नवी मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वाशी रेल्वे स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलिंकिंगचं काम हाती घेण्यात आलं असून, त्या अनुषंगाने मध्य रेल्वेने चार दिवसांसाठी विशेष ब्लॉक घोषित केला आहे. हा ब्लॉक मंगळवार, ५ ऑगस्टपासून शुक्रवार, ८ ऑगस्टपर्यंत रात्री १०.४५ ते पहाटे ३.४५ या वेळेत घेतला जाणार आहे. या कालावधीत वाशी ते पनवेलदरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.

ब्लॉकच्या कालावधीत हार्बर मार्गावरील अनेक लोकल सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून काही लोकल केवळ ठरावीक स्थानकांपर्यंतच धावतील. बेलापूरहून रात्री ८.५४ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल वाशीपर्यंतच धावेल, तर त्याच मार्गावरील रात्री ९.१६ ची लोकल वडाळा रोडपर्यंत चालवण्यात येईल. तसेच वांद्रे स्थानकावरून सुटणारी सीएसएमटी लोकल रात्री सुरू होऊन वडाळा रोडपर्यंतच मर्यादित राहणार आहे. पनवेलहून रात्री १०.५५ आणि ११.३२ वाजता सुटणाऱ्या पनवेल-वाशी लोकल सेवा केवळ नेरूळपर्यंत धावतील.

ब्लॉक दरम्यान काही लोकलच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आला आहे. वडाळा रोड स्थानकावरून पहाटे ५.०६ आणि ५.५२ वाजता सुटणाऱ्या पनवेल लोकल गाड्या तसेच सीएसएमटीहून पहाटे ४.५२ आणि ५.३० वाजता सुटणाऱ्या पनवेल लोकल गाड्या नेरूळ स्थानकावरून चालवण्यात येतील. त्याचप्रमाणे सीएसएमटीहून पहाटे ५.१० वाजता सुटणारी गोरेगाव लोकल वडाळा रोड मार्गावरून धावेल.

दरम्यान, या कालावधीत काही लोकल सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. वाशी स्थानकातून पहाटे ४.०३, ४.१५, ४.२५, ४.३७, ४.५० आणि ५.०४ वाजता सुटणाऱ्या अप मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आल्या असून, सीएसएमटी स्थानकातून रात्री ९.५०, १०.१४ आणि १०.३० वाजता सुटणाऱ्या डाउन लोकल सेवाही रद्द केल्या आहेत.

या बदलांमुळे प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी अद्ययावत वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे. ब्लॉकमुळे होणाऱ्या सेवा बदलांची पूर्वकल्पना घेतल्यास मोठ्या गोंधळापासून वाचता येईल, असंही प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.