नूतनीकरणासाठी सुमारे १३ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबईचे एकमेव सांस्कृतिक व्यासपीठ असलेले वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृह नवीन वर्षांत नूतनीकरणासाठी तब्बल चार महिने बंद राहणार आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतनही सध्या बंद आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना नाटक पाहण्यासाठी थेट मुंबई किंवा पनवेल गाठावे लागणार आहे. पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सुमारे १३ कोटी रुपये खर्चाचा हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी मांडला आहे. तो बुधवारच्या सभेत मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याची लागलीच निविदा काढली जाणार आहे. या प्रक्रियेला एक महिन्याचा कालावधी लागणार असून त्यानंतर फेब्रुवारीपासून नाटय़गृह प्रेक्षकांसाठी बंद राहणार आहे.

शहराची निर्मिती करताना येथील नागरिकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी सिडकोने २० वर्षांपूर्वी १६ कोटी रुपये खर्च करून वाशी येथे मध्यवर्ती ठिकाणी (बस डेपोसमोर) भावे हे अद्ययावत नाटय़गृह उभारले. जून १९९७ मध्ये नवी मुंबई पालिकेने हे नाटय़गृह आपल्या ताब्यात घेतले. तेव्हापासून या नाटय़गृहात जुजबी सुधारणा वगळता मोठी डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे वरवर चांगल्या दिसणाऱ्या या नाटय़गृहात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. नाटकांसाठी सर्वात महत्त्वाची असलेली ध्वनियंत्रणा आणि वातानुकूलन यंत्रणा जुनी झाली आहे. तीन वर्षांपूर्वी तर एका वांद्यवृदांचा कार्यक्रम सुरू असताना व्यासपीठावरील छताला गळती लागल्याने पाण्याच्या धारा लागल्या होत्या. तेव्हापासून या नाटय़गृहाच्या डागडुजी व नूतनीकरणाचा प्रश्न ऐरणीवर होता.

मनसेने हा विषय लावून धरला होता. त्यामुळे गेली दोन वर्षे प्रशासनाने तयार केलेल्या नूतनीकरणाच्या प्रस्तावाला आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी नुकतीच मंजुरी दिल्याने हा प्रस्ताव नगरसेवकांच्या संमतीसाठी प्रलंबित आहे. बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्थापत्य व विद्युत कामाच्या १२ कोटी ७९ लाख रुपये खर्चाच्या या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यात नवीन खुर्च्या, अंधारात आसन दिसण्यासाठी प्रकाश योजनेची सोय याचबरोबर विश्रांती कक्ष, कलाकारांच्या खोल्या, नवीन कार्यालय, आधुनिक ध्वनी, प्रकाश यंत्रणा, ज्येष्ठ नागरिकांना पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी उद्वाहन, अपंगांसाठी अडथळामुक्त रस्ता, संरक्षक भिंत, पार्किंगची व्यवस्था, तिकीट आरक्षणाचे  स्वंतत्र कक्ष, वातानुकूल यंत्रणा बदलण्यात येणार आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून नूतनीकरण केले जाणार आहे. प्रेक्षक आणि कलाकारांना आवश्यक असलेल्या सुविधांचा यात अंर्तभाव करण्यात आला आहे. हे राज्यातील एक आधुनिक नाटय़गृह म्हणून ओळखले जाईल, असे काम पालिका करणार आहे.

– मोहन डगांवकर, शहर अभियंता, नवी मुंबई पालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishnudas bhave natyagruh will close for 4 months
First published on: 20-12-2017 at 02:41 IST