नेरूळ ते उरण दरम्यानच्या रखडलेल्या रेल्वे मार्गातील खारकोपर ते उरण मार्गाच्या कामाला वेग आला आहे. मात्र या मार्गासाठी जासई मधील ३२ शेतकऱ्यांच्या जमिनी सिडकोने रेल्वे प्रकल्पा करीता संपादीत केल्या आहेत. त्यांना मागील २२ वर्षांपासून साडेबारा टक्के भूखंड न दिल्याने गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम रखडण्याची शक्यता आहे.खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम जानेवारी २०२३ ला पूर्ण करण्याचा इरादा रेल्वे प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यासाठी सध्या या मार्गाच्या कामाने वेग धरला होता. या मार्गावरील रेल्वे स्थानक,मार्गाचे विद्युतीकरण यांची कामे सुरू झाली आहेत.

हेही वाचा >>> आंदोलनानंतर सिडको मंडळाला जाग; नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे होणार दुरुस्त

खारकोपर ते उरण हा १४.३ किलोमीटर च्या मार्गाचे काम भूसंपादन व वन विभागाच्या परवानगीमुळे रखडले होते. ते काम सुरू झाले आहे. या मार्गावर गव्हाण,जासई,रांजणपाडा,न्हावा शेवा,द्रोणागिरी व उरण या सहा स्थानिकांच्या उभारणीचे काम सुरू आहे. या प्रकल्प रेल्वे व सिडको यांच्या भागीदारीतून उभारण्यात येत आहे. त्यासाठी जासई येथील शेतकऱ्यांच्या जमिनी सिडकोने संपादीत केल्या आहेत. या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना साडेबारा टक्के भूखंड देय आहेत. मात्र २२ वर्षे लोटल्या नंतरही जासई मधील शेतकऱ्यांना सिडको कडून वारंवार झालेल्या बैठकीतून पोलीस यंत्रणा व विविध आस्थापना समोर आश्वासने देऊन ते पूर्ण केले नाहीत. या संदर्भात सिडकोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे माहीती करीता संदेश पाठवून वारंवार संपर्क करून ही त्यांच्याकडून प्रतिसाद दिला गेला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >>> नवी मुंबई : उद्यान विभागाच्या दिरंगाईमुळे अनेक प्रकल्पांना खीळ?

जानेवारी महिन्यात सिडकोने साडेबारा टक्के भूखंड देण्याचे मान्य केले होते मात्र नऊ महिन्या नंतरही शेतकऱ्यांना प्रतिक्षा कायम असल्याने आणि जो पर्यंत मागणी मान्य होत नाही तोवर पुलाचे काम बंद राहील माहिती जासई ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत यांनी दिली आहे.