ऐन दिवाळीत वाशीतील एका उंच इमारतीच्या दहाव्या-बाराव्या मजल्यावर लागलेल्या आगीत चौघांचे प्राण गेले. ही आग विझविण्यासाठी अग्निशमनचे बंब वेळेत पोहचू शकले नाहीत. वाशी सेक्टर१४चा परिसर तसा उच्च मध्यमवर्गीय त्यामुळे नियोजन, पार्किंगची व्यवस्था अधिक चोख असायला हवी होती. त्यामुळे नियोजित भासणाऱ्या या शहराचा प्रवास ठाणे, डोंबिवलीच्या दिशेने सुरू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
मध्यंतरी शहराचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या एका मुलाखतीत शहरातील पार्किंगच्या प्रश्नावर ठोस उपायांची गरज व्यक्त केली होती. नवी मुंबई, पनवेल, उरण पट्टयात उभे राहाणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प, झपाट्याने होत असलेले नागरीकरण, गल्लीबोळात पेव फुटलेले पुनर्विकासाचे प्रकल्प, वाढणारी लोकसंख्या यामुळे नवी मुंबईतील मूळ नियोजनापुढे भविष्यात अनेक मोठी आव्हाने उभी आहेत. नऊ आणि पंधरा मीटरच्या रस्त्यांवर जादा एफएसआय मिळवून चाळीस पन्नास मजली टॉवर्स हे नवी मुंबईतील जवळपास प्रत्येक उपनगराचे भविष्यातील चित्र आहे. प्रत्येक घरामागे किती आणि कसे पार्किंगची व्यवस्था असावी यासाठी मध्यंतरी महापालिकेने आखलेली कागदपत्रीय व्यवस्था तशी बिनचूक म्हणायला हवी.
पण ही व्यवस्था ठिसूळ कशी असेल यासाठी शहरातील बिल्डरांचा एक मोठा गट सध्या कार्यरत झाला असल्याची चर्चा आहे. इमारतीत पार्किंग व्यवस्था असली तरी बाहेर कसा गोंधळ होतो हे ‘पाम बिच मार्गावरील सतरा प्लाझा वगैरे परिसरात सगळे पहातच आहेत. एपीएमसी परिसरातील या सगळ्या व्यावसायिक संकुलांची प्रवेशद्वारे आहेत ती पूर्वेकडील बाजूस. असे असताना महापालिकेतील तेव्हाच्या काही अधिकाऱ्यांनी या संकुलांसाठी ‘पाम बिच’ मार्गावरूनच प्रवेशाचा मार्ग प्रशस्त करून दिला.
रामास्वामी नामक कडक शिस्तीचे अधिकारी महापालिकेत आयुक्त म्हणून आले तेव्हा त्यांनी या संकुलांच्या भोवती भिंत टाकली जाईल अशी घोषणा केली. रामास्वामी गेले, मुंडे आले आणि आता कैलाश शिंदे यांच्याकडे आयुक्तपद आहे. रस्त्याच्या दुतर्फा सुरू असणाऱ्या या उद्योगांना गेल्या काही महिन्यात पोलीस आयुक्त भारंबे यांनी अटकाव घातला आहे. परंतु भारंबे यांची बदली झाल्यावर येथे ही ‘शिस्त’ राहीलच याची कुणालाही खात्री देता येणार नाही. एपीएमसी, सतरा प्लॉझाचे जे काही झाले तीच अवस्था नवी मुंबईच्या जवळपास प्रत्येक उपनगरात पहायला मिळते. शहरात सर्वत्र दुतर्फा पार्किंग पाहायला मिळत असून यामुळे विविध विभागात वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. विशेष म्हणजे ‘नो पार्किंग’ च्या फलकाला अजिबात न जुमानता तेथेच वाहने उभी केली जात आहेत. शहरभर नो पार्किंग फलक नुसते नावापुरते उरले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाहतूक नियोजनाची जबाबदारी असलेले पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्यावरील इतर जबाबदाऱ्यांचा ‘भार’ इतक्या दिशेने वाढला असताना नियोजनाच्या दिशेने त्यांच्याकडून फार काही भरीव कामगिरी होईल ही अपेक्षा बाळगणे तसे चुकीचे ठरेल.
वाहतुकीचा खेळखंडोबा आणि कागदी घोडे नवी मुंबईचा ‘क्विन नेकलेस’ समजल्या जाणाऱ्या पामबीच मार्ग हा वेगवान व देखणा मार्ग म्हणून प्रसिद्ध आहे. याच मार्गावर वाशी रेल्वे उड्डाणपुल सोडताच वाशी उपनगराला सुरुवात होते. या उपनगराच्या पहिल्याच सिग्नलपासून ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत बेकायदा पार्किंग पाहायला मिळते. नेरुळ उपनगरातही बेकायदा पार्किंगचा प्रश्न सातत्याने भेडसावत आहे. शहरात ‘नो पार्किंग’चे फलक लागले आहेत त्या ठिकाणीही बेकायदा पार्किंग केले जात आहे. महापालिकेने पार्किंगसाठी काही सुविधा निर्माण केल्या असल्या तरी त्या शहरातील वाहनांची संख्या पाहता तुटपुंज्या आहेत. त्यामुळे विविध उपनगरात बेकायदा गॅरेज व इतर गाड्यांच्या विविध वस्तूंच्या दुकानांपुढे बेकायदा पार्किंग होत आहे. नेरुळ येथील डॉ. डी. वाय.पाटील स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेकायदा पार्किंग होत असताना दुसरीकडे स्टेडियमच्या पाठीमागील बाजूसही दोन्ही दिशेला ‘नो पार्किंग’ फलक लावले असताना या रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा पार्किंग होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहने चालवायची कोठून असा प्रश्न आहे. मुंबईतीला वानखेडे, ब्रेबॉनचे ठीक होते परंतु नवी मुंबईसारख्या शहरात मध्यभागी असे स्टेडियम उभे केले जात असताना त्या ठिकाणच्या पार्किंग व्यवस्थेचे काय, असा प्रश्न पडू नये ?
या संपूर्ण संकुलात एकामागोमाग एक इमारतींना, संकुलांना बांधकामांच्या परवानग्या देण्याचा सपाटा लावला जात असताना वाहनांसाठीची व्यवस्था कागदावर पक्की असल्याचा दाव्यांचा बुरखा यापूर्वीही अनेकदा फाटला आहे. शहरातील नव्या बांधकामांमध्ये ३०० चौरस फुटापासून १५०० चौरस फुटांपर्यत किती पार्किंग असावी याची नियमावली मध्यंतरी महापालिकेने तयार केली. ही नियमावली कागदावर उत्तम, परंतु प्रत्यक्ष संकुल उभे राहिल्यावर वाहनांचा भार रस्त्यावरच का येतो, याचे उत्तर अधिकाऱ्यांना देता येत नाही पुढील काही वर्षात या विकास आराखड्याचे विच्छेदन झाल्यास कागदावर नियोजन बहाद्दर असलेले अधिकारी उघडे पडतील अशीच शक्यता अधिक दिसते. नवी मुंबईचे वेगळेपण या शहराच्य नियोजनात, टुमदारपणात होते. जादा चटईक्षेत्राच्या पायावर याठिकाणी उभारले जात असलेले उंच इमले हा सध्या जरी कौतुकाच विषय ठरत असला तरी या आखणीत पायाभूत सुविधांची तटबंदी मजबूत करावी लागणार आहे. नियोजनाचा सावळागोंधळ नवी मुंबईकरांना ठाण्याचा घोडबंदर आणि डोंबिवलीच्या पलावा रस्त्याची आठवण करून देणारा ठरत आहे. एक काळ अस होता नवी मुंबईचे सिंगापूर करण्याची घोषणा भलतीच गाजली होती. सध्या तरी नवी मुंबईचा प्रवास ठाणे, डोंबिवलीच्या दिशेने वेगाने सुरू झाला आहे.
