पक्ष्यांचे स्थलांतर आणि नियमितपणे नेमक्या ठिकाणी परतणे, त्यांचे सकाळचे गाणे, खारूताईचे विशिष्ट काळात अन्न गोळा करणे.. अशी अनेक आश्चर्ये आपल्या सजीव सृष्टीत आढळतात. हे सर्व घडते ते शरीरांतर्गत असलेल्या नैसर्गिक जैविक घडय़ाळामुळे! पृथ्वीच्या अस्तित्वापासून हे जैविक घडय़ाळ प्रकाश/अंधाराच्या चक्रानुसार सजीवांच्या दैनंदिन शारीरिक क्रिया नियंत्रित करत असते. जैविक घडय़ाळ म्हणजे प्रत्येक सजीवाच्या शरीरात असणारी आणि पृथ्वीच्या गतीनुसार शरीराचे तापमान, झोप, संप्रेरक पातळी आणि शरीरातील विविध प्रक्रिया यांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा.

या जैविक घडय़ाळाचा एक भाग म्हणजे दैनिक लय. ही लय जन्मपूर्व विकसित होते. दैनिक लयीचे उल्लेखनीय उदाहरण म्हणजे संप्रेरक उत्पादनातील ‘स्लीप-वेक’ (झोप-जाग) चक्र! ही लय सर्व प्राणिमात्रांत प्रकाश आणि अंधाराला प्रतिसाद देत राखली जाते. ही एक नैसर्गिक अंतर्गत वेळप्रणाली असते, जी बाह्य़ संकेताशिवाय चालू राहते व प्राणी आणि वनस्पतींच्या क्रिया नियंत्रित करते. वनस्पतींमध्ये पानांची हालचाल, रोपाची वाढ, रोप रुजणे, प्रकाशसंश्लेषण या सगळ्या क्रिया दैनंदिन तालानुसार, बाहेरील प्रकाशाच्या चक्राशी जुळवून घेत सुरू असतात. ही लय शरीरातील नैसर्गिक घटक आणि स्थानिक वातावरणाशी जुळवून घेतलेली असते. विविध मोसमांत प्राणिमात्रांना अनेक तडजोडी स्वीकाराव्या लागतात; परंतु ऋतूंची निसर्गातील आखणी ठरावीक असल्यामुळे प्राण्यांना विशिष्ट मोसमासाठी स्वत:ला सज्ज करावे लागते. काही प्राण्यांच्या हालचाली ऋतूनुसार बदललेल्या असतात. उदा. निशाचर सूर्यास्ताला जागे होतात, सक्रिय होतात. हा सक्रिय असण्याचा काळ, उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जास्त होतो. याउलट, दिवसा सक्रिय असलेल्या प्राण्यांमध्ये हा काळ हिवाळ्यामध्ये कमी होतो.

ही लय असण्याला जनुकांचा संच जबाबदार असतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. शरीरातील नैसर्गिक जैवरासायनिक प्रक्रिया, मेंदूतील २४ तासांचे घडय़ाळ, त्यानुसार हालचाली करणारा प्राणी, बाहेरील प्रकाशाचे चक्र या सर्व गोष्टींचा प्राण्यांना खूप फायदा होतो. एका अभ्यासानुसार, प्रकाशसंवेदनशील प्रथिने आणि ही लय एकाच वेळी अस्तित्वात येऊन उत्क्रांत झाली असावीत.

– डॉ. नीलिमा कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org