नवी मुंबई : अनंत चतुर्दशीला निघणाऱ्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यात अधिकारी, कर्मचारी मिळून एक हजाराहून अधिक पोलीस प्रत्यक्ष बंदोबस्तात सहभागी होणार आहेत. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक आणि वेळप्रसंगी राखीव पोलीस पथक तैनात ठेवले आहेत. शुक्रवार रात्रीपासून हा बंदोबस्त असेल. याबाबत गुरुवारी पोलीस उपआयुक्त कार्यालयात बैठक झाली. यावेळी या बंदोबस्तात परिस्थितीनुसार बदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

नवी मुंबईत एकूण १६५ गणेशमूर्ती विसर्जन तलाव असून त्यात २२ नैसर्गिक व १४३ कृत्रिम तलावांचा समावेश आहे. शहरात सोसायटी आणि सार्वजनिक अशा सुमारे चारशे मंडळांच्या तसेच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. या अनुषंगाने विसर्जन मिरवणुकीत अथवा विसर्जनस्थळी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. यात २६ पोलीस निरीक्षक, ११५ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, ६०० पोलीस हवालदार, १४८ महिला पोलीस कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. तसेच प्रत्येक पोलीस ठाणेअंतर्गत एक निर्भया पथक असे दहा पथके कायम गस्त घालणार आहेत. याशिवाय दंगलविरोधी वाहन पथक आणि प्रसंगी राखीव पोलीस दल ही मदतीसाठी असेल. वाशी आणि कोपरखैरणे येथील तलावावर मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती विसर्जन होत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात वाशी येथे १३२ तर कोपरखैरणे येथे २२५ कर्मचारी तैनात असतील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मंडळांना सूचना

परिमंडळ एकचे पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले की, गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मंडळ प्रतिनिधी व शासन आस्थापना यांच्यात समन्वय बैठक आयोजित केली होती. यावेळी मंडळ प्रतिनिधींना या उत्सवादरम्यान काय करावे, काय करू नये याबाबत सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. मद्य प्राशन करणे, मिरवणुकीत वेळ काढूपणा करणे, विचित्र नृत्य करणे, ध्वनिप्रदूषण करणे आदी गोष्टी आढळून आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल. जनतेने पोलिसांच्या सूचनाचे पालन करून आनंदात व शांततेत गणपतीला निरोप द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतूक व्यवस्था

न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फूटपेक्षा मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक तलावात केले जाणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व २२ नैसर्गिक विसर्जन तलावांकडील मार्गांवर नो पार्किंग झोन असेल. याशिवाय कोपरखैरणेकडून वाशी दिशेने येणाऱ्या मिरवणूक व्यतिरिक्त अन्य सर्व वाहनांना ब्ल्यू डायमंड चौकपासून कोपरी पाम बीच अरेंजा कॉर्नरमार्गे पुढे जाता येईल, तसेच परतीचा मार्ग हाच असणार आहे. कोपरखैरणे सेक्टर १८ व १९ सी दरम्यान असणारा ज्ञान विकास शाळेसमोरील मार्ग ते खाडी किनारा मार्ग येथे गरजेनुसार अन्य वाहनांना प्रवेश बंदी असेल. विसर्जन तलाव ते सेक्टर २० घणसोली चौक मार्गही गरजेनुसार अन्य वाहनांसाठी बंद राहील. याबाबत अंतिम निर्णय शुक्रवारी घेण्यात येणार आहे. नवी मुंबईत सुमारे तीनशे वाहतूक पोलीस कर्मचारी बंदोबस्तामध्ये असणार आहेत. तसेच अपघात वा गाडी अचानक बंद पडली तर टोईंगव्हॅनची सोय तात्काळ करण्यात येणार आहे.