नवी मुंबई : पदपथ नव्हे तर मुख्य रस्त्याची एक मार्गिका अडवून जागोजागी वाहन कोंडीला निमंत्रण देणारे फेरीवाले, दिवाळीच्या नावाने गर्दीत दाटीवाटीच्या ठिकाणी नियमांची ऐशीतैशी करत उघडपणे होणारी ज्वलनशील फटाक्यांची विक्री, एरवी मोकळ्या भासणाऱ्या रस्त्यावर मन मानेल त्या पद्धतीने उभे राहिलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि मुख्य रस्त्याची वाटच अडवून धरल्याने संपूर्ण शहरात चोहोबाजूंनी झालेल्या कोंडीमुळे एरवी नियोजित आणि मोकळे ढाकळे शहर म्हणून ख्याती असणाऱ्या वाशीची पुरती धुळधाण उडाल्याचे चित्र गेल्या चार दिवसांपासून दिसू लागले आहे.

या अभूतपुर्व अशा कोंडीतून प्रवाशांची सुटका कशी करायची असा प्रश्न वाहतूक पोलिसांसमोर उभा राहिला असून सणासुदीच्या नावाखाली मुंब्रा, मानखुर्द, गोवंडी, कुर्ल्यापासून थेट भांडूप, कांजुरचे फेरीवालेही वाशीतील या बेकायदा बाजारात आता बस्तान मांडू लागले आहेत. ही कोंडी असताना पादचाऱ्यांची वाट अडवून सुरू असणाऱ्या बेकायदा व्यवसायामुळे वाशीसारखे शहराचे मुख्य केंद्र असणारे उपनगरच जवळपास ठप्प झाल्यासारखे चित्र आहे. वाशी कोपरखैरणे या मुख्य रस्त्यावर १५ ते २० मिनिटांचे अंतर कापण्यासाठी प्रवाशांना सकाळ, सायंकाळच्या वेळेत दीड ते दोन तासांचा कालावधी लागत आहे. विशेष म्हणजे एरवी कायद्याचे दाखले देणारे महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे आणि त्यांचे अतिक्रमण विरोधी पथक हे सगळे उघड्या डोळ्याने पहात असल्याने ‘दिवाळी आहे तर गर्दी होणारच’ असे कारण देत या बेजबाबदार कारभाराला पाठीशी घालू लागल्याचे चित्र आहे.

वाशीची दैना…राजाश्रयामुळेच?

सणासुदीच्या काळात वाशी सेक्टर नऊ परिसरातील मुख्य रस्त्यावर सणांचा बाजार भरतो हे नवी मुंबईकरांच्या एव्हाना अंगवळणी पडले आहे. यंदा मात्र हा बाजार एक-दोन नव्हे तर आठवडाभर सुरू आहे. महापालिकेच्या स्थानिक विभाग कार्यालयाने या बाजारास जणू प्रशस्त वाट करून दिल्यासारखे चित्र असल्याने कुणीही यावे आणि कुठेही बसावे असा एकंदर कारभार या भागात सुरू आहे. मुंबई, ठाण्याच्या वेगवेगळ्या भागातून वाशीत येऊन येथील पदपथांवर कब्जा मिळविणारे यापूर्वीही कमी नव्हते. सुखदेव एडवे या अधिकाऱ्याकडे महापालिकेच्या वाशी विभागप्रमुखाचे पद आल्यानंतर शहरातील महत्त्वाचे पदपथ काही प्रमाणात मोकळे झाले. मुख्य रस्त्यांच्या कडेला दिसणारे फेरीवालेही गेल्या दोन-तीन महिन्यांपासून दिसेनासे झाले होते. असे असताना दिवाळीच्या नावाने मात्र वाशीचा मुख्य रस्ता फेरीवाल्यांनाच नव्हे तर फटाके विक्रेत्यांनाही आंदण दिल्याने विभाग कार्यालयाचे ग्रह अचानक कसे फिरले, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

गर्दीत फटाक्यांचे स्टाॅल

नवी मुंबई महापालिकेने शहरातील वेगवेगळ्या उपनगरांत फटाके विक्रीसाठी जागा निश्चित केल्या आहेत. याच ठिकाणी फटाक्यांचे स्टाॅल असावेत, अशी आखणी करत कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पूर्ण काळजी त्या ठिकाणी घेतली जात आहे. असे असताना दोन दिवसांपासून वाशीतील अतिशय दाटीवाटीच्या बाजारात फटाके विक्रेतेही राजरोजपणे दिसू लागले. या विक्रीस हरकत घेण्याचा प्रयत्न विभाग कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी केला. मात्र एका राज्याच्या नवनिर्माणाची भाषा करणाऱ्या राजकीय पक्षाच्या तथाकथित कार्यकर्त्यांनी ‘दिवाळी असल्याने फटाके विकणार’ असा दम या कर्मचाऱ्यांनाच भरला. फटाके विक्रीच्या अधिकृत टापूत स्टाॅल धारकांसाठी कठोर नियमांची आखणी करणारे महापालिका प्रशासन येथे मात्र कानाडोळा करत असल्याने मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित होत आहे.

कोंडी, हतबल पोलीस

दिवाळीच्या नावाने गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला हा बाजार पदपथांवरून थेट मुख्य रस्त्यावर येऊन पोहचल्याने वाशी ते कोपरखैरणे हा मुख्य रस्ताच अडवला गेला आहे. या अतिक्रमणाने टोक गाठल्याने एरवी दिवाळीतील वाहतूक नियोजनाच्या गप्पा मारणारे वाहतूक पोलीसही हतबल झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. सकाळ, सायंकाळी गर्दीच्या वेळेत वाशी-कोपरखैरणे हा प्रवास दीड ते दोन तासांचा होऊ लागल्याने अनेकांनी शहरातील अंतर्गत मार्गावरून प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यामुळे अंतर्गत मार्ग आणि पाम बिच मार्गावरही या वाहनांचा भार वाढल्याने मागील तीन दिवसांपासून संपूर्ण शहर चहूबाजूंनी कोंडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

प्रशासनाचे म्हणणे…

महापालिका आयुक्त डाॅ. कैलाश शिंदे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. वाशी विभाग अधिकारी सुखदेव येडवे यांनी ‘कारवाई करतो’ असे उत्तर दिले. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डाॅ. कैलाश गायकवाड यांनीही या परिस्थितीतून मार्ग काढायला हवे असे सांगितले.