पनवेल – खारघर उपनगरातील येथील सेक्टर ३४ मधील ट्रायसीटी इमारतीमधून दुपारी धुराचे लोट येऊ लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली. रविवारी दुपारी एक वाजून २० मिनिटांनी सेक्टर ३४ मधील ट्राय सिटी बिल्डिंगच्या १० ते १४ व्या मजल्यावर वीजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या घटनेनंतर तातडीने अग्निशमन दलाचे जवान बंबासह आणि खारघर पोलीस घटनास्थळी काही वेळात पोहचले. नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले. अग्निशामक कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. तथापि, धुरामुळे श्वासोच्छ्वासाचा त्रास झाल्याने चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींमध्ये सुमन कुमारी नीरज भारद्वाज (३१), वाणीच नीरज भारद्वाज (९), तेजस्वी राजेश कुमार सिंग (१९) आणि यशस्वी राजेश कुमार सिंग (१६) यांचा समावेश आहे. सर्वांना तातडीने खारघर येथील मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
अग्निशामक विभाग आणि पोलिसांनी तत्परतेने मदतकार्य हाती घेतल्याने मोठे नुकसान टळले. घटनेनंतर परिसरातील रहिवाशांना तात्पुरते बाहेर काढण्यात आले होते. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास खारघर पोलिसांकडून सुरू आहे.