कुतूहल : जनावरांची देखभाल
जनावरे माणसाला अखाद्य असलेले वनस्पती उपपदार्थ खाऊन त्याला प्रथिनयुक्त, सुलभरीत्या पचन होणारे दूध, मांस असे पदार्थ परत देतात. तसेच इतर बाबी जसे खते, औषधे, सुशोभित वस्तू, चामडे इत्यादीही देतात. त्यामुळे जनावरांची देखभाल करणे अत्यंत महत्त्वाचे असते.
तहान लागल्यावर जनावरांना ताबडतोब प्यायला पाणी मिळाले पाहिजे. रवंथ करणाऱ्या जनावराला एक-दोन तास रवंथ केल्यावर भरपूर तहान लागते. आपल्याकडे बऱ्याचदा ही बाब दुर्लक्षित राहते. जनावराला संतुलित, पचेल असा पुरेसा आहार वेळेवर मिळणे आवश्यक असते. आहारात ओला हिरवा चारा, सुका चारा यांचा समावेश प्रामुख्याने होतो. चाऱ्यात एकदल (पात), द्विदल (पाने), प्रक्रिया केलेला मुरघास (सायलेज) हे प्रकार असतात. हा चारा कुट्टी केलेला पाहिजे. तसे न केल्यास ३० ते ३५ टक्के चारा वाया जातो. आहारात तेलपेंडी, धान्यभरडा, द्विदल चुळी, भुसा, जीवनसत्त्वे, खनिजे, मीठ, मळी, खाद्यपुरके यांचे मिश्रण असणे महत्त्वाचे असते.
जनावरांना हवेशीर निवारा पाहिजे. बसण्या-उठण्यासाठीची जमीन निसरडी, खाचखळग्यांची नसावी. जनावरांचे उष्ण-थंड वारे, ऊन, पाऊस यांच्यापासून संरक्षण व्हावे. निवारा व जनावरे स्वच्छ असावीत. दूध देणाऱ्या जनावरांच्या कांसेची विशेष काळजी घ्यायला हवी. उवा, लिखा, तांबवा, गोचिडय़ा, चावऱ्या माश्या, डास इ. बाह्य़ कीटकांपासून त्यांचे संरक्षण व्हावे. तसेच शरीरातील वेगवेगळ्या कृमी तसेच जंत यांपासून जनावरांचे प्रतिबंधन व्हावे, यासाठी त्यांचे घटसर्प, फऱ्या, आंत्रविकार, लाळखुरकत इ. रोगप्रतिबंधक लसीकरण वेळीच करणे अत्यावश्यक आहे.
गोठय़ातील सांडपाणी, मलमूत्र, वाया गेलेला चारा यांची योग्य विल्हेवाट लावावी. मृत जनावरांची विल्हेवाट गोठय़ापासून, गाव-वस्तीपासून दूरवर करायला हवी. कृत्रिम वा नसíगक रेतन योग्य वेळी करून जनावरांच्या माद्या वेळेवर गाभण कशा राहतील याकडे लक्ष द्यायला हवे. जन्मलेल्या वासरांची व रेडकांची पहिल्या सहा तासांपर्यंत विशेष काळजी घ्यायला हवी. जनावरांची देखभाल करताना पशू वैद्यकीय व्यक्तीची मदत घ्यायला हवी.
डॉ.वासुदेव सिधये (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
आजचे महाराष्ट्रसारस्वत ३१ मे
१९१० > ‘फास्टर फेणे’कार भास्कर रामचंद्र भागवत यांचा जन्म. याखेरीज अनेक स्वतंत्र, तर त्याहून अधिक भाषांतरित पुस्तके लिहून कुमारवाचकांचे विश्व त्यांनी समृद्ध केले.
१९३८ > ‘मराठी नाटय़कोश’ तयार करणारे नाटय़-अभ्यासक व समीक्षक विश्वनाथ भालचंद्र देशपांडे यांचा जन्म. ‘नाटककार खानोलकर’, ‘निवडक नाटय़प्रवेश’, ‘निवडक नाटय़मनोगते’ तसेच अन्य पुस्तके त्यांनी संपादित केली, स्वतंत्र समीक्षाही केली.
१९४५> इंग्रजी व मराठी साहित्याचे अभ्यासक, समीक्षक डॉ. जयंत भानुदास परांजपे यांचा जन्म. ‘श्री ना पेंडसे : हस्तलिखित आणि परिष्करणे’ या ग्रंथासाठी त्यांना नागपूर विद्यापीठाची डी. लिट्. मिळाली. ‘ग्रेस आणि दुबरेधता’ हा ग्रेस यांचे काहीसे मूर्तिभंजनही करणारा ग्रंथ त्यांचा. ‘ओल्ड लॅम्प फॉर द न्यू’ आणि ‘न्यू डायमेन्शन्स’ (दोन्ही इंग्रजीतील समीक्षा) हे त्यांचे आतापर्यंतचे योगदान आहे.
१९७३ >आधुनिक मराठी कथेचे प्रवर्तक ठरलेले कथाकार दिवाकर कृष्ण यांचे निधन. १९२२ साली ‘मासिक मनोरंजन’मध्ये ‘अंगणातील पोपट’ ही त्यांची पहिली कथा आली. समाधी आणि इतर गोष्टी, रूपगर्विता आणि इतर गोष्टी, महाराणी व इतर कथा, हे त्यांचे कथासंग्रह गाजले.
संजय वझरेकर
वॉर अँड पीस मनोविकार : भाग ६ / खुळचटपणा
मी जेव्हा १९७० – ७२ साली वैद्यकीय व्यवसाय सुरू केला तेव्हा मी पाहिलेले रुग्णांचे जग छोटे होते. काही ठराविक रोगांकरिता घरातील मोठी मंडळी आपल्या मुलामुलींना घेऊन माझ्याकडे येत. त्या काळात औषधी योजना सोपी होती. विविध वनस्पतींच्या काढापुडय़ा, एखाददुसऱ्या प्रकारच्या गोळ्या, अंगाला लावायला बलदायी तेल अशी सर्वसाधारण योजना असे. तेवढय़ाशा औषधांनीही त्या पेशंटना बरे वाटायचे. आता ४०-४५वर्षांनंतर वैद्यकीय जग खूपच बदलले आहे. गरीब-श्रीमंत, खेडय़ातले वा शहरातले नागरिक, कामकरी वा बडे भांडवलदार या सगळ्यांचेच आयुष्य वेगवान झाले आहे. कोणालाच थांबायला वेळ नाही. प्रत्येकाला पुढेच जायचे आहे. अशा वेळी आपल्या घरातले एखादे बालक थोडे कमी बुद्धीचे, मंदगती, कमी समज असलेले लक्षात आले; तर आईवडिलांची भंबेरी उडते. त्या मुलाला खुळचट, अडाणी, बुद्धू, निर्बुद्ध, वेडा अशी लेबले लावून जवळपासच्या सायकॅट्रिक तज्ज्ञांकडे नेले जाते. ही थोर ज्ञानी मंडळी त्यांच्या हिशेबाने काही ब्रेन टॉनिके देतात. पण फारसा उपयोग न होता पैशापरी पैसे जातात. तुमच्या आमच्या दृष्टीने ही मुले बावळट व आई-वडिलांना बोजा होऊन बसतात. गेली काही वर्षे महिन्यापंधरा दिवसांनी असा एक तरी रुग्ण घेऊन आई-वडील माझ्याकडे येतात. मोठय़ा फायली दाखवतात. ‘कसेही करून या खुळ्याला ठीक करा, आत्ताच हा असा मग पुढे याचे कसे होणार’ असे म्हणून मला चॅलेंज देतात. ही मुले लाळ गाळत असतात; भकास बघतात; उच्चार अस्पष्ट असतात. यांची भूक खूप नसते. हा हा करून हासतात. या मुलांकरिता मी सारस्वतारिष्ट, ब्राह्मीवटी व अंगाला लावण्याकरिता शतावरी तेल एवढीच योजना करतो. पालकांनी नेट लावून त्या ‘खुळ्या’ मुलाला वेखंडगंध चाटवले तर सामान्यपणे तीन महिन्यात ही मुले सुधारतात. अशा मुलांना मी मुगाचे लाडू, प्लॅस्टिक बॉल देऊन विश्वासात घेतो. त्याचा उपयोग होतो. पालकांनो, अशा मुलांना हिडीसफिडीस करू नका, ही प्रार्थना!
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
जे देखे रवी.. वेद प्रतिपाद्या
हा ज्ञानेश्वरीतला दुसरा शब्द. वेद हा शब्द विद या धातूपासून आला आहे. विद्वान, विद्वत्ता, विद्या (आणि अविद्या), वेदना (आणि संवेदना) आणि इंग्रजीतले Video आणि Vision या सगळ्या शब्दांचा हा विद खापर पणजोबा. कळणे, आकलन होणे असा याचा गोळाबेरीज अर्थ आहे. कारण Video आणि Vision या क्रिया कळण्याशी संबंधित आहेत. प्रतिपाद्यामधला प्रति, प्रतिपक्ष किंवा प्रतिवादमधला ‘प्रति’ नाही. ‘आपल्या प्रति आमच्या भावना’ असा प्रयोग होतो त्यामध्ये ‘आपल्याबद्दल’ असा अर्थ असतो तसा हा प्रति आहे. पाद्यामध्ये पद हा मूळ शब्द आहे. पद म्हणजे शब्द असा साधारण अर्थ म्हणता येईल. प्रतिपादन म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचे मत किंवा विचार किंवा स्पष्टीकरण. हे प्रतिपादन आद्याबद्दल आहे आणि ते वेदामध्ये आहे, म्हणून वेद प्रतिपाद्या असा हा वेद प्रतिपाद्याचा शाब्दिक कीस आहे. पण खरी गोम वेगळीच आहे. हे फक्त प्रतिपादन आहे, अंतिम शब्द, निर्णय, सत्य नव्हे असे वेद स्वत:च कबूल करतात.
जिथे तर्क संपतो, वेदांची मती कुंठीत होते असले काही तरी हे आद्या प्रकरण आहे. मधमाश्यांच्या पोळ्यातल्या कामगार माशीला ती पोळ्याचा भाग असून पोळ्याचे स्वरूप कळत नाही किंवा आईच्या पोटातल्या बाळाला आईचे वय माहीत नसते किंवा जसे स्वत:च्या पाठीवर स्वत:ला चालता येत नाही (हा दृष्टांत ज्ञानेश्वरांचा) तसा हा आद्या आहे.
भारतातच (मध्यपूर्व आशियाचे सोडा) अशी तीन निरनिराळी प्रतिपादने आहेत. जैन म्हणतात, हे विश्व घडलेले नाही. ते कायम अस्तित्त्वात होते, आहे आणि राहील. इंग्लंडमधले हॉइल आणि आपले नारळीकर यांचेही असेच काही तरी म्हणणे आहे. गौतम बुद्धाने या ‘आद्या’विषयी विचार करणे अनावश्यक आहे. बुद्धिभेदापलीकडे त्यातून काही निष्पन्न होणार नाही, असे प्रतिपादन केले आहे. चार्वाक तर म्हणतात, जे दिसते, अनुभवाला येते तेच खरे, बाकी सगळे दिशाभूल करण्याचे प्रयत्न आहेत. ही दिशाभूल माणसाला लौकिक सुखापासून वंचित करते. या तिघांना नास्तिक असे संबोधन आहे. वेद मानतात ते आस्तिक, नाही मानत ते नास्तिक. नास्तिक ही शिवी नाही. किंबहुना, आस्तिक आणि नास्तिक या शब्दांचा देव या कल्पनेशी सुतराम संबंध नाही. मुळात उपनिषदांमध्ये देव या गोष्टीची सुसंगत व्याख्या मला तरी सापडली नाही. ‘हीच ती जागा जिथून चार किंवा सहा हातांचे देव बाहेर पडतात,’ अशी ज्ञानेश्वरांची ओवी आहे. त्यात माझ्यासारख्या हीन माणसाला उपहास केल्याचा भास होतो. पण माणूस जातीला देव या कल्पनेने घेरले आहे हे नक्की. आस्तिक असोत वा नास्तिक, भगवान विष्णू, भगवान बुद्ध किंवा भगवान महावीर असेच वाक्प्रचार रूढ आहेत. त्यातल्या त्यात चार्वाकी बरे. ते टिकले असते तर मॉल संस्कृतीने ते मोठे सुखावले असते.
रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 31st May 2013 रोजी प्रकाशित
कुतूहल : जनावरांची देखभाल
जनावरे माणसाला अखाद्य असलेले वनस्पती उपपदार्थ खाऊन त्याला प्रथिनयुक्त, सुलभरीत्या पचन होणारे दूध, मांस असे पदार्थ परत देतात. तसेच इतर बाबी जसे खते, औषधे, सुशोभित वस्तू, चामडे इत्यादीही देतात. त्यामुळे जनावरांची देखभाल करणे अत्यंत महत्त्वाचे असते.
First published on: 31-05-2013 at 12:49 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to look after livestock