प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी संघर्ष हा करावा लागतोच. फुलपाखराला तो अधिक करावा लागतो.  फुलपाखराचे आयुष्य चार अवस्थांमधून जाते. अंडी, अळी, कोष आणि पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू या चार अवस्था होत.

मुंग्या, गांधीलमाशा, टोळ हे फुलपाखरांच्या अंडय़ाचे प्रमुख शत्रू. हे कीटक, आपापल्या शरीरातील शुक्रजंतू या अंडय़ांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतात. या कीटकांसारख्या कोणाच्याही नजरेत येणार नाहीत, अशा ठिकाणी अंडी असणं हाच काय तो फुलपाखराच्या अंडय़ांचा बचावात्मक उपाय. म्हणूनच पानांच्या खालील बाजूस फुलपाखरे अंडी घालतात.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
parents stand when it comes to selecting modelling career for their children
चौकट मोडताना : कचाकड्याचे जग
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…

कोतवाल, साळुंकी, वेडाराघू, वटवटय़ा यासारख्या पक्ष्यांचे अत्यंत आवडते अन्न म्हणजे फुलपाखराची अळी. ही अळी पौष्टिक तर असतेच, परंतु तिची प्रतिकारक्षमता नगण्य असते. खाद्य वनस्पतीच्या पानांशी एकरूप होऊन पराकोटीचे साधर्म्य साधणे तसेच शत्रुपक्षाची चाहूल लागताच अत्यंत उग्र दर्प सोडणे, अंगातील विष आणि अत्यंत बेंगरूळ रूप ही तिची बचावाची प्रमुख नैसर्गिक शस्त्रे. योग्यवेळी योग्य त्या शस्त्राचा वापर करून स्वसंरक्षण करण्याचे ज्ञान फुलपाखरापाशी उपजतच असते.

कोष अवस्थेमध्ये मुंग्या, चतुर, साप हे यांचे प्रमुख शत्रू.  फुलपाखरांच्या कोषामधील द्रव मुंग्या, चतुर यांना विशेष प्रिय;  तर  हे कोष म्हणजे सापाचे अन्नच. ज्या  ठिकाणी हा कोष आहे त्या ठिकाणाचे, मिळते-जुळते रंग प्राप्त करून घेऊन, वातावरणाशी एकरूपता, ही स्वसंरक्षणाची पद्धत.

पूर्ण वाढ झालेल्या फुलपाखराचे कोळी, पाल, सरडे हे शत्रू. कोळ्याचे जाळे म्हणजे त्याचा शॉपिंग मॉल आणि फुलपाखरू म्हणजे ग्राहक होय. फुलपाखरांच्या पंखांच्या मागील बाजूला डोळ्यासदृश असलेले नक्षीकाम, यामुळे डोळा समजून त्यावर पाठीमागून हल्ला होतो, परंतु यात त्याचा जीव बचावतो. उर्वरित आयुष्य त्याला फाटक्या पंखांच्या वरच काढावं लागतं. त्याच प्रमाणे काही फुलपाखरं पंख मिटून बसल्यावर, झाडाच्या वाळक्या पानाप्रमाणे एकरूप होतात आणि शत्रूपासून संरक्षण करतात.

‘धरू नका ही बरे, उडती फुलांवरी फुलपाखरे’ या काव्यपंक्ती, मनुष्य आणि फुलपाखरे यांच्यातील संबंधावर खूपच बोलक्या आहेत. अशास्त्रीय पद्धतीने फुलपाखरे पकडू पाहणारी माणसे, हीदेखील फुलपाखराचे शत्रूच ठरतात.

– दिवाकर ठोंबरे  मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org