डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

प्रत्येकाच्या अभ्यासाची पद्धत वेगळी असते. आपली अभ्यासाची पद्धत कोणती आहे?

– काही जण एकांतात अभ्यास करतात. त्यांनी मनातल्या मनात वाचलेलं त्यांच्या लक्षात राहतं. हे लोक कितीही वेळ एका जागेवर बसून एकाग्रतेने अभ्यास करू शकतात. त्यांना कोणत्याही प्रकारे आवाजाचा व्यत्यय सहन होत नाही.

– काही जणांना मित्रमत्रिणींबरोबर, मोठय़ा आवाजात वाचल्यावर लक्षात राहतं; गाणी लावून, टीव्हीसमोर अभ्यास होतो.

– काहींचा एका जागेवर बसून अभ्यास होत नाही. दर दहा-पंधरा मिनिटांनी हालचाल करावीच लागते.

अशा प्रकारे प्रत्येकाची अभ्यास करण्याची शैली वेगवेगळी असते. शिकलेलं समजून घेण्याची, लक्षात ठेवण्याची पद्धत वेगळी असते. आपण मात्र सर्व मुलांना एकाच पद्धतीनं शिकवतो. एकाच पद्धतीनं, एकाच वेळेस अभ्यास करायला सांगतो. साधारणत: चौथी-पाचवीच्या टप्प्यापर्यंत मुलांची अभ्यासाची नैसर्गिक शैली कोणती आहे, हे समजून येतं. आपण त्याची अशी पद्धत शोधून त्याला मदत करायला हवी. शिक्षणशास्त्रात याला ‘लर्निग स्टाइल्स’ असं संबोधलं जातं. आपल्या स्वत:च्या किंवा आपण त्यांना सुचवत असलेल्या पद्धतीपेक्षा मुलांची पद्धत वेगळी असू शकते. एकदा का अभ्यासाची पद्धत त्यांना सापडली, की अभ्यासाचा लवकर कंटाळा येणार नाही.

परंतु हे लक्षात न घेता मुलं आपली एकाच पद्धतीनं शिकत असतात. आपला अभ्यास कशा पद्धतीनं केला तर लक्षात राहतं, हे आपण स्वत:च बघायचं असतं. आपली पद्धत आपणच जाणीवपूर्वक तपासायला हवी. कारण प्रत्येकाच्या मेंदूची गरज आणि भूक या बाबतीत वेगवेगळी असते.

साधारणपणे आठवी-नववीपर्यंत कोणत्या पद्धतीनं अभ्यास करायचा, हे मुलं आपणहूनच ठरवतात. मात्र, त्याही आधी प्राथमिक वर्गात शिकत असतानाच त्यांना शिक्षक किंवा पालकांनी मदत केली, तर त्यांना अभ्यासाची त्यांची पद्धत सापडू शकेल. ही शैली ओळखून त्यांना त्यांच्या नैसर्गिक शैलीत शिकण्याची, समजून सांगण्याची किंवा अगदी पाठ करण्याची संधी दिली पाहिजे. त्यासाठी मदत केली पाहिजे.