News Flash

कुतूहल: रसायन सफर संपताना..

‘कुतूहल’ हे सदर २००६ सालापासून सातत्याने चालू आहे. या सदरासाठी एक विषय ठरवून वर्षभर हे सदर चालवलं जातं.

| December 29, 2014 12:31 pm

कुतूहल: रसायन सफर संपताना..

‘कुतूहल’ हे सदर २००६ सालापासून सातत्याने चालू आहे. या सदरासाठी एक विषय ठरवून वर्षभर हे सदर चालवलं जातं. नेहमीच्या प्रथेप्रमाणे २०१४ या वर्षी ‘कुतूहल’साठी ‘दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र’ हा विषय घेण्याचं ठरलं. या विषयात रोजच्या वापरातील वेगवेगळ्या रसायनांची ओळख, त्या रसायनांपासून असणारे धोके, त्या रसायनांचा वेगवेगळ्या दृष्टीनं होणारा वापर, इत्यादी मुद्दे वाचकांसमोर मांडून त्यांना रसायनांच्या दुनियेत सफर घडवून आणण्याचा मानस होता.
खूपदा आपण रसायन हा शब्द वापरत असतो, पण वेगळ्या अर्थानं. ‘फळांना हल्ली चवच नसते, कारण ती रसायन वापरून पिकवतात ना! रासायनिक खतांचा अति वापर केल्याने जमिनी नापिक बनल्या आहेत.’ अशा प्रकारचा संवाद आपण नेहमीच ऐकतो. त्यामुळे रसायनांचा वापर म्हणजे काहीतरी वाईट परिणाम असणारच अशी खूणगाठ आपल्या मनात बसली आहे. याच हेतूने लिहिलेलं की काय, एक पुस्तक ‘रसायनविरहित जीवनासाठी’ वाचनात आलं. मनात प्रश्न पडला, रसायनविरहित जीवन शक्य आहे? पाण्याला आपण ‘पाणी हेच जीवन’ आहे असं म्हणतो. केवळ मानवाच्या रोजच्या जीवनातील महत्त्वाचा घटक नसून संपूर्ण सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असणारा घटक आहे. त्यामुळे पाणी हे रसायन आहे, हे पटायला जड जातं. पाण्याप्रमाणेच इतर अनेक पदार्थ आपल्या रोजच्या वापरात असल्याने त्यातही रसायनांचा समावेश आहे याची जाणीव नसते.
हे सदर सर्वसामान्यांना समजावं अशी अपेक्षा असेल तर रसायनशास्त्रातील रसायनांची रेणुसूत्रे, अणू-रेणूंची रचना, अभिक्रियेचे रासायनिक समीकरण यांचा समावेश न करता रोजच्या जीवनातील रसायनशास्त्र मांडायचं म्हणून लेखकांच्या समोर मोठं आव्हान होतं, हे सदर सुरू होण्याआधीच जाणवलं. या सदरासाठी तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करणाऱ्या मराठी विज्ञान परिषदेच्या माजी कार्यवाह डॉ. मानसी राजाध्यक्ष यांनी ‘सर्वसामान्यांना समजावं’ हा मुद्दा बिलकूल बाजूला पडू दिला नाही. याचबरोबर सर्वसामान्यांना समजावं म्हणून त्यातील रसायनशास्त्राकडेही दुर्लक्ष केलं नाही.
हे सदर विज्ञान न शिकलेल्या व्यक्तीलाही उपयोगी वाटावं म्हणून नेहमीच्या वापरातील रसायनं घेण्यात आली. पण पुन्हा अडचण. या रसायनांच्या माहितीसाठी संदर्भ मिळणे कठीण, आणि त्यातही मराठीतून तर दुर्मीळ. आवश्यक रसायनांचा योग्य वापर करून आपण आपले जीवन सुसहय़ करू शकतो हे वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या सदरातून गेले वर्षभर सातत्यानं केला गेला. या सगळ्या समस्यांवर मात करून अनेक लेखकांनी रसायनांची उपयुक्त माहिती देऊन हे सदर यशस्वी केलं असं वाचकांच्या प्रतिसादावरून नक्कीच म्हणता येईल. याचबरोबर वेळेअभावी काही महत्त्वाचे विषय राहून गेल्याचं मान्य करावंच लागेल.

मनमोराचा पिसारा: ..तो हा वैद्यक शास्त्री राजेन्द्र!
लेखन हा पूर्ण वेळचा व्यवसाय नसतानादेखील दैनिक सदर लिहिणं हे तगडं आव्हान असतं. असं सदर लिहिण्याचं राजेन्द्रचं हे चौथं वर्ष. ‘‘कसं काय बुवा तुम्हाला असं सुचतं’’, या प्रश्नाचं उत्तर म्हटलं तर सोपं नाही तर फार अवघड. जसा राजेन्द्र तसं त्याचं लिहिणं. ज्याबद्दल लिहायचं, त्याचं सतत मनन आणि चिंतन, आणि त्यामुळे उत्तम आकलन डोक्यात सदैव तयार. जे करायचं त्याच्याशी त्या क्षणी संपूर्ण तन्मयता आणि एकाग्रता. लिहायचा कागद, पेन, वेळ, जागा, मूड- सर्व काही जे असेल ते!
आधीच मनोविकारतज्ज्ञ, आणि तशात लेखक! निरनिराळी पुस्तकं, दुर्मीळ पुस्तकांच्या ऑड आकाराच्या फोटो कॉपीज, कसली तरी टिपणं, तीही बहुधा पाठकोऱ्या कागदांवर काढलेली; आगापिछा चटकन लक्षात येऊ नये अशा चिटोऱ्यावरच्या नोंदी. एक-दोन लॅपटॉप आ वासून बसलेले, आणि घरभर विखुरलेले पेनड्राइव्ह. असा झकास पसारा आमच्या घरभर असतो. बाहेर पसारा दिसत असला तरी डोक्यात लॉ आणि ऑर्डर आहे, अशी वर तो मखलाशीही करतो.
बहुतेक लेखन वाचून दाखवताना मला कसं रिअ‍ॅक्ट करायचं याच्या स्पष्ट पूर्वसूचना असतात : म्हणजे ‘मी पूर्ण नव्याने लिहायला तयार आहे.’ ‘हे कसं वाटतंय आणि त्यात काय करावं ते सांग.’ ‘याचं खूप कौतुक करायचं आणि बदल सांगायचे नाहीत. मी नाही करणार बदल.’ तरीही त्याने आपले दृष्टिकोन निर्भीडपणे मांडावेत, आणि त्यांच्या लोकप्रिय असण्या-नसण्याचा फार बाऊ करू नये, असा आग्रह मी करतेच. मात्र मी करते त्या कवितांच्या भावानुवादातलं त्याला फारसं काही कळत नसल्यामुळे त्यामध्ये मी त्याला जराही ढवळाढवळ करू देत नाही!
तसं तर त्याला कुठलंच लेबल लावता येणार नाही; पण लावायचीच झाली तर किती तरी लावावी लागतील. त्याची जीवनशैली साधी, पण टायचं  कलेक्शन खास जगभरातून केलेलं. वाळक्या पानापासून ते देश-विदेशच्या घंटांपर्यंत काय काय जमवण्याचा छांदिष्टपणा करेल सांगता येत नाही! कृष्णमूर्ती वाचण्यापासून ते टीव्हीवरच्या उथळ कौटुंबिक मालिकांच्या संवादांची नक्कल करण्यापर्यंत सगळं करण्यात रुची आणि गती! रस्त्यावरच्या मांजरांशी फ्लर्ट काय करेल! व्यवसायातल्या अनुभवांनी अंतर्मुखपणे मिटता मिटता, फेसबुक नाहीतर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये धमाल मिसळेल! नाचेल! क्लिनिकमधल्या सहकाऱ्यांचा लाडका सर!
साध्याही विषयात कवीला मोठा आशय आढळतो. पण राजेन्द्र केवळ कविकल्पनेच्या भराऱ्या मारत नाही. तो ना केवळ समाजाचा तटस्थ निरीक्षक, ना आर्म चेअर फिलॉसॉफर, ना निव्वळ मानसशास्त्राचा अभ्यासक. तो प्रॅक्टिसिंग मनोविकारतज्ज्ञ आहे. समोरच्या व्यक्तीशी, तिच्या समस्येशी त्याची बांधीलकी असते. आणि त्या व्यक्तीला समजेल अशा भाषेत, वास्तवाचं भान असणारा, मार्गदर्शन करणारा, मोठा आशय थोडक्यात मांडणं ही त्याची जबाबदारी असते. उत्तम गवई साडेतीन मिनिटांतसुद्धा खूप काही गाऊ शकतो. तसंच हे. शब्दांच्या मर्यादेत बहारदार लिहू शकतो, तो हा वैद्यक शास्त्री राजेन्द्र.
ललिता बर्वे

प्रबोधन पर्व: सर्वागीण चिकित्सेची सुरुवात
गेले वर्षभर या सदरातून प्रबोधनाचा जागर जागवायचा प्रयत्न केला गेला. त्यासाठीचा विचार-वारसा १९व्या शतकातील बाळशास्त्री जांभेकर, न्या. रानडे, लोकहितवादी, चिपळूणकर, महात्मा फुले यांसारख्या अनेकांनी दिला. १९व्या शतकाची सुरुवातच मुळी  आधुनिक युगाने झाली. तोपर्यंतचा महाराष्ट्रीय समाज मध्ययुगीन कल्पनाकोशातच अडकून पडला होता. समाज व्यवहारात धर्माचे प्राबल्य होते. गतानुगतिकतेने समाज जीवनाचा गाडा चालू होता. जीवनाच्या जवळपास सर्वच क्षेत्रांत धर्म नामक संस्थेचा वरचष्मा होता. जाती व्यवस्था, वर्णभेद, स्त्री-पुरुष विषमता यांसारख्या गोष्टी ईश्वरनिर्मित आहेत असा समज दृढमूल झाला होता. या गोष्टींना दैवी अधिष्ठान लाभले होते.
थोडक्यात, शास्त्रप्रामाण्य आणि रूढीप्रामाण्य यामुळे सबंध समाजच दिशाहीन आणि गतिहीन अवस्थेला आला होता. कुठलाही नवा विचार तर सोडाच, पण छोटय़ा-छोटय़ा बंडांनाही तो चिरडून टाकायला मागेपुढे पाहत नसे. दलित-स्त्रियांची अवस्था तर फारच शोचनीय होती. एक प्रकारे रानटी अवस्थेकडे समाज झुकला होता.
कुठलाही समाज अशा अवस्थेला पोहोचला की त्याला त्यातून बाहेर काढायचा एकच मार्ग असतो आणि तो म्हणजे त्या समाजाला मोठय़ा प्रमाणावर पराभवाचा सामना करावा लागला, मानहानी पत्करावी लागली तर त्याच्या स्वाभिमानाला आव्हान मिळते.. त्याला जाग येते. ब्रिटिशांच्या सत्तेमुळे महाराष्ट्रीय समाजाला पाश्चात्त्य ज्ञान-विज्ञानाची माहिती व्हायला सुरुवात झाली, तर दुसरीकडे ब्रिटिशांच्या ख्रिस्ती धर्मोपासकांनी िहदू धर्माच्या तुलनेत त्यांचा धर्म कसा न्यायी आहे हे सांगायला सुरुवात केली. यातून महाराष्ट्रीय समाज प्रबोधनाला सुरुवात झाली. इंग्रजी शिक्षणाने सुविद्य झालेल्या महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांनी अन्तर्मुख होऊन आपल्या समजाकडे पाहायला, त्यातील खटकलेल्या गोष्टींवर लिहायला-बोलायला सुरुवात केली. पाहता पाहता त्याला चळवळीचे स्वरूप आले आणि सर्वागीण चिकित्सेला सुरुवात झाली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2014 12:31 pm

Web Title: chemical journey in curiosity
टॅग : Curiosity
Next Stories
1 मानवनिर्मित तंतूंचे रंग
2 कृत्रिम रंग
3 नैसर्गिक रंग
Just Now!
X