डॉ. श्रुती पानसे

आपण माणसं केवळ दिसायलाच नाही, तर सर्व बाबतीत.. सवयी, स्वभाव, आवडीनिवडी, आचारविचारांत एकमेकांपेक्षा वेगळे असतो. याचं कारण आपल्या प्रत्येकाचं ‘ब्रेन वायिरग’ एकमेकांपेक्षा वेगळं असतं. प्रत्येकाला आलेल्या अनुभवांनुसार माणूस घडत असतो. माणसाच्या भूतकाळावर त्याचा भविष्यकाळ बऱ्याच अंशी अवलंबून असतो. एका देशातल्या सर्वसामान्य माणसांचं समूहमन दुसऱ्या देशातल्या समूहमनापेक्षा वेगळं असतं. म्हणून भारतीय माणसाचं वागणं इंग्रज, जर्मन, जपानी माणसापेक्षा वेगळं आहे, असं म्हटलं जातं. कारण तिथल्या देशांमधलं हवामान, त्यांचा इतिहास, तिथली शिक्षणाची पद्धत, सामाजिक शिष्टाचार हे वेगळं असतं. म्हणून ती जडणघडण वेगळ्या प्रकारे होते. परदेशात स्वच्छता पाळणारी आपल्याच देशातली माणसं स्वदेशात मात्र कचरा करतात. कारण ब्रेन वायिरग! ‘इथे असं चालतं’ हाच संदेश मेंदूला दिला गेला आहे. हाच नियम वेगळ्या राज्यांतल्या, वेगळ्या गावांतल्या माणसांच्या प्रतिक्रियांनाही लागू पडतो.

वर्गामध्ये शिक्षक सर्वाना एकच प्रकारे एकाच वेळेला शिकवतात; पण प्रत्येकजण स्वत:च्या अनुभवाच्या कक्षेतून बघत असतो. एखाद्या कार्यालयात एकाच पदावर कर्मचारी एकच काम करत असले तरी आपापल्या पद्धतीने करतात. सख्खी वा जुळी भावंडंही एकमेकांसारखी नसतात. कदाचित दिसायला एकसारखी असली तरी दोघांचे स्वभाव वेगळे असतात. जसजसा समाजाशी संपर्क वाढतो, तसा त्यांच्या स्वभावात, गुण-दोषांमध्ये, प्रतिक्रिया/प्रतिसादांत,अभ्यासातल्या वेगवेगळ्या विषयांत फरक पडू लागतो. याचं कारण कदाचित घरात दोघांनाही मिळणारे अनुभव एकसारखे असतील; पण वर्गात, मित्रमैत्रिणींमध्ये आणि एकूण समाजात मिळणारे अनुभव वेगवेगळे असतात.

हेच मानवजातीचं वैशिष्टय़ आहे. ही जात एक असली तरी मेंदूच्या ‘फ्रंटल लोब’मध्ये होणाऱ्या विविधरंगी न्यूरॉन्स कनेक्शन्समुळे आपण वेगळे असतो. चांगले अनुभव मिळालेला माणूस वा समाज इतरांवर प्रेम करायला शिकेल. लहानपणी त्याला कोणी समजून घेतलं असेल, तर तो इतरांना समजून घेण्याच्या शक्यता वाढतील; पण प्रेमहीन अवस्थेत, अभावग्रस्त वातावरणात, भीतीच्या छायेखाली, विषमतेला तोंड देत, हिंसेच्या वातावरणात लहानाचं मोठं झालेल्या युवकांच्या प्रतिक्रिया वेगळ्या असतील. असा समाजच मग वेगळा असेल, कारण त्यांचं ब्रेन वायिरग त्याच समाजात राहून वेगळ्या पद्धतीनं झालेलं आहे! एकूण समाजस्वास्थ्य टिकावं म्हणून प्रत्येकाच्या जडणघडणीकडे लक्ष देणं म्हणूनच आवश्यक आहे.

contact@shrutipanse.com.