नवीन वेळापत्रकानुसार एक तासानंतर लोकल

नवी मुंबई : दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या नेरुळ-खारकोपर रेल्वे मार्गावर एक डिसेंबरपासून सकाळ, संध्याकाळ वाढविण्यात आलेल्या रेल्वे फेऱ्या प्रवाशांच्या सोयीच्या असल्या तरी दुपारच्या वेळेत दोन लोकलमधील एक तासाची प्रतीक्षा ठेवल्याने प्रवाशांचा मनस्ताप वाढला आहे.

सकाळी ११.२५ वाजता सुटलेल्या खारकोपर-नेरुळ लोकलनंतर थेट एक तासाने १२. २५ वाजता दुसरी फेरी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या वेळेत प्रवास करणाऱ्या नोकरदारांना प्रवास करायचा कसा, असा प्रश्न पडला आहे. या भागातून नवी मुंबई-मुंबईत कामाधंद्यानिमित्ताने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र लोकल नसल्याने खासगी वाहतुकीतून प्रवास करावा लागत आहे. यात वेळ व पैसाही खर्च होत आहे.

नेरुळ-उरण या २६ किलोमीटर मार्गावर सप्टेंबर २०१९ मध्ये १२ किलोमीटर अंतराच्या खारकोपपर्यंत लोकल सेवा सुरू झाली आहे. उरणपर्यंत रेल्वे नेण्यासाठी काही जमीन संपादनाचा प्रश्न असल्याने हा रेल्वेमार्ग खारेकोपपर्यंतच  सुरू करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या वतीने या मार्गावर १० फेऱ्या होत आहेत.  या मार्गावरील बामण डोंगरी, खारखोपर, उलवे भागात अलीकडे खूप मोठय़ा प्रमाणात नागरिकरण वाढले असून रेल्वे सेवेमुळेच या ठिकाणी राहण्यास येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. रेल्वेने दोन वर्षांत दोन वेळा रेल्वे फेऱ्यांमध्ये बदल केलेला आहे. १ डिसेंबरपासून नोकरदारांसाठी सकाळ व संध्याकाळ लागणारी प्रवासाची वेळ पाहता फेऱ्या वाढविलेल्या आहेत. मात्र एकूण फेऱ्यांत वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे दुपारच्या वेळेतील फेऱ्या कमी करण्यात आल्या असून त्यामुळे प्रवाशांची प्रतीक्षा वाढली आहे. एक ते दीड तासाच्या फरकाने रेल्वेच्या फेऱ्या ठेवलेल्या आहेत.

परतीच्या प्रवासासाठी मोठी अडचण

रेल्वेने फेऱ्या तेवढय़ाच ठेवल्या आहेत. परंतु गर्दीच्या वेळेत फेऱ्यांच्या वेळा बदलल्या आहेत. परंतु सकाळी ११.४० नंतर नेरुळवरून खारकोपरकडे जाण्यासाठी तासाच्या अंतराने लोकल सुटणार आहे. त्यामुळे प्रवाशांना एवढा वेळ ताटकळत थांबावे लागणार आहे. त्यामुळे बदलले वेळापत्रक प्रवाशांसाठी काही उपयोगाचे नाही. परतीच्या प्रवासासाठी मोठी अडचण येत आहे, असे बामणडोंगरी येथील प्रवासी दिनेश शर्मा यांनी सांगितले. या मार्गावर प्रवासासाठी तासन्तास थांबावे लागते. त्यामुळे खासगी वाहनांतून प्रवासाचा पर्याय अनेक जण पत्करतात .

रविंद्रन एस, प्रवासी, खारकोपर

गर्दीच्या वेळेत ६ फेऱ्या केलेल्या आहेत. वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्याप्रमाणेच रेल्वेगाडय़ा सोडण्यात येणार आहेत.

अनिल जैन, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे