नवी मुंबई – “दक्षता सप्ताह ही केवळ औपचारिकता न राहता दैनंदिन कामकाज करतानाही कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून पारदर्शकता जोपासली पाहिजे,” असे मार्गदर्शन सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले. बेलापूर येथील सिडको भवन येथे सोमवारी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सत्यनिष्ठतेची शपथ दिली.
यावेळी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनु गोयल, डॉ. राजा दयानिधी, गणेश देशमुख यांच्यासह पोलिस उपमहानिरीक्षक व मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, कार्मिक विभागाचे व्यवस्थापक विनू नायर, सिडको कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष पाटील, नितिन कांबळे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सिंघल यांनी त्यांच्या निवेदनात पारदर्शक व जबाबदार कामकाजावर भर देत भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची दिशा दाखवली. सुरेश मेंगडे यांनी दक्षता विभागातर्फे सुरू असलेल्या पारदर्शकता वाढविणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या संदेशांचे वाचन सहव्यवस्थापकीय संचालक गोयल यांनी केले.
मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस उपायुक्त अनिल घेरडीकर यांनी “लाचलुचपत प्रतिबंध” या विषयावर मार्गदर्शन केले. केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशानुसार दरवर्षी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात “दक्षता जनजागृती सप्ताह” देशभर साजरा केला जातो. यावर्षीची संकल्पना “दक्षता : आमची सामायिक जबाबदारी” अशी आहे. सिडकोतर्फे २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत या सप्ताहात प्रभात फेरी, निबंध व घोषवाक्य स्पर्धा, तसेच के. के. वरखेडकर आणि सुशील गुप्ता यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असून पारदर्शकता व प्रामाणिकतेचा संदेश दिला जाणार आहे.
