पनवेल : पनवेलमधील व्यापारी आणि घरातील मालमत्तांवर चोरट्यांचा डल्ला पडत आहे. अशीच स्थिती खारघर परिसरात आहे. दिवसा आणि रात्रीच्या वेळचे घरफोडीचे सत्र पनवेल व खारघरमध्ये सुरू झाल्याने येथील रहिवाशी आणि व्यापारी धास्तावले आहेत. पोलिसांनी दिवसरात्रीची गस्त वाढविणे गरजेचे झाले आहे. पनवेल शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मंगळवारी दुपारी बारा वाजता जुन्या पोस्टाजवळील श्री स्वामी समर्थ सोसायटीमध्ये १०१ क्रमांकाच्या सदनिकेत चोरटे शिरून त्यांनी तब्बल १५ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल चोरून पळून गेले. या घरातील सोन्याचांदीचे दागीने, रोख रक्कम असा कपाटात ठेवलेला मुद्देमाल चोरट्याने चोरी केला. 

पनवेल शहरातील टिळक रस्त्यावरील  मॅस्ट्रो वास्तु दुकानातून ६ नोव्हेंबरला दूकानदाराने दूकान बंद केल्यावर रात्रीच्यावेळी दुकानाच्या छताचे पत्रे तोडून दूकानातील नवरत्न स्टोन आणि रोख रक्कम असा १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. दुकानाचे पत्रे तोडेपर्यंत पोलीस कुठे होते असा प्रश्न व्यापारीवर्गाकडून विचारला जात आहे. अशीच स्थिती खांदेश्वर वसाहतीची आहे. ८ ऑक्टोबरला मध्यरात्री सेक्टर १५ येथील प्रजापती आर्केड या इमारतीमधील गाळा क्रमांक १० मधील हॉटेलचे शटर तोडून ७० हजार रुपयांची चोरी केली. 

खारघर उपनगरातील एका चोरीच्या घटनेमुळे सध्या खारघरवासियांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री  सेक्टर ३५ या रेझा ग्रॅन्ड ओव्हर या इमारतीची सूरक्षा यंत्रणा चांगली आहे. मात्र या इमारतीच्या मागील मोकळ्या बाजूहून चार चोरटे इमारतीमधील वाहनतळात शिरले. पहाटे चार वाजण्याच्या वेळी रखवालदार झोपले असावेत अशावेळी चोरट्यांनी सोसायटीतील एका शिडीच्या साह्याने तीस-या मजल्यावरील सदनिकेत या घरातील गृहिणी आणि त्यांच्या दोन मुली झोपल्या असताना घरात काहीतरी हालचाल झाल्याच्या या महिलेच्या ध्यानात आले.

चोरट्यांनी त्यांच्या घरात खिडकीवाटे शिरल्याचे बाहेर पडताना पाहीले. यानंतर संबंधित महिलेने सोसायटीच्या सीसीटिव्ही कॅमेरे तपासल्यावर धक्कादायक माहिती मिळाली. चोरट्यांची चौकडी या इमारतीच्या वाहनतळात शिरल्यानंतर त्यांनी शिडीवाटे तीस-या मजल्यावरील खिडकीतून घरात प्रवेश करून मोबाईल व पन्नास हजार रुपये लुटून नेले. चोरटे थेट घरात शिरत असल्याने खारघरची सूरक्षा कऱणारे पोलीस कुठे आहेत असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. 
 
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी परिमंडळाची नव्याने रचना केल्यामुळे दोन एेवजी तीन पोलीस उपायुक्तांच्या देखरेखीखाली नवी मुंबई परिसर आला. तसेच पनवेल परिसराला दोन सहाय्यक पोलीस आयुक्त मिळाल्याने पोलीस विभागाचा कारभार अजून काटेकोर पद्धतीने आणि सखोल होईल अशी अपेक्षा होती. मात्र पोलिसांच्या नियोजनानंतरही चोरीचे सत्र पनवेलमध्ये सुरूच आहे.