मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात स्ट्रॉबेरी स्वस्त, तर अंजीर महागले आहे. फळ बाजारात अधिक प्रमाणात स्ट्रॉबेरीची आवक सुरू झाली असून बाजारभाव कमी झाले आहेत. स्ट्रॉबेरीचे दर ४० रुपयांनी उतरले असून, अंजीर ५० रुपयांनी महागले आहे.

डिसेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या अंजीर आणि स्ट्रॉबेरीच्या हंगामाला अवकाळी पावसाचा फटका बसल्याने हंगाम लांबणीवर जाऊन जानेवारी महिन्यात बहर आलेला आहे. जानेवारी महिन्यात थंडीची चाहूल लागताच स्ट्रॉबेरीला अधिक बहर आला असून उत्पादन वाढले. मागील महिन्यात ५०० क्रेटप्रमाणे दाखल होणारी स्ट्रॉबेरी आता १ हजार ५०० क्रेट, तर नाशिकच्या ३-४ गाड्या अशी ६२८ क्विंटल दाखल झाली आहे. जादा आवक झाल्याने किलोमागे ४० रुपयांनी स्वस्त झाली आहे. जानेवारीत महिन्यात प्रतिकिलो २०० ते ३२० रुपयांवर विक्री होणारी स्ट्रॉबेरी आता प्रतिकिलो १५० ते २८० रुपयांवर आली आहे. यामध्ये नाशिक, महाबळेश्वर, पाचगणी, भिलारे येथून कामारोजा, विंटर, स्वीट चार्ली अशा प्रकारची आकाराने लहान मोठी, चवीला आंबट गोड अशी स्ट्रॉबेरी दाखल होत आहे.

हेही वाचा – नेरुळ ते भाऊचा धक्का जलवाहतूक सेवा कधी? १११ कोटीच्या नेरुळ जेट्टीचे काम पूर्ण होऊनही जलवाहतूक कागदावरच    

हेही वाचा – नवी मुंबई मनपाकडे असलेला भूखंड एमआयडीसीने परस्पर विकला? शिवसेना आक्रमक; उग्र आंदोलन करण्याचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदा अंजीरच्या हंगामालाही विलंब झाला आहे. तसेच, बाजारात आता अंजीर कमी प्रमाणात दाखल होत आहे. आधी ५-६ गाड्या आवक होते ते आता अवघ्या २ गाड्या दाखल होत आहेत. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. आवक कमी झाल्याने प्रतिकिलो १५० ते ३०० रुपये बाजारभाव असलेले अंजीर २०० ते ३०० रुपयांवर गेले आहे. तसेच, अंजीर फळाचा पहिला बहर देखील संपला असून, महिन्याने दुसरा बहर सुरू होणार आहे. त्या कालावधीदरम्यान अंजिराची आवक कमी जास्त राहील, त्यामुळे दरातही चढ-उतार राहण्याची शक्यता आहे.