डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

माणसाचे मन हे मेंदूचे कार्य आहे आणि त्यामुळे मेंदूचा, त्याच्या कार्याचा अभ्यास पुरेसा आहे; मनाचा वेगळा अभ्यास आवश्यक नाही, हे काही मेंदूतज्ज्ञांचे मत साऱ्यांना मान्य होत नाही. डॉ. डॅन सीगल हे त्यातील प्रमुख मेंदूशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या मते, मन ठरावीक स्थितीत ठेवल्याने मेंदूत रचनात्मक बदल दिसून येतात हे सिद्ध झाल्याने मन हे ‘मेंदूचे केवळ कार्य’ नसून ‘मेंदूलाही नियंत्रित करू शकते’ अशी ती स्वतंत्र व्यवस्था आहे. शरीरातील सर्व पेशींत ऊर्जा आणि माहिती यांचा प्रवाह असतो. हा प्रवाह नियंत्रित करणारी व्यवस्था म्हणजे मन आहे. मेंदू आणि प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचलेले मज्जातंतू हे या व्यवस्थेचे रचनात्मक भाग आहेत.

मन आणि मेंदू एकमेकांवर परिणाम करतात. मेंदूला इजा झाली तर त्याचा परिणाम मनावर दिसतोच, पण मनाचाही परिणाम या आघात झालेल्या मेंदूवर काही काळाने दिसून येतो. मन भावनिक समतोल साधू शकले तर मेंदूतील विकृती लवकर बरी होते. डॉ. सीगल यांच्या मते, या दोन्ही घटकांवर नातेसंबंध हा तिसरा घटकदेखील परिणाम घडवत असतो. शैशवावस्थेत प्राण्यांबरोबर राहावे लागलेल्या मुलांचे मेंदू आणि मन यांचा अभ्यास केला तर हे स्पष्ट होते. मानसोपचार आणि समुपदेशन मनावर परिणाम करू शकतात याचे हेच कारण आहे. त्यामुळे नातेसंबंध, मन आणि मेंदू यांचा एकत्र विचार करणे आवश्यक आहे.

लक्ष कुठे द्यायचे आणि कुठे नाही याचा निर्णय मन घेते; पण त्याचा परिणाम मेंदूवर होतो. लक्ष कुठे द्यायचे याचे स्वातंत्र्य माणसाला आहे; मात्र ते विकसित होण्यासाठी कुणी तरी माहिती, प्रेरणा द्यावी लागते. यासाठी नातेसंबंध महत्त्वाचे ठरतात. नाते माणसाला घडवते किंवा बिघडवते. मैत्री हे जसे नाते आहे तसेच शत्रुत्व हेही नातेच आहे. केवळ दुसऱ्या माणसाविषयीच नाही, तर संपूर्ण सृष्टीशी असलेले मैत्रीचे नाते मनात उन्नत भावनांना जन्म देते. या उन्नत भावनांचा परिणाम मेंदूवरही होतो. याउलट, द्वेष माणसाला युद्धस्थितीत ठेवतो. माणूस सतत संघर्षांच्या भूमिकेत राहिला तर त्याचे दुष्परिणाम मन आणि मेंदूवर होतात. याचसाठी संपूर्ण सृष्टीशी केवळ संघर्षांचे नाते न ठेवता माणूस या सृष्टीचाच अविभाज्य घटक आहे असे नाते विकसित झाले तरच माणसाला भविष्य आहे, असा इशारा डॉ. सीगल देतात.