पनवेल – कर्नाळा बॅंक गैरव्यवहार प्रकरणात गेली चार वर्षांपासून तुरूंगात असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांची पनवेल तालुक्यातील पोसरी गावातील सूमारे १०० एकर जमीन महसूल विभागाने शुक्रवारी जाहीर नोटीसीने लिलावात काढली आहे. ५२९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार माजी आ. विवेक पाटील आणि संचालक मंडळातील सदस्यांनी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या बॅंकेतील काही गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम मिळाली असली तरी शेकडो गुंतवणूकदार आजही हक्काची रक्कम परत कधी मिळेल या प्रतिक्षेत आहेत. 

सक्तवसूली संचालनालयाने जून २०२१ मध्ये माजी आ. विवेक पाटील यांना अटक केल्यापासून ते आजपर्यंत तुरूंगातच आहेत. बोगस कर्ज प्रकरण वाटणे आणि ती कर्ज रक्कम पुन्हा बॅंकेच्या तिजोरीत जमा न केल्याचे तपास करा-या चौकशीत समोर आल्याने माजी आ. विवेक पाटील यांचे सामाजिक व राजकीय आयुष्य गेली चार वर्षांपासून तुरूंगातील गजाआड झाले आहे. सक्तवसुली संचालयन या संस्थेसोबत राज्याच्या सीआयडीने सुद्धा या प्रकरणात वेगळा गुन्हा नोंदविल्यामुळे माजी आ. पाटील यांच्या अडचणी वाढल्या.  या दोन्ही तपास यंत्रणांनी न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडल्यामुळे विवेक पाटील यांना गेली चार वर्षे जामीनही मिळू शकला नाही.  

माजी आ. विवेक पाटील यांना अटक केल्यानंतर त्यांनी या गैरव्यवहार करणा-या सरकारी तपास यंत्रणेसमोर आणि न्यायालयासमोर स्वमालकीची तसेच बॅंकेच्या मालकीच्या ८७ विविध मालमत्तांची यादी तपास यंत्रणाना दिली होती. याच मालमत्तांच्या विक्रीतून बॅंकेतील गुंतवणूकदार व इतरांची देणी भागविण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता. परंतू तोपर्यंत उशीर झाला होता. सरकारने कायदेशीर पद्धतीने बॅंक गैरव्यवहारातील रक्कम वसुलीची प्रक्रिया सुरू केली होती. शुक्रवारी पनवेलचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पवन चांडक यांनी याबाबत वर्तमानपत्रातून पोसरी गावातील सर्वे क्रमांक ५१/ १/ अ यावरील ४१ हेक्टर ६ गुंठे जमीन क्षेत्राचा लिलाव ५१ कोटी ३३ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचा जाहीर केला. सूमारे १०७ एकर जमीनीवर माजी आ. विवेक पाटील यांनी या जमीनीवर कर्नाळा चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शंकरशेठ शिवराम पाटील कृषी पणन व व्यवस्थापन महाविद्यालय उभे कऱण्यासाठी खरेदी केल्याचे लेखाशिर्षकात दाखवले होते.

पोसरी येथील जमीनीच्या लिलावासोबत मुंबई व परिसरातील मोठे गुंतवणूकदारांचे लक्ष्य कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या लिलावाकडे लागले आहे. अजूनपर्यंत तरी कायदेशीर प्रक्रियेत हा लिलाव अडकला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हाकेच्या अंतरावर सूमारे १०० मीटर रुंदीचा अकादमीसमोरील रस्ता, उड्डाणपुल तसेच पनवेल महापालिकेचे प्रशासकीय स्वराज्य या मुख्यालयाची इमारत या परिसरात असल्याने कर्नाळा स्पोर्टस अकादमीची जागा लिलावात कमी किमतीमध्ये घेणा-यांचे डोळे कर्नाळाकडे लागले आहेत. परंतू सिडको मंडळाकडून स्पोर्टस अकादमी सुरू करण्यासाठी माजी आ. पाटील यांनी घेतलेली जमीन थेट बॅंक गैरव्यवहारात अडकल्यामुळे या जमीनीची प्रत्यक्ष मालकी सिडको मंडळाची आहे. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयातून जोपर्यंत निर्देश प्राप्त होत नाहीत तोर्यंत कर्नाळा स्पोर्टस अकादमीचा लिलावाची प्रतिक्षा मोठ्या गुंतवणूकदारांना करावी लागणार आहे.

महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ मधील तरतुदी अन्यवे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने २४ नोव्हेंबर २०२२ रोजी आदेश पारित केले होते. या आदेशानुसार पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बैंकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या. या बॅंकेच्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक केली आहे.