धुकं’ निर्माण झाल्याचे सांगितले. मात्र, नागरिकांच्या तक्रारीनुसार हवेतील उग्र दर्प आणि श्वसनास होणारा त्रास वेगळाच इशारा देत आहे. तर याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाने संवेदनशील नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

प्रदूषणाची आकडेवारी काय सांगते?

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) कोपरी-वाशी केंद्रावर बुधवारी (२४ सप्टेंबर) सकाळी ६ वाजता हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ७२ इतका नोंदला गेला. ही पातळी “मध्यम” म्हणजेच साधारणपणे “जास्त त्रासदायक नाही, पण संवेदनशील लोकांसाठी धोकादायक ठरू शकते” अशा प्रकारात मोडते. त्याच वेळी हवेत सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण (PM2.5) सुमारे २१ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतके होते. हे कण डोळे, घसा आणि फुप्फुसांपर्यंत पोहोचून आरोग्यावर परिणाम करू शकतात. तर मोठ्या धूलिकणांचे प्रमाण (PM10) सुमारे ४७ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतके नोंदले गेले. यामुळे श्वास घेण्यास त्रास आणि खोकल्यासारखी लक्षणे वाढू शकतात असे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

… तर आंदोलन करण्याचा इशारा

कोपरी गाव, वाशी सेक्टर २६ व २८ परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही या प्रदूषणाविरोधात आवाज उठवला होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी मुंबई महापालिका, स्थानिक आमदार आणि मुख्यमंत्र्यांकडे वारंवार निवेदने देऊन तक्रारी नोंदवल्या होत्या. काही काळ परिस्थितीत सुधारणा झाली होती; मात्र आता पुन्हा वातावरण प्रदूषित होऊन त्रास वाढतो आहे. यावर तातडीने कारवाई करावी, औद्योगिक विकास आणि रोजगार महत्त्वाचे असले तरी कारखान्यांनी पर्यावरणीय नियमांचे पालन करावे, प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कार्यरत ठेवावी आणि प्रशासनाने या प्रकरणात ठोस पावले उचलावीत अन्यथा, रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

वातावरण सध्या धुक्याचे प्रमाण वाढल्याने सकाळी परिसरात दाट धुके दिसतात. मात्र, यातील धूलिकणांचा नागरिकांना त्रास होत असल्यास आम्ही महापालिकेला या परिसरात फॉगर यंत्रणा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही परिस्थिती न सुधारल्यास याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. – सतीश पडवळ, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वाशी

नवी मुंबई महापालिका याबाबत दक्षता बाळगत असून, वाशी परिसरातील नागरिकांनी परिसरात धुरके असताना शक्यतो बाहेर पडू नये. किंवा बाहेर पडताना तोंडावर मास्कचा वापर करावा. संवेदनशील नागरिकांना या धुरक्यांमधील धूलिकणांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अधिक त्रास जाणवल्यास त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत असे आवाहन करत आहे. – डॉ. प्रशांत जवादे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका