कधी कधी काही मजेदार एककं मुद्दाम तयार केली जातात. अश्वशक्ती (हॉर्सपॉवर) हे शक्ती मोजण्याचं एक परंपरागत एकक. पण घोडय़ांसारखी गाढवंही सामानाची ने-आण करायला वापरतात. मग गर्दभशक्ती (डाँकीपॉवर) का नाही? काही जणांनी मात्र हे एकक गंभीरपणे वापरायला घेतलं, आणि एक गर्दभशक्ती म्हणजे एकतृतीयांश अश्वशक्ती अशी त्याची व्याख्यासुद्धा करून टाकली.

असंच एक ऊर्जेचं एकक आहे पायरेट निजा – संगणक खेळांमधली दोन नामांकित पात्रं. मंगळावर तिकडच्या एका दिवसात खर्च होणारी एक किलोवॉट/तास  ऊर्जा म्हणजे एक   पायरेट निजा ऊर्जा. नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबमध्ये अवकाश मोहिमा आखताना तंत्रज्ञ या एककाचा उल्लेख करतात असं ऐकिवात आहे. मंगळावर आपण जाऊ तेव्हा जाऊ, पण शास्त्रज्ञांची तयारी मात्र जोरात चाललेली दिसते!

‘बीअर्ड सेकंद’ असंही एक विनोदी एकक आहे. एका सेकंदात दाढीचा केस जितका वाढेल, तितकी लांबी म्हणजे दाढी-सेकंद. आता या विचित्र एककाचा उपयोग काय असं जर तुम्हाला वाटत असेल, तर याचा वापर खरोखरच होतो. अतिसूक्ष्म इलेक्ट्रॉनिक घटकांनी बनलेल्या इंटिगट्रेड सíकटमध्ये सूक्ष्म लांबी बऱ्याचदा नॅनोमीटर या रूढ एककात मोजली जाते. पण कधी कधी मजा म्हणून ती दाढी-सेकंदातही मांडली जाते.

एक दाढी-सेकंद म्हणजे नक्की किती यावर मात्र जरा वाद दिसतात. काही ठिकाणी दहा नॅनोमीटर तर काही ठिकाणी पाच नॅनोमीटर असं मापन दिसतं. स्वाभाविक आहे, प्रत्येकाची दाढी एकसारख्या वेगाने थोडीच वाढणार?

भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर हे एकक वापरलं जातं. पण त्यासाठी एक गमतीचं एकक आहे रिक्टस. भूकंपाचं माध्यमात किती वार्ताकन केलं जातं याचं हे एकक आहे. एक रिक्टस तीव्रतेच्या भूकंपाची फक्त स्थानिक वृत्तपत्रात दखल घेतली जाते. तर सर्वात जास्त, म्हणजे पाच रिक्टस तीव्रतेच्या भूकंपाला देशभरात प्रसिद्धी मिळते. केवळ बातमीच नाही, तर साप्ताहिकांमध्ये, मासिकांमध्ये त्यावर लेख येतात. त्याची खास वार्तापत्रं टीव्हीवर सतत दाखवली जातात. आणि पुढे या भूकंपावर लगेचच पुस्तकं देखील लिहिली जातात!

– मेघश्री दळवी 

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

महाश्वेतादेवींचे कादंबरी लेखन

आपल्या अवतीभोवतीचे सत्य, वास्तव जाणून घ्यायचं तर महाश्वेतादेवींच्या कथा, कादंबऱ्या वाचायलाच हव्यात. आजच्या ग्लोबलायझेशनच्या काळातही विषमतेची दरी अजूनही अस्तित्वात आहे. हे भीषण वास्तव लख्खपणे त्यांच्या साहित्यातून समोर येतं.

महाश्वेतादेवींच्या ४५ कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या, त्यापैकी पहिली  ‘झाँशीर रानी’ १९५६ मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर ‘नटी’, ‘आंधारमानिक’, ‘जंगल के दावेदार’, ‘अग्निगर्भ’, ‘हजार चुराशिर माँ’ (१९७४), अरण्येर अधिकार (१९७०), ‘प्रत्येक चौपन्न मिनिटांगणिक’, ‘आय.पी.सी. ३७५’, इ. कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असून, मराठी अनुवादही प्रसिद्ध झाले आहेत. महाश्वेतादेवींचे एकूणच लेखन विविध स्तरांवरील संघर्षांचे दाहक अनुभव देणारे आहे.

‘हजार चुराशिर माँ’ या कादंबरीवरील चित्रपटही प्रसिद्ध आहे. मराठी अनुवादही वाचकप्रिय आहे. एक नक्षलवादी तरुण व्रती आणि त्याची सुशिक्षित आई सुजाता यांच्यातील मानसिक आंदोलनाची ही कथा आहे. आपला साध्या मनोवृत्तीचा मुलगा नक्षलवादी चळवळीत का व कसा ओढला जातो? त्याच्या मनातील ही आंदोलनं आपल्याला समजली नाहीत याचं दु:ख या आईला आहे. अन्यायाविरुद्ध आपल्या भावाच्या, वडिलांच्या एकूणच चंगळवादी संस्कृतीच्या विरोधात लढा देताना तो बळी पडतो. हे आईला समजूच शकत नाही. हे असे कसे घडले? का? या प्रश्नांची उत्तरेच तिला मिळत नाहीत. एका पराजित आईची ही शोकांतिका आहे. बळी पडलेल्या या मुलाची ओळखही न देता, एक बेवारशी प्रेत म्हणून ओळख नाकारणाऱ्या व्रतीच्या वडिलांची व्यक्तिरेखा तर विलक्षण वास्तवच आहे. हे सारं वाचून अनुत्तरित प्रश्नांच्या वादळाने वाचकही अंतर्मुख होऊन जातात.

‘आय.पी.सी. ३७५’ या कादंबरीचा मराठी अनुवाद प्रसिद्ध आहे. आज या देशाची स्थिती काय आहे? तर ढोंगी, स्वार्थी, राजकारणी, त्यांच्या स्वार्थासाठी त्यांनी वाममार्गाला लावलेली तरुण पिढी, स्वामी, बापू, गुरू, महागुरूंचे विशाल, भव्य आश्रम, अंधश्रद्धाळू सामान्य जनता, सामान्य माणसांची डोळेझाक, वेगाने वाढत जाणारी तर्कशून्य, विचारशून्य अंधश्रद्धा अशा या १९७९च्या सुमारासच्या अस्वस्थ काळाचं चित्रण असलेली ही कादंबरी आहे. ‘अरण्येर अधिकार’ या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरीचा मराठी अनुवादही प्रसिद्ध झाला आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच  ‘हो’ या आदिवासी भाषेतदेखील या कादंबरीचा  अनुवाद झाला आहे.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com