पनवेल – पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रातील तळोजा औद्योगिक वसाहतीला खेटून असलेल्या कासाडी नदीत गंभीर प्रमाणात प्रदूषण वाढल्यामुळे असेच हे प्रदूषण सुरू राहील्यास भविष्यात तळोजा परिसर धोक्यात येण्याची भिती “पर्यावरण स्थिती अहवाल २०२४-२५” यामध्ये नमूद करण्यात आले आहे. या अहवालानूसार कासाडी नदीतील जल गुणवत्तेचे परीक्षण केल्यानंतर ही धक्कादायक बाब आढळली. नदीपात्रातील पाण्यामधील बायोकेमिकल ऑक्सीजन डिमान्ड (बीओडी) आणि केमिकल ऑक्सीजन डिमान्डचे (सीओडी) प्रमाण अतिशय जास्त असून, ते मान्य मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक आहे.
विशेषतः सीओडीचे प्रमाण काही ठिकाणी २८० एमजी-लीटर एवढे आहे, जे अत्यंत धोकादायक गणले जाते ही बाब या अहवालात नमूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तळोजा कारखान्यांमधून निघणा-या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सामाईक सांडपाणी शुद्धीकरण केंद्र सूरळीत चालू असल्याचा दावा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) केला जात होता. या अहवालामुळे एमआयडीसी प्रशासनाच्या अधिका-यांचा दावा फोल ठरला आहे. उद्योग क्षेत्रात नियमबाह्यपणे काम केल्यास कारखानदारांवर कारवाईचे अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण अधिका-यांना आहेत. मात्र एमपीसीबीकडून तळोजातील पर्यावरण बचावासाठी कठोर कारवाई होताना दिसत नाही.
तळोजातील कारखानदारांकडून कासाडी नदीतील प्रदूषण थांबवत नसल्याने कारखानदारांकडून १० कोटी रुपयांचा दंड हरित लवादाने कारखानदारांना लगावला होता. नावडे गावात राहणारे आणि पनवेल महापालिकेचे शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी याबाबत हरित लवाद आणि न्यायालयात याचिका दाखल केली होती. पनवेल महापालिकेने २०२४ – २५ च्या पर्यावरण स्थिती अहवाल या संदर्भात केल्यानंतर अजूनही तळोजातील प्रदूषण कमी झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अहवालातील माहितीनूसार कासाडी नदीतील मुख्य प्रदूषक घटकांमध्ये रासायनिक सांडपाणी, औद्योगिक घनकचरा, प्लास्टिक व रंगरसायनांचा मोठ्या प्रमाणातील समावेश आहे. हे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडले जात असल्याने जलजीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट म्हटले आहे.
या अहवालात नमूद केल्यानुसार एकूण २२ वेगवेगळ्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यामधून तळोजा परिसरातील प्रदूषणाचे गांभीर्य स्पष्ट झाले आहे. हा परिसर प्रदूषणमुक्त करण्यासाठी अपशिष्ट प्रक्रिया प्रकल्प उभारणे, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची कार्यक्षमता वाढवणे आणि कारखान्यांवर कडक नियंत्रण ठेवणे यांसारख्या उपाययोजना सूचवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे तळोजा औद्योगिक वसाहतीशेजारील गाव आणि शहरी लोकवस्तीवर प्रदूषणाचे संकट घोंघावत आहे. अहवात व्यक्त केलेल्या भितीनूसार जर वेळीच आणि तातडीने याबाबत उपाय व अंमलबजावणी न केल्यास तर पाण्याच्या अभावामुळे स्थानिक जैवविविधता, शेतकी आणि मानवाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो असेही अहवालात स्पष्ट केले आहे.
–अहवालातील पाच ठळक मुद्दे
– पर्यावरण स्थिती अहवाल डॉ. अभिषेक चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बनविला आहे. डॉ. चक्रवर्ती हे आयआयटी मुंबई येथील पर्यावरण शास्त्र आणि अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत. या पथकामध्ये डॉ. अवकाश कुमार, डॉ. साद सारंग, डॉ. सत्यप्रिया साहू यांनी सुद्धा काम केले आहे.– नदीतील पाण्यामध्ये बीओडी व सीओडीचे प्रमाण अत्यंत उच्च आहे. जे नदीतील पाण्याला अत्यंत धोकादायक बनवते.
– तळोजा औद्योगिक वसाहतीतून रासायनिक सांडपाणी, रंगरसायने, प्लास्टिक, आणि औद्योगिक घनकचरा प्रक्रिया न करता नदीत सोडला जातो.
– २२ पाण्याचे नमुने घेतल्यानंतर हे चित्र स्पष्ट झाले आहे.
– सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांची कार्यक्षमता वाढवणे, नवीन अपशिष्ट प्रक्रिया प्रकल्प उभारणे आणि औद्योगिक कारखान्यांवर कठोर नियंत्रण ठेवणे
– प्रदूषण वेळीच न रोखल्यास परिसरातील जैवविविधता नष्ट होईल, पिण्याच्या पाण्याचा अभाव निर्माण होईल, तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.