नवी मुंबई : शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांची संख्या असताना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या परिसरातही आता अनधिकृत बांधकामांचा शिरकाव झाल्याचे चित्र आहे. याबाबत नवी मुंबई महापालिकेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना या अनधिकृत बांधकामांबाबत लेखी माहिती कळवली आहे. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. आ. गणेश नाईक यांनीही याबाबत योग्य ती तपासणी करून कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

रायगड जिल्ह्यातील चौक गावाजवळ माथेरानच्या पायथ्याशी बांधलेले मोरबे धरण हे नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे आहे. स्वातंत्र्यानंतर स्वत:च्या मालकीचे धरण असणारी नवी मुंबई ही एकमेव महापालिका आहे. धरणाच्या पाण्याची कमाल उंची ८८ मीटर असून धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ही १९०.८९ दशलक्ष घनमीटर आहे.

हे ही वाचा…खारघरमधील स्वप्नपूर्ती संकुलात अपुरा पाणीपुरवठा

आता महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणाभोवतीही अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाला सुरवात झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिकेने या धरणाच्या बफर झोनमध्येच असलेल्या बेकायदा बांधकामाबाबत जिल्हाधिकारी रायगड यांना पत्राद्वारे कळवले आहे. बेकायदा बांधकामाबाबत कडक कारवाई करण्याची मागणी आ. गणेश नाईक यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. मोरबे धरणाच्या बफर झोनमध्ये कोयना, बोरगाव नंबर १,२ अशी गावे असून पालिकेने या भागातील सर्वेक्षण केले आहे. धरणातील पाणीसाठ्याचा फुगवटा ज्या गावांच्या परिसरात जातो, त्या ठिकाणी अनधिकृत बंगल्याचे काम तसेच भराव केला असल्याचे चित्र आहे.

मोरबे परिसरातील चुकीच्या कामाची माहिती घेऊन पालिकेने ठोस कारवाई करावी. तेथील पाण्यात कोणतेही सांडपाणी किंवा इतर पाणी जाऊ नये याबाबत महापालिका आयुक्तांनी सतर्क राहून ठोस कारवाई करावी.- गणेश नाईक, आमदार, ऐरोली

हे ही वाचा…मुख्यमंत्र्यांसमोर नाईक विरोधाचा पाढा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोरबे धरणातील बफर झोनमधील अनधिकृत बांधकामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला असून योग्य ती कारवाई करण्यात येईल. – डॉ. राहुल गेठे, उपायुक्त, अतिक्रमण, नमुंमपा