अकरावीच्या प्रवेशासाठी जात असल्याचे सांगून बेपत्ता, शोधासाठी पोलीस पथके रवाना

उरण शहरातील महाविद्यालयात अकरावीच्या प्रवेशासाठी जात असल्याचे सांगून घरातून गेलेली आकांशा भरणे(१७) हिच्यासह दहावीत शिकणारी तिची सख्खी लहान बहीण अनुष्का भरणे(१५) व त्यांच्याच शेजारी राहणारी १४ वीमध्ये शिकणारी त्यांची मैत्रीण सोनल पिंगळे (२१) या तिघीजणी शुक्रवारपासून बेपत्ता आहेत. या संदर्भात तिघींच्याही कुटुंबीयांनी सोमवारी रात्री उशिरा उरण पोलिसात तक्रार नोंदविली आहे. यात दोन बहिणी अल्पवयीन असल्याने त्यांच्या अपहरणाची तर त्यांच्या मैत्रिणीची बेपत्ता असल्याची नोंद करून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती दिली. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता आकांक्षा भरणे ही अकरावीत प्रवेश घेण्यासाठी घरातून निघाली. त्यानंतर उशिरापर्यंत ती न परतल्याने तिच्या आईने शोध सुरू घेत शाळा आणि परिसरात तिची चौकशी केली. त्या ठिकाणी ती न सापडल्याने त्याच शाळेत शिकणारी तिची लहान बहीण अनुष्का हिला शोधण्यासाठी त्यांची आई तिच्या वर्गात गेली असता तीही वर्गात नव्हती. त्यामुळे दोन्ही मुलींचा शोध त्यांनी सुरू केला. त्यासाठी नातेवाईकांनाही संपर्क साधला, मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. त्यामुळे शेजारीच राहणाऱ्या या मुलींची मैत्रीण सोनाली हिची चौकशी केली. तीही कॉलेजला गेल्याचे समजले. मात्र तिला याची कल्पना आहे का, असा अंदाज करीत सोनालीच्या फोनवर फोन केला असता तोही बंद आला. त्यामुळे संशय बळावल्याने या तिघींचाही शोध सुरू केला. त्या न सापडल्याने अखेरीस या दोन्ही कुटुंबांनी उरण पोलीस ठाणे गाठून पोलिसात मुली हरविल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. यासाठी तीन पोलीस पथके तयार करून शोध सुरू केल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांनी दिली. तर याचा तपास उरण पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील हे करीत आहेत.