नवी मुंबई : नवी मुंबईत दोन दिवसांपासून कमालीचा उकाडा जाणवत होता. उकड्याच्या चर्चेत सामान्य व्यक्तीही पावसाचा अंदाज व्यक्त करीत होता. आणि अनेकांचा हा अंदाज आज सकाळी खरा ठरला. नवी मुंबईत तांबडं फुटण्याआधीच पहाटे पासूनच पावसाला सुरवात झाली. रिमझिम पावसाने पावणे सहाच्या दरम्यान कोपरखैरणे घनसोलीत काही मिनिटं जोरदार सर कोसळली. त्यामुळे रविवारची सकाळ गारेगार ठरली. मात्र या पावसाने अनेकांचा मॉर्निंग वाॅक चुकला.

हेही वाचा : उरणमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी, प्रदूषण आणि उकाड्यापासूनही दिलासा

नोव्हेंबर म्हणजे हिवाळा मात्र नोव्हेंबरचा तिसरा आठवडा उगवला तरी हवेत गारवा दूरच उलट उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. त्यात राडारोडा वाहतूक, वाढलेली बांधकामे यामुळे धूळ प्रदूषणात वाढ झाली होती. तर रात्रीच्या वेळी कोपरखैरणे घणसोली भागात रासायनिक उग्र वासाने असह्य झाले होते. मात्र आजच्या पावसाने धूळ प्रदूषणात घट झाल्याने कितीतरी दिवसांनी निरभ्र आकाश स्वच्छ वातावरण दिसून आले. सकाळी आठ पर्यंत पावसाने विश्रांती घेतली.