हेलियम हे आवर्तसारणीतील दुसऱ्या क्रमांकाचे मूलद्रव्य. तसेच हे हायड्रोजनच्या खालोखाल विश्वात सर्वात मोठय़ा प्रमाणावर आढळणारे मूलद्रव्य आहे. मात्र, इतर मूलद्रव्यांप्रमाणे याचा शोध पृथ्वीवर न लागता सूर्यावर लागला. १८६०-७० च्या काळात वर्णपटशास्त्राचा विकास होत होता. वर्णपटात दिसणाऱ्या रेषांद्वारे विविध मूलद्रव्यांचे अस्तित्व कळू शकत असल्याने, त्याकाळात सूर्य हे एक वर्णपटशास्त्राचे महत्त्वाचे लक्ष्य होते. खग्रास सूर्यग्रहणात सूर्यबिंब जरी पूर्णपणे झाकले जात असले, तरी सूर्यबिंबाभोवतालचे वातावरण त्यावेळी स्पष्ट दिसते. त्यामुळे खग्रास सूर्यग्रहणाच्या काळात सूर्याभोवतीच्या वातावरणाचा वर्णपट घेणे शक्य होणार होते. १८ ऑगस्ट १८६८ रोजी झालेले खग्रास सूर्यग्रहण भारतातूनही दिसले. फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ ज्यूल्स जॅन्सेन याने भारतातील गुंटूर (आंध्र प्रदेश) या ठिकाणाहून हे खग्रास सूर्यग्रहण अभ्यासले.

सूर्याभोवतालच्या वातावरणाच्या वर्णपटात जॅन्सेनला हायड्रोजन वायूच्या वर्णपटावर एक पिवळ्या रंगाची तेजस्वी रेषा आढळली. यानंतर दोन महिन्यांनीच, नॉर्मन लॉकयर या ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञालाही सूर्यावरून उफाळलेल्या एका ज्वालेच्या वर्णपटात हीच रेषा दिसली. सोडियम या मूलद्रव्यामुळे निर्माण होणाऱ्या रेषांना या अगोदरच ‘डी १’ आणि ‘डी २’ ही नावे दिली गेली होती. त्यामुळे सोडियमच्या दोन रेषांच्या जवळच असणाऱ्या या तिसऱ्या रेषेला ‘डी ३’ या नावाने संबोधले गेले. इंग्लिश रसायनतज्ज्ञ एडवर्ड फ्रँकलँड याने हायड्रोजनसह इतर विविध वायूंचा, वेगवेगळ्या दाबाखाली व वेगवेगळ्या तापमानाला वर्णपट घेऊन त्यांचा तपशीलवार अभ्यास केला. परंतु या वर्णपटांतही ही ‘डी ३’ रेषा सापडू शकली नाही. यावरून, ही रेषा पृथ्वीवर अस्तित्वात नसलेल्या एखाद्या मूलद्रव्याची असावी असा निष्कर्ष लॉकयरने काढला. या मूलद्रव्याला ‘हेलिऑस’ या सूर्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्रीक भाषेतील शब्दावरून ‘हेलियम’ हे नाव दिले गेले.

त्यानंतर पृथ्वीवर हे मूलद्रव्य शोधण्याचे अनेक प्रयत्न झाले. अखेर १८८२ साली उद्रेक झालेल्या इटलीतल्या ‘माऊंट व्हेसुव्हिअस’ या ज्वालामुखीच्या राखेच्या विश्लेषणात, इटलीच्या लुइगी पाल्मिरी या संशोधकाला वर्णपटाद्वारे या मूलद्रव्याचे अस्तित्व दिसून आले. त्यानंतर स्कॉटिश संशोधक विल्यम रॅमसे आणि इतरांना १८९५ साली युरेनियमच्या क्लेव्हाइट या खनिजातील पोकळ्यांत अडकून पडलेल्या वायूच्या वर्णपटाद्वारे केलेल्या विश्लेषणातही हेलियम हे मूलद्रव्य सापडले आणि हेलियमच्या शोधाची कथा सुफळ संपूर्ण झाली!

 डॉ. वर्षां चिटणीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org