नवी मुंबई : नवी मुंबईत साखळी चोरटे धुमाकूळ घालत असून मंगळवार एकाच दिवशी दोन साखळी चोरी घटना घडल्या आहेत. यात एका घटनेत साखळी चोरी करताना ६२ वर्षीय महिलेने प्रतिकार केला असता तिला खाली पाडून साखळी हिसकावून चोरट्याने नेली. यात या महिलेच्या गळयावर गंभीर जखम झाली आहे. तर बुधवारीच अन्य दोन घटना साखळी चोरीच्या घडल्या असून तिन्ही घटनेत मिळून ३ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे.

नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाणे हद्दीत सेक्टर ४८ आणि सेक्टर ५० दरम्यानच्या मार्गावर ६२ वर्षीय महिला रमाबाई माने या पायी जात होत्या. रात्री साडे नऊच्या दरम्यान साई मंदिर समोर आल्यावर त्यांच्या मागून एका दुचाकीवर बसलेले दोघे जण आले. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने माने यांच्या मागून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी पटकन बाजूला होत प्रतिकार केला असता एकाने त्यांना हाताने जोरात धक्का देत पाडले. त्या पडल्यावर दुचाकीवरून खाली उतरवून त्यांच्या साखळी जबरदस्तीने ओढून घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र फिर्यादी माने यांनी गळ्यातील सोन साखळी धरून ठेवली. त्यामुळे चोरट्याने हिसका मारला त्यात सोनसाखळीचा अर्धा भाग त्याच्या हाती लागला जो ते घेऊन पळून गेला यात गळ्यातील एक टोळ्यांची ९५ हजार रुपये किमतीची सोन साखळीचा अर्धा भाग चोरी झाला. या झटापटीत फिर्यादी माने यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत पनवेल मधील करंजाडे गावातील नागेश जथन हे ५४ वर्षाचे व्यक्ती बुधवारी प्रभात फेरी मारण्यासाठी त्रिवेणी मंदिर समोरील मार्गावरून जात असता दुचाकीवर आलेल्या पैकी मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची ९० हजार रुपयांची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या घटनेत सेक्टर २० खारघर येथे राहणाऱ्या वनिता जैन या ५५ वर्षीय महिला सुनीता जैन आणि मंजू जैन या मैत्रिणीच्या समवेत घरी पायी जात होत्या. सेक्टर २१ येथील जैन मंदिर परिसरात त्यांच्या जवळ दुचाकी वर बसलेले दोन अनोळखी व्यक्ती आले . आणि काही लक्षात येण्याच्या आत वनिता यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची १ लाख ७० हजार रुपयांची सोन साखळी हिसकावून दुचाकी स्वार पळून गेले . हि घटना बुधवारी रात्री ९ च्या सुमारास घडली असून या प्रकरणी गुरुवारी मध्यरात्री खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.