आपली सर्व ज्ञानेंद्रियं एकमेकांना मदत करत असतात, हे आपल्याला माहीत आहेच. आपण नेहमीच बघतो की, पंचेंद्रियांपैकी एक इंद्रिय काम करेनासं झालं तर इतर सर्व इंद्रियं त्यांना मदत करतात. अंध व्यक्तींचे कान अतिशय दक्ष असतात. आसपासच्या परिसराचा योग्य कानोसा घेण्याचं काम त्यांची कर्णेद्रियं करत असतात. मेंदू स्वत:च्या अस्तित्वाला समतोल स्थितीत ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. आजारी पडल्यावरसुद्धा विनाऔषध शरीराला बरं करण्याचा प्रयत्न (हीलिंग) चालू असतो.

एका माणसाच्या मेंदूत डावीकडे टय़ूमर झालेला होता. त्यामुळे त्या माणसाच्या भाषेवर परिणाम झालेला होता. कारण भाषेची क्षेत्रं ही मेंदूच्या डाव्या भागामध्ये असतात. मात्र, त्याच वेळी मेंदूशास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगांमध्ये असं दिसून आलं, की उजव्या अर्धगोलातल्या काही भागांनी त्या माणसाला मदत करायला सुरुवात केली आणि त्या माणसाला विविध प्रकार वापरून बोलता कसं करता येईल, हे बघितलं. यासाठी नजर, हावभाव, हातवारे यांची मदत झाली. संबंधित अवयवांनी ही मदत केली.

एखाद्या परभाषिक माणसाला आपली भाषा समजत नाही हे लक्षात येतं, त्याक्षणी मेंदू कामाला लागतो. समोरच्या माणसाला संदेश द्यायचा आहे, हा निरोप मेंदूपर्यंत जाताच तो संपूर्ण शरीराला संदेशवहनाच्या कामाला लावतो.

फॉक्स नावाच्या एका मेंदूशास्त्रज्ञाच्या अभ्यासामध्ये असं दिसून आलं की, जर एखाद्या माणसाचं एखादं बोट काम करेनासं झालं, तर इतर बोटांमधले ज्ञानतंतू त्याचं काम अंगावर घेतात आणि वेळच्या वेळेवर मेंदूकडे आवश्यक ते सर्व संदेश जातील असं बघतात. या विषयावर आणखी संशोधन चालू आहे. ज्याप्रमाणे त्वचा एखादी जखम बरी करण्याचं काम करते आणि हळूहळू त्वचेचा नवीन स्तर निर्माण होतो, त्याप्रमाणे न्यूरॉन्स नव्याने निर्माण होतात का/ होतील का, एका क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले न्यूरॉन्स दुसरं क्षेत्र निकामी झाल्यास तिथं जाऊन काम करू शकतात का, या विषयावर संशोधन चालू आहे. हे संशोधन यशस्वी झालं, तर एखादं ज्ञानेंद्रिय काम करेनासं झाल्यास त्याठिकाणी आवश्यक ती औषधयोजना करून त्या ठिकाणचे न्यूरॉन्स दुसरीकडे जाऊन काम करतील का, यावर विचार चालू आहे.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com