ऐरोली गाव
ठाणे-बेलापूर पट्टयातील गावे म्हणजे आगरी आणि कोळ्यांचा समुदाय. यापलीकडे या गावांची दुसरी ओळख नाही. मात्र नवी मुंबईच्या निर्मितीनंतर सर्व गावे विकासाच्या वाटेला लागली. गावांचा चेहरामोहरा बदलला असला तरी त्यांची संस्कृती, संघर्ष आणि सामाजिक आर्थिक जीवनाची वीण अजूनही कायम आहे. त्यातीलच ऐराली गाव..
ठाण्यापासून पाच किलोमीटर आणि वाशीपासून १८ किलोमीटर अंतरावर असलेले गाव म्हणजे ऐरोली गाव. नव्याने झालेल्या ऐरोली रेल्वे स्थानकाची जागा याच ऐरोली गावाच्या हद्दीत येते. सात एकरावरील गावची लोकसंख्या एक हजारच्या घरात आहे. नवी मुंबईतील शंभर टक्के कोळीबांधव असलेल्या गावांपैकी हे एक गाव. त्यात ऐरोली गावचा क्रमांक वरचा.
मार्च १९८४ मध्ये भिवंडीत झालेल्या हिंदू-मुस्लीम दंगलीची झळ या गावालाही बसली होती. नाक्यावरील अनेक लाकडाच्या वखारी समाजकंटकांनी जाळल्या आणि काही गावकऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागली. हा अपवाद वगळता शांत, संयमी असलेल्या या गावातील एकोपा अनेक प्रकरणांत दिसून आला आहे. राज्यात एक कोटीपेक्षा जास्त कोळीबांधव आहेत. त्यातील अनेक सोनकोळी हे नवी मुंबईतील २९ गावांचे मूळ रहिवासी आहेत. नवी मुंबईतील या गावात आगरी-कोळ्यांसह इतर समाजाची संख्या विखुरलेली आहे मात्र ऐरोलीत एक आगऱ्याचे घर वगळता सर्व कोळीबांधवांची वस्ती आहे. पूर्वे बाजूस फिलिप्स (सध्याची माइंड स्पेस) पश्चिम बाजूस खाडीकिनारा, दक्षिण बाजूस सेक्टर-३ व ४ ना जोडणारा पावसाळी नाला आणि उत्तर बाजूस मुकंद कंपनीची हद्द अशा वर्तुळात १०० उंबऱ्याचे हे गाव. गावाच्या पूर्व बाजूस भारत बिजली, फिलिप्स, सीपीसी, पोशा यांसारख्या कंपन्या साठच्या दशकात आल्या आणि गावातील प्रत्येक तरुण नोकरीला लागला. ठाणे-बेलापूर मार्गाच्या पूर्वेला या कंपन्या आणि गावात त्या काळी चांगलीच घनदाट झाडी होती. त्यामुळे आंबा, जांभूळ, चिंचेची झाडे मुबलक असलेल्या या जंगलात त्या वेळी डुकरेही आढळून येत होती.
असे सांगितले जाते की जंगलात शिकारीसाठी वा रानमेवा मिळविण्यासाठी गेलेला तरुण कधी तरी थेट नोकरीला लागल्याची बातमी घेऊनच गावात यायचा. एमआयडीसीत कारखाने येण्यापूर्वी भातशेती आणि मासेमारी हे दोनच व्यवसाय माहीत असलेल्या गावाने स्वयंपूर्णता जपली होती. त्यामुळे गावात भाजी, दूधदुभते चांगलेच असल्याचे गावकरी आजही अभिमानाने सांगतात. कोळ्यांची संख्या जास्त असल्याने कालव तयार करून भरती-ओहोटीच्या पाण्यावर मासेमारी करण्याची कला या ग्रामस्थांना पहिल्यापासून अवगत झाली होती.
गावची एकता चर्चेचा विषय होता. फिलिफ्स कंपनीच्या बाजूला आणि आताच्या ऐरोली नाक्यावर तलाव आहेत. ते दोन तलाव आणि गावातील प्राथमिक शाळा या गावातील ग्रामस्थांनी श्रमदानाने बांधली आहे. फिलिफ्स कंपनीत अशाच प्रकारे सत्तरच्या दशकात एकदा संप झाला होता. या कंपनीत जास्तीत जास्त कामगार हे या गावातील होते. संप मोडून काढण्याचा निर्धार व्यवस्थापनाने केला होता. त्या वेळी संपूर्ण गावकऱ्यांनी फिलिफ्स कंपनीला घेराव घातला होता. अशीच एकता भिवंडी दंगलीच्या वेळी गावकऱ्यांनी दाखवली होती. भिवंडीत मार्च १९८४ रोजी हिंदूू-मुस्लीम दंगल झाली. त्याचे पडसाद राज्यात अनेक ठिकाणी उमटले. ठाणे-बेलापूर पट्टीतील अनेक गावांपैकी केवळ ऐरोलीत या दंगलीची झळ पोहोचली. ऐरोली नाक्यावरील पाच-सहा लाकडाच्या वखारींना काही समाजकंटकांनी आगी लावल्या. पोलिसांनी सर्व आरोप ऐरोली गावकऱ्यांवर ठेवले. त्यामुळे अनेक तरुणांना ठाणे आणि येरवडा तुरुंगात टाकण्यात आले. या प्रकरणात गावातील एका बडय़ा व्यक्तीला जबाबदार धरून त्याच्यावर ‘रासुका’अंतर्गत अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. या वेळी अटकेतील सर्वाना सोडविण्यासाठी गावकऱ्यांनी एकजुटीने संघर्ष सुरू ठेवला आणि बडय़ा व्यक्तीची सुटका झाल्यानंतर गावात त्याची रथातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
गावची एकता अशी अनेकदा दिसून आली; मात्र १९६९ मध्ये होळीच्या दिवशी संघर्ष निर्माण झाल्याने गावात आज दोन होळ्या लागतात. अन्यथा गावातील होळी उत्सव हा स्मरणात ठेवण्यासारखा असल्याचे सांगितले जाते. तब्बल १५ दिवस चालणाऱ्या या होळी उत्सवाची तयारी एक महिन्यापासून गावकरी करीत असत. या पंधरा दिवसांत रात्री छोटय़ा छोटय़ा होळ्या पेटवल्या जात असत. त्या वेळी आटापाटय़ा, कबड्डी, कुस्तीचे फड रंगविले जात. गावातील महिला नागेलीचा कार्यक्रम करीत.
नागेली म्हणजे महिलांनी गायलेली लोकगीते. याच काळात विविध प्रकारची सोंगे धारण केली जात असत. होळीच्या दिवशी मध्यवर्ती ठिकाणी मोठी होळी पेटवली जाई. त्यापूर्वी होळीची हळद, वाजतगाजत लग्न अशा कार्यक्रमांची आखणी होत होती. होळी पेटवल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या धुळवडीची मजा काही औरच होती. जूनमध्ये गावची जत्रा होते. गावाच्या बाहेर असलेल्या गावदेवी मैदानात ही जत्रा भरत होती. आता तेथे क्रिकेटचे सामने भरतात. गावातील प्रत्येक ग्रामस्थ हा काल्र्याच्या एकवीरा आईचा निस्सीम भक्त मानला जातो. त्यामुळे एकवीरा आईच्या जत्रेलाही गावाची हजेरी आवर्जून असते. गावात तसे उच्चविद्याविभूषित कोणी नाही. गावात प्राथामिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ठाण्यातील एमएच, बीजे, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही जणांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शिक्षणापासून चार हात लांब राहिलेल्या ऐरोलीकरांच्या कर्मभूमीवर आज मात्र अनेक शाळा-महाविद्यालये झाल्याने ऐरोली शिक्षणाचे केंद्र म्हणून उदयास आले आहे.
गावच्या जमिनी घेऊन एमआयडीसी क्षेत्रात मोठय़ा आंतरराष्ट्रीय कंपन्या आल्या. त्या वेळी तेथील व्यवस्थापनाने ग्रामस्थांच्या हाताला काम दिले, मात्र आज चित्र उलटे आहे. त्या कंपन्यांनी कवडीमोल दामाने घेतलेल्या जमिनी आता दुसऱ्या व्यवस्थापनांना विकल्या आणि त्या कंपन्यांच्या दारात आज गावातील सुशिक्षित तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. पूर्वीच्या कंपनी व्यवस्थापनाने सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या गावांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना सेवा-सुविधा देण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नाचा भाग म्हणून फिलिफ्सने गावात एक व्यायामशाळा व एक शाळेचा वर्ग बांधून देण्यास मदत केली. विशेष म्हणजे विजेच्या दिव्यांचे उत्पादन करणाऱ्या फिलिप्सने १९६६ मध्ये गावातील प्रत्येक घरात टय़ूबलाइट वाटप केल्या होत्या. नेमकी या वाटपाच्या एक वर्ष आधी गावात वीज आणि काही ठिकाणी पाणी आले होते.
गावाला राजकीय, शैक्षणिक परंपरा म्हणावी तशी नाही. दिघा, इलटणपाडा आणि ऐरोली यांची ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या या गावाचे पहिले सरपंच होण्याचा मान गजानन कोटकर यांना जातो. महात्मा गांधींच्या चले जाव आंदोलनात घणसोलीकरांना साथ देण्यासाठी भालचंद्र जोशी आणि धर्मा कोटकर यांनी मोलाची भूमिका बजावल्याचा दाखला आहे. गावातील एकता आता लोप पावली आणि गावाचे गावपण हरवल्याची खंत मात्र काही जुन्याजाणत्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आली.