नवी मुंबई : सानपाडा येथील रहिवासी वाशीत जाण्यासाठी रेल्वेचा रुळ ओलांडून धोकायदाक प्रवास करीत असल्याने वाशी रेल्वेस्थानक नजीक एक पादचारी पूल उभारण्याचे काम तीन वर्षांपूर्वी हाती घेतले होते. मात्र अद्याप हे काम अर्धवट आहे. त्यामुळे नागरिकांचा धोकादायक प्रवास सुरूच आहे.

सानपाडा सेक्टर १३ ते १६ येथील नागरिकांना वाशीत यायचे असेल तर मोठा वळसा घालून किंवा रेल्वे भयारी मार्गातून जावे लागत आहे. हा त्रास नको म्हणून नागरिक रेल्वेरुळ ओलांडून धोक्याचा प्रवास करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे पादचारी पूलाची मागणी होत होती. तीन वर्षांपूर्वी या पुलाचे बांधकाम सिडकोकडून सुरू करण्यात आले होते. मात्र त्याठिकाणी केवळ पुलाचे खांब उभे राहिले आहेत. त्यामुळे रुळावरून धोक्याचा प्रवास सुरूच आहे. याबाबत सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क साधला असता रेल्वे पादचारी पुलाचे बांधकामाबाबत संबंधित अभियंत्यांकडून माहिती घेण्यात येईल असे सांगण्यात आले.

तर रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी या पुलाची जबाबदारी ही सिडको किंवा स्थानिक संस्थांकडे असेल. याबाबत चौकशी करून माहिती घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.

येथील नागरिकांना वाशीला यायचे झाले तर रेल्वे स्थानकाच्या भुयारी मार्गातून यावे लागते. त्यामुळे वाशी ते सानपाडा जोडणारा रेल्वे पादचारी पूल लवकर उभारून सुरू  करावा.

मंदार मोरे, रहिवाशी, सानपाडा सेक्टर १३.