उरण : बुधवारी उरण नगरपरिषदेच्या अनधिकृत बांधकाम विभाग व पोलीसांनी संयुक्त कारवाई करीत उरण शहरातील गांधी चौक ते चारफाटा करंजा मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यवसायिकांवर कारवाई केली. त्यामुळे उरण मधील रस्ते नागरिकांसाठी मोकळे झाले. याचा आंनद नागरिकांनी व वाहनचालकांनी व्यक्त केला आहे. मात्र या कारवाई नंतर काय? असा सवाल करीत काही तासांनी याच रस्त्यावर ‘ये रे माझ्या मागल्या’ म्हणत हीच दुकाने थाटली जाणार असल्याची शंकाही व्यक्त केली.

उरण शहर हे केवळ अडीच ते तीन किलोमीटर अंतराच्या परिघात आहे. मात्र या शहरातील रस्ते आणि पदपथावरील फेरीवाले, छोटे व्यावसायिक यांच्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही नित्याची बाब ठरत आहे. सुट्टी आणि सणांच्या दिवशी तर शहरातील रस्त्यांवरून चालणे ही जिकरीचे बनते. शहर आणि परिसरातील वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात ये-जा करणाऱ्यांची संख्या आणि त्यात चार आणि दुचाकी वाहनांची पडत असलेली भर याचाही परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे अनेक दुचाकीस्वार व चारचाकी वाहन चालक हे आपली वाहने बेशिस्तपणे भर रस्त्यात उभी करून खरेदीसाठी दुकानात जातात. यातील अनेकजण तर चारचाकी वाहनांतूनच रस्त्यावर खरेदी करतात.

हेही वाचा : पनवेल : २०० कोटी रुपये खर्च करुन तळोजातील डांबरी रस्ते काँक्रीटचे होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मुजोरगिरीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. याचे मुख्य कारण म्हणजे उरण नगर परिषदेकडे शहरात वाहनतळाचा अभाव आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर दोन्ही मार्गिकांवर वाहने उभी केली जात आहेत. उरण शहरातील वाहतूक, व्यवसाय यांचे नियोजन होत नसल्याने उरणच्या नागरिकांना रोजच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. मात्र बुधवारच्या कारवाईने उरण मधील नागरिक सुखावले असले तरी हा आंनद किती काळ राहील हे पहावे लागेल.