नवी मुंबई – सिडको आणि पनवेल महापालिकेतील कर्मचा-यांची यंदाची दिवाळी सानुग्रह अनुदानाच्या घोषणेमुळे गोड झाली आहे. सिडको मंडळाने यंदा कर्मचारी व अधिका-यांना पन्नास हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानाची परंपरा कायम ठेवली तर पनवेल महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त मंगेश चितळे यांनी मागील वर्षीपेक्षा सानुग्रह अनुदानात दोन हजार रुपयांची वाढ करून अनुदान वाढीची घोडदौड सुरूच ठेवली. त्यामुळे दोन्ही सरकारी उपक्रमातील कर्मचा-यांनी समाधान व्यक्त केले.

पनवेल महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त मंगेश चितळे यांच्यासमोर महापालिकेच्या म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस अनिल जाधव यांनी ४० हजार रुपये सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी युनियनच्या शिष्टमंडळाने आ. प्रशांत ठाकूर यांची सुद्धा भेट घेतली होती.

अखेर आयुक्त चितळे यांनी कर्मचा-यांची दिवाळी गोड करत ३२ हजार रुपयांच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. यामुळे पनवेल महापालिकेच्या ८२५ आणि प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेले ५ अधिका-यांना ३२ हजार तसेच महापालिकेचे ६७ शिक्षक कर्मचा-यांसह एनयुएलएम,पीएमवाय कर्मचा-यांना प्रत्येकी १० हजार रुपये तसेच परिश्रमीक कर्मचारी, एनयुएचएम आणि आशा स्वयंसेविका यांना प्रत्येकी सात हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. सानुग्रह अनुदानाचे लाभार्थी १३२६ कर्मचारी असून यासाठी पालिका ३ कोटी २ लाख ४५ हजार रुपये खर्च कऱणार आहे.

सिडको एम्प्लॉइज युनियनने गुरुवारी याच सानुग्रह अनुदानाची घोषणा करण्यासाठी बेलापूर येथील सिडको भवन येथे प्रवेशव्दार सभा आयोजित केली होती. या सभेत राज्यातील सर्वाधिक ५० हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला. या सभेवेळी विमानतळ बनविण्यासाठी तसेच भूसंपादन प्रक्रिया, देखरेखीच्या कामात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, भूषण गगरानी, तानाजी सत्रे, अनिल डिग्गीकर, संजय मुखर्जी, व्ही. राधा, प्राजक्ता लवंगारे यांचे आभार मानून पेढे वाटून आणि फटाके वाजवून कर्मचा-यांनी आनंदोत्सव साजरा केला.

या सभेत कर्मचा-यांना मार्गदर्शन करताना युनियनचे सरचिटणीस नितीन कांबळे यांनी सर्व युनियन मागण्या आणि त्यासंदर्भात माहिती उपस्थितांना दिली. तसेच युनियनचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी भ्रष्टाचार न करण्याचे आवाहन केले आणि दिवाळी बोनस जाहीर केला. सदर सभेत उपाध्यक्ष संजय पाटील, प्रमोद पाटील, सहसचिव सुधीर कोळी, महिला सदस्या प्रमिला पाटील, हर्षदा पाटील यांनी दिवाळी निमित्त कर्मचा-यांना शुभेच्छा दिल्या. सभेत युनियन खजिनदार योगेश ठाकूर, सभासद प्रवीण ठाकूर, संजीवन पाटील, धर्मराज भगत, अमोल दळवी, विक्रम गायकवाड, धर्मराज व्हटकर, नितीन मुकादम, गणेश काकडे तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिका कर्मचा-यांना न्याय देण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाने केला आहे. महापालिका कर्मचा-यांचे वेगवेगळे प्रश्न आपण सोडवत आहोत. १०-२०-३० या वर्षांची कालबद्ध पदोन्नती वर्ग चारच्या कर्मचा-यांना दिली आहे लवकरच वर्ग ३ च्या कर्मचा-यांना ती देण्यात येईल. प्रलंबित असलेले पदोन्नतीचे प्रश्न सोडविण्यात येतील. याचा भाग म्हणून दिवाळी गोड करण्यासाठी कर्मचा-यांना सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. – मंगेश चितळे आयुक्त, पनवेल महापालिका