नवी मुंबई : नवी मुंबईतील बहुचर्चित पाम बीच मार्गावर सीवूड्स उपनगराच्या प्रवेशद्वारावर एका आलिशान इमारतींमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या हॉटेल आणि लॉजिंग वर महापालिकेने कारवाई केली आहे. तुकाराम मुंढे महापालिका आयुक्त असताना वाढीव बांधकाम केल्याप्रकरणी या इमारतीचे बांधकाम महापालिकेने पाडले होते. असे असतानाही या इमारतीत ४२ आलिशान खोल्या असलेले हॉटेल गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. महापालिकेच्या परवाना विभागाने हे हॉटेल सीलबंद केले आहे.

नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे आणि बेलापूरचे विभाग अधिकारी अमोल पालवे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली आहे. मे. आउट स्टे हॉटेल अँड अपार्टमेंट या नावाने लॉजिंग अँड बोर्डिंगचा व्यवसाय येथे सुरू होता. या हॉटेलला पालिकेच्या परवाना विभागाने ३ जून रोजीच याबाबत नोटीस पाठवली होती. भोगवटा प्रमाणपत्र नसताना त्या जागेचा वापर करत असल्यामुळे व त्या व्यवसायाच्या स्वरुपामुळे नागरीकांस उपद्रव तसेच जावीतास तसेच आरोग्यास किंवा मालमत्तेस धोका होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे काही दुर्घटना घडल्यास आपणास जबाबदार धरले जाईल असे नोटिसीद्वारे कळवण्यात आले होते.परंतु या प्रकऱणी आपल्याकडून २४ तासांत वापर थांबवणे आवश्यक असतानाही त्याचा वापर सुरू असल्याने पालिकेने या हॉटेल तसेच लॉजिंग व बोर्डिंग सुरु असलेल्या इमारतीमधील ४२ खोल्या मोहोरबंद केल्या आहेत.

पालिकेने गुरुवारी दुपारी ३ वाजता सुरू केलेली कारवाई सायंकाळी ७.३० वाजता संपली. संबंधित आस्थापनेच्या मालकाने लावलेला विनापरवानगी फलक देखील पालिकेने काढून टाकला. बेलापूर विभाग कार्यालयाअंतर्गत करण्यात आलेली कारवाई ही परवाना विभागामार्फत करण्यात आल्याची माहिती डॉ. अमोल पालवे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोटीस बजावूनही व्यवसाय सुरुच ठेवण्यात आल्याने नवी मुंबई महापालिकेच्या परवाना विभागाच्या वतीने पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे तसेच परवाना विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.- तात्या गायकवाड, अधीक्षक, परवाना विभाग