नवी मुंबई महापालिका उद्यान विभागामार्फत कामात अडथळा ठरत असलेल्या झाडांना तोडणे आणि स्थलांतर करण्यासाठी परवानगी देण्यात येते. मात्र सदर परवानगीला दिरंगाई केली जात असल्याने शहरातील १५ ते १६ प्रकलपांना खीळ बसली आहे. यात दिघा रेल्वे स्थानकासारखा अत्यावश्यक प्रकल्पासहित महापालिकेचे शहरातील देखील प्रकल्प आहेत.

हेही वाचा >>> उड्डाण पुलाखालील जागा शालेय बसला आंदण ?

नवी मुंबई शहरात पुनर्विकास सहित अनेक प्रकल्प सुरू आहेत. या कामात मोठ्या प्रमाणात झाडे अडथळा ठरत असल्याने ती झाडे तोडणे व स्थलांतर करण्यासाठी उद्यान विभाग परवानगी देते. मात्र महापालिका उद्यान विभागात एप्रिल महिन्यापासून अनेक प्रकल्पांची परवानगी मागितली आहे. मात्र यातील काही राजकीय नेत्यांच्या निवडक संलग्न प्रकल्प सोडले तर इतर सर्व परवानग्या प्रलंबित आहेत. त्यात अत्यावश्यक सेवेत येणारा दिघा रेल्वे स्थानक, ऐरोली रेल्वे स्थानक विस्तार, ऐरोली स्मशान भूमी, वाशीतील पाण्याची टाकी, वाशी सेक्टर १२ डेपो, तुर्भे येथील पाण्याची टाकी, पामबीच मार्गावरून सायन पनवेल मार्गाला जोडणारा रस्ता, घणसोली विभागातील रस्ता अशा अनेक महत्वाच्या प्रकल्पांना आद्यप मंजुरी न मिळाल्याने असे १५ ते १६ प्रकल्प रेंगाळले आहेत.

हेही वाचा >>> आंदोलनानंतर सिडको मंडळाला जाग; नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे होणार दुरुस्त

सर्वाधिक फटका दिघा रेल्वे स्थानकाला
ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकाचे काम प्रगतिपथावर असून येथे फलाट टाकण्याचे काम जोमात सुरू आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत हे रेल्वे स्थानक सुरू होईल असे जाहीर करण्यात आलेले आहे. आतापर्यंत या रेल्वे स्थानकाचे ७५% काम पूर्ण झाले आहे. रेल्वे स्थानक आणि पुढे आणखीन रेल्वे लाईन विस्तारिकरणासाठी काही झाडे अडथळे ठरत आहेत. त्यामुळे ही झाडे तोडणे आणि स्थलांतर करण्याबाबत एमआरव्हीसीच्या वतीने महापालिका उद्यान विभागाकडे मे २०२२ मध्ये अर्ज केला होता. मात्र अद्याप त्याला हिरवा कंदील मिळाला नाही.
शहरातील दोन मोठे प्रकल्प आणि इतर प्रकल्प असे १३ ते १५ प्रकल्प परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत . स्थळ पाहणी अशा विविध तांत्रिक बाबींची पूर्तता करून लवकरच परवानग्या देण्यात येतील. – नितीन नार्वेकर, उपायुक्त, उद्यान विभाग