संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई: मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या वाशी खाडी पुलावरील वाहतूककोंडीतून सुटका होण्यासाठी बहुचर्चित ७७५ कोटी खर्चाच्या तिसऱ्या वाशी खाडीपुलाचे काम सुरु असून रस्ते विकास महामंडळाने मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या तिसऱ्या पुलाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष ठेवले आहे. त्यामुळे नव्या वर्षात वाशी खाडीवरील बहुचर्चित असलेल्या तिसऱ्या खाडीपुलाचा मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठीचा तीन लेनचा खाडीपुल दृष्टीक्षेपात असून वेगाने काम सुरु असल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे डिसेंबरमध्ये ह्या पुलाची मुंबई पुणे मार्गावरील वाहतूक सुरू करण्याचे लक्ष आहे. यामुळे वाहनचालकांना नव्या वर्षात दिलासा मिळणार आहे.

मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या बहुचर्चित तिसऱ्या पुलाच्या निर्मितीसाठी सुरवातीला कांदळवनाचा अडथळा निर्माण झाला होता. परंतु सर्व अडथळे पार झाल्यानंतर रस्ते विकास महामंडळाने एल अ‍ॅन्ड टी कंपनीला कार्यादेश दिला होता. त्यानुसार वेगाने काम सुरु आहे. तिसऱ्या पुलाचे काम पूर्ण झाल्यावर वाहतूककोंडीतून नागरीकांची सुटका होणार आहे. दोन्हीबाजूचे पूलांचे काम पूर्ण करण्यासाठीची अंतिम मुदत ऑगस्ट २०२४ असून त्यातील एका बाजूकडील मुंबईहून पुण्याकडे जाणारा ३ लेनचा पूल नव्या या वर्षाच्या अखेरीस पूर्ण करण्यासाठी वेगाने काम सुरु आहे.

हेही वाचा… खारघरमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना अटक, दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या वाशी खाडीपुलावरील सर्वात पहिला पूल वाहतूकीसाठी सध्या बंदच आहे. तर दुसरा खाडीपुल सध्या वाहतूकीसाठी वापरण्यात येत असून दुसऱ्या खाडीपुलावरुन मुंबईकडे जाण्यासाठी ३ तर मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी ३ लेन आहेत. परंतु सातत्याने वाढणारी वाहनांची संख्या यामुळे नेहमी या दुसऱ्या वाशी खाडीपुलावर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे वाशी खाडीपुलावर तिसरा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या तिसऱ्या पुलाच्या संपूर्ण प्रकल्पासाठी ७७५ कोटी खर्च होणार आहे.

हेही वाचा… द्रोणागिरी नोड मध्ये सिडकोची तोडक कारवाई; अनधिकृत झोपड्या, दुकाने, टपऱ्या हटविल्या

नव्याने तयार करण्यात येत असलेल्या तिसऱ्या पुलाच्या कामात वाशी खाडी पुलावर पुण्याहून मुंबईच्या दिशेकडे जाणारा एक व मुंबईहून पुण्याकडे जाणारा एक अशा दोन्ही बाजुला उड्डाणपुल बांधण्यात येत आहेत. दोन्ही दिशेकडे तयार करण्यात येत असलेल्या पुलावर प्रत्येकी तीन तीन लेन वाढणार आहेत. त्यामुळे आता असलेल्या सुविधेपेक्षा दुप्पट वाहतूक सुविधा वर्षभरात निर्माण करण्याचे लक्ष असून तिसऱ्या खाडी पुलाचे काम वेगाने सुरु असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या कार्यरत असलेल्या मुंबईच्या दिशेने व पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या खूप मोठी असून सध्याच्या दुसऱ्या पुलावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे तिसरा खाडी पुल केव्हा पूर्ण होतोय याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

संपूर्ण तिसऱ्या खाडीपुलाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष… ऑगस्ट २०२४

वाशी खाडीपुलावरील महत्त्वपूर्ण असलेल्या तिसऱ्या खाडी पुलाचे काम एल अँन्ड टी कंपनी करत असून तिसऱ्या पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ऑगस्ट २०२४ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर मुंबईहून पुण्याकडे जाणारा तिसरा पुल डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. – राजेश निघोट,मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

वाहने येण्याजाण्याची क्षमता दुपटीने वाढणार

सध्या वाहतूक सुरु असलेल्या दुसऱ्या खाडी पुलावर येण्याजाण्यासाठी तीन तीन लेन आहेत. परंतु तिसरा पूल झाल्यानंतर अतिरिक्त ६ लेन तयार होणार असल्याने आतापेक्षा दुप्पट वाहने एकावेळी जाऊ शकणार असल्याने सततच्या वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका होईल असे अपेक्षित आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा आहे तिसरा पुल

नव्याने निर्माण होणार तिसऱ्या खाडी पुलाचे दोन भाग असून सध्या सुरु असलेल्या दुसऱ्या पुलाच्या रेल्वे पुलाकडील दिशेला एक व जुन्या खाडी पुलाकडील पहिल्या पुलाच्या बाजुला एक असे ३ पदरी दोन उड्डाणपुल असणार आहेत. हे दोन्ही पूल १८३७ मीटर लांब व १२.७० मीटर रुंद असणार आहेत.