विजयादशमीला विद्यासंस्कार हा धार्मिक विधी करायचा असल्याने मुली आणि भाचीसाठी एका शिक्षकाने सोनसाखळ्या बनवल्या होत्या. सोनसाखळ्या सराफाकडून घेऊन घरी घेऊन जात असताना बाजारात फुलांचा हार खरेदी करण्यासाठी या शिक्षकाने गाडी थांबवली आणि त्यांच्याकडील सोनसाखळ्यांची पिशवी हरवली. तातडीने शिक्षकाने पोलीसांत धाव घेतली. जेथे गाडी थांबवली होती त्या ठिकाणची झाडाझडती घेतली. मात्र सोनसाखळ्यांची पिशवी मिळाली नाही. अखेर बुधवारी विजयादशमीच्या दिवशी सकाळी त्या शिक्षकांना त्यांच्या हरविलेल्या सोनसाखळ्या सापडल्याची बातमी फोनवरुन समजली. पोलीस व सराफाने हा फोन केला होता. कळंबोली वसाहतीमधील बस आगारापुढील पाण्याची टाकीच्या चौकात ही घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Dasara Melava 2022 : शिवाजी पार्कला ट्रेनने तर बीकेसीला बसने जाणाऱ्या शिवसैनिकांची गर्दी

कळंबोली वसाहतीमध्ये आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रदीप क्लासेस हे खासगी शिकवणी वर्ग चालतात. प्रदीप पिल्लई हे या शिकवणीवर्गाचे चालक आहेत. विजयादशमीच्या दिवशी प्रदीप यांची अडीच वर्षांची मुलगी किर्तना व भाचीसाठी विद्यासंस्कार विधी करायचा बेत पिल्लई कुटूंबियांनी आखला होता. त्यामुळे वसाहतीमधील माँ मनसा ज्वेलर्समधील दिडलाख रुपये किमतीच्या दोन सोनसाखळ्या बनविण्यात आल्या. मंगळवारी रात्री सव्वादहा वाजता या सोनसाखळ्या ज्वेलर्सच्या दूकानातून घेऊन प्रदीप व त्यांचे मित्र गाडीतून घरी जात होते. प्रवासा दरम्यान प्रदीप यांना फुलांचा हार घ्यायची आठवण झाली. त्यांनी बसआगारापुढील चौकात एका बाजूला त्यांची चारचाकी गाडी थांबवली होती. परंतू घराकडे प्रदीप गेल्यावर त्यांना सोनसाखळ्यांची पिशवी सापडली नाही. पुन्हा ज्या ठिकाणाहून सोनसाखळ्या बनविल्या त्या सराफाच्या पेढीपर्यंत प्रदीप हे पोहचले. अनेक शोधाशोध केल्यानंतर ती पिशवी हरवल्याचे त्यांना समजले. त्यांनी रात्रीच कळंबोली पोलीस ठाणे गाठले. तेथील अधिका-यांना सोनसाखळी चोरीस गेल्याची खबर दिली. पोलीसांनी प्रदीप यांना गाडीत व ज्या रस्त्यावरुन प्रवास केलाय तेथे शोधण्याचा सल्ला दिला. एकीकडे ही सर्व शोधाशोध सूरु होती तर दूसरीकडे याच मार्गावरुन घरी जाणा-या पोलीसाला ही पिशवी सापडली होती. नवी मुंबई पोलीस दलात काम करणारे सुधाकर वसंत पाटील असे या पोलीस नाईकाचे नाव आहे. पोलीस मुख्यालयात नेमणूकीस असलेले पोलीस कर्मचारी सुधाकर यांना बंदोबस्तासाठी मुख्यालय प्रशासनाने खांदेश्वर पोलीस ठाण्यात नेमले होते. रात्री सुधाकर हे घरी जेवण्यासाठी या मार्गावरुन जात होते. त्यांना रस्त्यावर पडलेली पिशवी बसआगारापुढील चौकात सापडली. या पिशवीवरुन तीन वाहनांची चाके गेली होती. पोलीस कर्मचारी सुधाकर यांनी ही पिशवी कोणाची आहे, अशी विचारणा तेथील फेरीवाल्यांकडे केली मात्र कोणीही त्याच्या प्रतिसादाला उत्तर न दिल्याने ती पिशवी घेऊन ते घरी गेले.

हेही वाचा >>> फेरीवाल्यांकडून प्रवासी महिलेस मारहाण, ठाण्यात फेरीवाल्यांची अरेरावी टोकाला

घरी जेवण करुन पाटील पुन्हा रात्रीच्या बंदोबस्तासाठी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गेले. रात्री अडीच वाजता ते बंदोबस्त संपवून घरी परतले. सकाळी ज्यावेळी उठून पोलीस कर्मचारी सुधाकर यांनी पिशवी उघडल्यानंतर त्यांना त्यामध्ये सोनसाखळ्या दिसल्या. सोनसाखळ्यांसोबत कोणतीही सोन्याची पावती नसल्याने सुधाकर व त्यांच्या कुटूंबियांनी ही पिशवी ज्यांची आहे त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचा निर्णय घेतला. या पिशवीवर सराफाचा छापील मोबाईलनंबर असल्याने पोलीस सुधाकर यांनी तातडीने फोनवरुन सराफाला संपर्क साधला. या सराफाचे नाव विश्वजीत असून त्यांनी रात्री घडलेला प्रकार पोलीस सुधाकर यांना सांगीतला. तातडीने ही पिशवी घेऊन पोलीस सुधाकर हे सराफाकडे गेले. तेथे सोनसाखळ्यांचे मालक प्रदीप, सराफ दूकानमालक विश्वजीत यांना पोलीस सुधाकर यांनी पिशवी परत दिली. या प्रकरणाची माहिती मंगळवारीच प्रदीप यांनी पोलीस ठाण्यात दिली असल्याने सोनसाखळ्या सापडल्याबाबत पोलीस ठाण्यात सांगण्यात आले. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय पाटील यांनी पोलीस नाईक सुधाकर पाटील यांच्या प्रामाणिक व कार्यतत्परतेचे कौतुक करत सगळ्याच पोलीसांनी पोलीस सुधाकर यांचा आदर्श घेतला पाहीजे असेही आवाहन केले. पोलीस ठाण्यात सोनसाखळ्या हस्तांतरणापूर्वी प्रदीप यांनी दोन किलोग्रॅम पेढे भरवून पोलीसांच्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले.

आज दसरा, सोने लुटण्याचा दिवस आहे. मात्र आमच्या प्रामाणिक पोलीसाने सोने परत देऊन त्या फीर्याद्याचे प्रेम जिंकले. हेच खरे पोलीसींग आहे. याच कामाची जनता पोलीसांकडून अपेक्षा करते. या घटनेची दखल नवी मुंबई पोलीस उपायुक्त व आयुक्तांनीही घेतली आहे. – संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, कळंबोली पोलीस ठाणे

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The police recovered the lost bag of gold jewelery amy
First published on: 05-10-2022 at 17:12 IST