लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : मुंबई ते नवी मुंबई वाहतूक सुरळीत करणाऱ्या ठाणे-वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलाच्या दक्षिण मार्गिकेचे येत्या काही दिवसांत लोकार्पण होण्याची शक्यता आहे. तसेच, हा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे समजते आहे.

ठाणे-वाशी खाडी पूल हा सर्वाधिक वाहतुकीचा आणि मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा दुवा मानला जातो. गेल्या वर्षी अटलसेतू झाल्यानंतर वाशी उड्डाणपुलावरील ताण काहीसा कमी झाला होता. तसेच उरण, पनवेलची वाहतूक अटल सेतूवरुन जात होती. परंतु शासनाच्या टोलमाफीनंतर अटल सेतूवरुन मुंबईला दररोज जाणाऱ्या १० ते १२ हजार गाड्यांची वाहतूक पुन्हा वाशी खाडीपूल मार्गाने होत आहे. मुंबईहून वाशीकडे येणाऱ्या पुलावरुन वाहतूक सुरू झाली असली तरी मानखुर्द दिशेकडील काम सुरू असल्याने मुंबईहून वाशीकडे येताना ५ लेनची वाहतूक २ लेनमध्ये वर्ग होत होती. त्यामुळे उड्डाणपुलाच्या तोंडाशी मानखुर्दपर्यंत रांगा लागत होत्या. परंतु आता हे काम पूर्णत्वास आले असून ठाणे-वाशी दरम्यानच्या तिसऱ्या पुलाचेही काम आता पूर्ण झाले आहे.

या तिसऱ्या खाडी पुलाच्या उत्तर मार्गिकेचे लोकार्पण २०२४ च्या ऑक्टोबर महिन्यात पार पडले होते. आता येत्या काही दिवसांत या पुलाच्या दक्षिण मार्गिकेचे लोकार्पण होईल. या तिसऱ्या खाडीपुलाचा एकूण खर्च ७७४ कोटी असून या दोन्ही पुलांची लांबी ही ३.१८ किलोमीटर आहे. तसेच, टोल भरण्यासाठी रांगा लागू नयेत म्हणून २० टोलबूथ देखील बसविण्यात आले आहेत.

पुलामुळे काय होणार?

वाशीवरुन मुंबईला जाताना ११ लेनची वाहतूक दुसऱ्या उड्डाणपुलाच्या तोंडाशी टोलनाक्यावर फक्त दोन लेनमध्ये वर्ग होत असल्याने सकाळी व संध्याकाळी वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत होता. परंतु, आता एल अँड टी कंपनीकडून उभारण्यात आलेल्या तिसऱ्या पुलाचे काम पूर्ण झाल्याने पुढील काही दिवसांतच वाशी उड्डाणपुलावरील सततच्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेगवान वाहतूक

वाहतूक वेगवान होण्याच्या मार्गावर नवी मुंबई, मुंबईला जोडणारा पहिला खाडीपूल १९७१ तर दुसरा खाडी पूल १९९५ मध्ये सुरू करण्यात आला होता. आता तिसरा खाडीपूल पूर्णत्वास आला असल्यामुळे वाशी मुंबई व मुंबई वाशी वाहतुकीसाठी दोन उड्डाणपुलांवर प्रत्येकी ६ लेन उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे वेगवान वाहतुकीला सुरुवात होणार आहे.