उरण : दहिहंडीचा सण दोन दिवसांवर आला असून उरणच्या विविध राजकीय आणि सामाजिक संस्था कडून दोन ते तीन लाखांच्या बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे यावर्षी लाखोंच्या बक्षिसांचे थर लागणार आहेत. यात उरण शहर, जेएनपीए कामगार वसाहत, तसेच द्रोणागिरी नोड व ग्रामीण भागात दहीहंड्या आयोजित करण्यात आल्या आहेत.
यात दहीहंडी निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,शिवसेना आणि आ. महेश बालदी मित्र मंडळ यांच्या वतीने दहीहंड्या उभारल्या जात आहेत. जेएनपीए कामगार वसाहतीत रात्र हंडीचे ही आयोजन करण्यात आली आहे. यावेळी २ लाख २२ हजार २२२ तसेच १ लाख ११ हजार १११ रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये उरणच्या नगर परिषद शाळा मैदानात थरा नुसार बक्षीस योजना असणार आहे.
यात उरण शहर आणि उरणच्या पूर्व विभागातही यावर्षी लाखांचे दही हंडीचे थर लागणार आहेत. महिन्या भरापासून दहीहंडीच्या उत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली असून या काळात जास्तीत जास्त थर लावून यश मिळविण्यासाठी गोविंदा पथका कडून रात्रीच्या वेळी सराव सुरू करण्यात आला आहे.
उरण तालुक्यातील अनेक गोविंदा पथके विशेषतः उरण शहर आणि लगतच्या गावातील पथके सध्या दहीहंडीचे सहा ते सात थर लावतात. काही पथके तर आठ थरही लावण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या परिसरात ही मोठं मोठी रोख बक्षीसे जाहीर करीत आहेत. यात उरण सारख्या परिसरातील दहीहंडी लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळीही हा खेळ खेळला जात आहे. उरण मधील अनेक गोविंदा पथके ही ठाणे,पनवेल तसेच नवी मुंबई आणि नवी मुंबईतही जाऊन थर लावीत आहेत.
ठाणे आणि मुंबई शहरापुरता मर्यादित असलेल्या दहीहंडीचा खेळ आता खेडोपाडी पोहचला आहे. त्यामुळे गावात पारंपरिक पद्धतीने खेळला जाणारा गोपाळकाला आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. यात गावातही दहीहंडीचे थर लावण्यात येत आहेत. हजारो आणि काही ठिकाणी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात येत आहेत. उरणच्या श्री राघोबा देव गोविंदा पथकाने आपला सराव सुरू केला आहे. रात्रीच्या वेळी हा सराव केला जात आहे. सद्या या पथकाकडून सहा थर लावण्यात येत आहेत. ते सात ते आठ थर यावर्षी लावण्याचा सराव करीत असल्याची माहिती कोटनाका येथील पथकाचे सहानुभूतीदार मिलिंद भोईर यांनी दिली आहे.
उत्सुक राजकीय नेत्यांचा पुढाकार
गोपाळकाला निमित्ताने जिल्हा परिषद,पंचायत समिती तसेच नगर परिषदेच्या जागांसाठी उत्सुक असलेल्या स्थानिक नेत्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या या बड्या बक्षिसांची लयलूट गोविंदा कडून यावेळी केली जाणार आहे.