नवी मुंबई : नवी मुंबईतील पाम बीच येथे बेजवाबदार पणे गाडी चालविल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र गाडीचा चक्काचूर झाला असून गाडी कुठली हे सुद्धा ओळखता येत नाही.
नवी मुंबईतील वाशी ते बेलापूर हा ९ किलोमीटरचा मार्ग पामबीच म्हणून ओळखला जातो. शहरांतर्गत हा मार्ग असला तरी महामार्ग प्रमाणे बनवण्यात आला आहे. रस्ता चांगला असल्याने गाडी वेगात चालवण्याचा मोह आवरला जात नाही. त्यामुळे या मार्गावर अपघात नित्याचे झाले आहेत. विशेष म्हणजे यातील ९९ % अपघात हे वाहन चालकाच्या चुकीने होतात. त्यामुळे काही महिन्यापासून या मार्गावर प्रतितास ६० किलोमीटर वेगाची मर्यादा घालण्यात आली आहे. हे लक्षात यावे म्हणून जागोजातो फलक लावण्यात आले असून पूर्ण रस्त्यात दिसेल असे मोठ्या अक्षरात लिहण्यात आले आहे.
असे असले तरी वेगमर्यादा पाळली जात नाही खास करून रात्री गाड्या सुसाट चालवल्या जातात. सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास सुसाट वेगात बेलापूर कडून वाशीच्या दिशेने मर्सिडीज हि महागडी गाडी चालवणाऱ्या सलमान शेख याचे गाडी वरील नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजकावर आदळून चार आपटी मारत लोखंडी बॅरिकेट्स तोडून बेलापूर दिशेच्या रस्त्यावर जाऊन आदळली या अपघातात सलमान शेख चालक (वय २० ) आणि सुफियान शेख (वय २०) हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बेजवाबदारपणे वाहन चालवून अपघातास जबाबदार म्हणून सलमान यांच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोघांची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
पामबीच मार्गावर वेगावर नियंत्रण राखणे गरजेचे आहे. यासाठी वेळोवेळी स्पीड गन आणि सीसीटीव्ही द्वारे कारवाई करण्यात येते तसेच धोकादायक वळणावर अपघात प्रवण क्षेत्रात रम्बलर लावण्यात आले आहेत. या शिवाय रोड लाईटस हि लावण्यात आले आहे. जेणेकरून रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज यावा . तरीही वाहन चालक वेग मर्यादा ओलांडतात. वेगावर नियंत्रण ठेवा, वाहतूक नियमांचे पालन करा असे आवाहन आम्ही नेहमी करत असतो अशी माहिती एका वाहतूक पोलिसाने दिली.