26 September 2020

News Flash

मनमोराचा पिसारा.. तेरा मेरा प्यार अमर

मनमोराचा पिसारा.. तेरा मेरा प्यार अमर मित्रा, प्यारका जादू देखना हैं? तो मेरे साथ बैठ और यू-टय़ूब पे टाइप कर, ‘तेरा मेरा प्यार अमर’, ‘असली नकली’,

| December 12, 2012 12:45 pm

मनमोराचा पिसारा.. तेरा मेरा प्यार अमर
मित्रा, प्यारका जादू देखना हैं? तो मेरे साथ बैठ और यू-टय़ूब पे टाइप कर, ‘तेरा मेरा प्यार अमर’, ‘असली नकली’, साधना, देव आनंद, शंकर जयकिशन. काही क्षणांत त्या छोटय़ा स्क्रीनवर प्रेमाचं जाळं विणणारी भावविभोर डोळ्यानं चंद्राकडे पाहणारी, स्वत:शी किंचित स्मित करीत गाणं म्हणणारी साधना दिसेल. विसरून जाशील रे, अलम दुनिया, प्रेमात पडशील. त्या प्रतिमेच्या प्रेमाची ही हुरहुर लावणारी कहाणी पाहण्यासाठी यश चोप्रा आणि कंपनीतर्फे स्वित्र्झलडला जायला नको. टय़ुलिपच्या रंगीबेरंगी ताटव्यांतून गाणी म्हणायला नकोत. झकपक कपडे घालून, एकमेकांच्या मिठीत हरवलेले चेहरे नकोत. यातला कोणताही देखावा नको, डामडौल नको. कसलीही बोलबच्चनगिरी नि आतषबाजी नको. हे सगळं कृत्रिम वाटतं. आपल्याला हवी फक्त साध्यासुध्या वेशातली गोड प्रतिमा. कसलाही आव नको, सौंदर्याचाही नको.
या गाण्यातली साधना शिवदासानी म्हणजे खास करून (मराठी) पुरुष मनाच्या दिलकी धडकन. काठपदराची सुती साडी. किंचित लांब बाह्य़ांचं ब्लाऊज. साधनाच्या साडीवर साध्या बुट्टय़ांचं डिझाइन असतं, तिने कानात मध्यम आकाराच्या रिंगा, गळ्यात सोन्याची चेन घातलेली असते. कपाळावर किंचित मोठं कुंकू, मानेवर रूळणारा सैलसर आंबाडा आणि त्यावर मोगरीचा (वाटावा असा) गजरा घातलेला असतो. मला वाटतं, साठच्या दशकातल्या स्त्रीसौंदर्याच्या कल्पना साधना परिपूर्ण करते. फक्त ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट जमान्यातच की अजूनही?
गाण्यासाठी हृषिदांनी स्टुडिओत गिरणगावातल्या एखाद्या चाळीच्या गच्चीचा सेट मांडलेला होता. कौलारू छपरं, बांबूच्या कमानी, पाण्याच्या टाक्या हे सगळं खोटं आहे, हे पाहताच कळतं. पण त्यामुळे काही फरक पडत नाही. साधना मेक्स एवरीथिंग रिअल. गाण्याच्या सुरुवातीला ती चंद्राकडे पाहते आणि संपतानाही. तिच्या डोळ्यांत आनंद, हुरहुर सगळं दिसतं. असं वाटतं की हे गाणं ती देव आनंदला उद्देशून म्हणतेय की चंद्राला? की खूप जवळचा वाटणारा प्रियकर अखेर चंद्रासारखा दूरच राहतो. प्रेमामधली जवळीक म्हणजे नेमकं काय? प्रेमातली बांधीलकी ही संकल्पना की सत्य? एकमेकांना घातलेल्या शपथा, दिलेली वचनं खरीचना. कधी कधी जवळकीच्या एहसासानं, त्या अनुभवाने सुखावतं पण ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ हे प्रेमाच्या बाबतीत विशेष खरं असतं. न जाणो, या सुखाच्या दिवसांना दृष्ट तर लागणार नाही ना? दोघांमध्ये समज-गैरसमजाचं वादळ तर उसळणार नाही ना? या विचारानं तिचं मन कातरतं. ‘चलती हूँ मैं तारों पर, फिर क्यू मुझको लगता हैं डर?’ खऱ्याखुऱ्या अस्सल प्रेमाच्या व्यथा गाण्याच्या शब्दांतून आणि साधनाच्या असण्या-दिसण्यातून व्यक्त होतात. हृषिकेश मुखर्जीनी प्रेमाचं हे म्हटलं तर लोभस म्हटलं तर बोचरं रूप बहारदारपणे पेश केलंय. गाण्याची हीरॉइन साधना आणि तिचं मोहक रूप. फक्त साधना, साधना नि साधना. मित्रा, साधनानं ‘लव इन सिमला’मध्ये प्रसिद्ध ‘साधना कट’ केला आणि आजही कपाळावर झुलणाऱ्या ‘फ्रिल’ला ‘साधना कट’ म्हणतात. तिनं ‘वक्त’मध्ये प्रथम ‘भानु अथय्यां’च्या मदतीने घट्ट कमीझ आणि चुडीदार फॅशन पेहेनली आणि आजही साधनाचे ‘आरजू’, ‘मेरे मेहेबूब’ आणि ‘वक्त’मधले कॉश्च्यूम आकर्षक वाटतात. शी वॉज अ ट्रेंड सेटर.. वी लव यू साधना.. अपना प्यार खरंच अमर आहे..
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabarve@gmail.com

कुतूहल : सर्कशीतले अपघात
सर्कशीत राहणारी १००-२०० माणसे, ५०-१०० प्राणी, जेवणा-खाण्याचे सामान, स्वयंपाक करण्याची भांडी-कुंडी व गॅस सिलेंडर्स, लोकांचे कपडे व इतर सामान, तंबू व लाकडी फळ्या अशा नाना प्रकारच्या सामानामुळे सर्कशीला अवाढव्य स्वरूप प्राप्त होते. हे सर्व सांभाळणे ही व्यवस्थापनाच्या कौशल्याची तारेवरची कसरत असते. पण हे सामान एका गावाहून दुसरीकडे हलवताना फार काळजी घ्यावी लागते. कारणया वस्तू अवजड असतात आणि त्यांचे आकारमानही मोठे असते. शिवाय या गोष्टी उचलून ट्रकमध्ये ठेवण्यासाठी क्रेनसारखी साधने सर्कसच्या व्यवस्थापनाला परवडत नसल्याने सर्कशीत काम करणाऱ्या लोकांनाच ही कामेही करावी लागतात. त्यामुळे त्यांची हलवाहलव करताना त्या वस्तूंना धक्का लागणार नाही हे पाहणे जसे महत्त्वाचे असते तसेच त्याच्यामुळे सर्कशीतील माणसे जखमी होणार नाहीत हेही पाहावे लागते. कोणाला लागल्यास सर्कसबरोबर असणाऱ्या एखाद्या माणसाला, ज्याला थोडे फार वैद्यकीय ज्ञान आहे, त्याच्यावर माणसे आणि जनावरे यांना अवलंबून राहावे लागते. एखादा शिकलेला डॉक्टर माणसांसाठी आणि जनावरांसाठी सर्कसबरोबर बाळगणे व्यवस्थापनाला परवडत नाही. वस्तुत: सरकार असे नियम करून मोकळे होते, पण व्यवस्थापनाला ते परवडले तर पाहिजे ना! सर्कशीत मृत्युगोल, उंचावरूनच्या उडय़ा, प्राण्यांबरोबरचे खेळ अशा धोक्याच्या नाना गोष्टी होत असतात. यात काम करणाऱ्यांना कितीही प्रशिक्षण दिलेले असले तरी छोटे-मोठे अपघात होतच राहतात. अशा अपघातात माणसांकडून होणाऱ्या चुका, खेळाच्या सामानाने दिलेल्या दग्यामुळे घडणारे अपघात, प्राण्यांनी सहकार न दिल्यामुळे घडणारे अपघात अशा अनेक प्रकारच्या गोष्टी मोडतात. याची तयारी व्यवस्थापनाला ठेवावीच लागते आणि ते काम वैद्यकीय थोडेसे ज्ञान असणाऱ्या  माणसाला निभावून न्यावे लागते. फारच मोठा प्रसंग गुदरला तर ज्या गावात सर्कसचा मुक्काम असेल तेथील डॉक्टर किंवा रुग्णालयावर भिस्त ठेवावी लागते. हवा-पाणी बदलामुळे एरवीही सर्कशीतील माणसे आजारी पडणे हे सर्कस व्यवस्थापनाला नवीन नाही आणि त्यावरचे इलाज हे घरगुती पद्धतीने करत राहतात.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,
मुंबई २२  
office@mavipamumbai.org

सफर काल-पर्वाची : ३. शंभर वर्षांचे युद्ध
फ्रान्समधील राजघराण्याच्या वारसाहक्कावरून इंग्लंड व फ्रान्सच्या राजांमध्ये सन १३३७ मध्ये सुरू झालेल्या युद्धातून उद्भवलेल्या प्रश्नांमुळे लढाया काही काळ बंद राहात असत. फ्रान्समधील बरगंडी राज्यप्रमुख हे इंग्लंडला पाठिंबा देत. त्यांच्यात व फ्रान्सच्या राजाचे समर्थक यात सतत झगडे होत असत. बरगंडीच्या जॉनने इंग्लंडची या प्रश्नी लष्करी मदत मागितली. त्यांना मदत पाठविण्याऐवजी इंग्लंडच्या हेन्री सहावा याने चलाखीने चढाई करून इंग्लिश खाडी ओलांडून आपले लष्कर फ्रान्समध्ये घुसविले. इ. स. १४१६ ते १४१९ या काळात इंग्लंडने संपूर्ण नरमडी प्रांतावर आपला कब्जा बसविला. अनेक प्रतिहल्ले करूनही फ्रान्सला यश मिळत नव्हते. शेवटी फ्रान्सच्या पराभूत चार्ल्सने इंग्लंडच्या हेन्रीबरोबर तह केला. हेन्रीने तहात घातलेल्या विचित्र अटी चार्ल्सला मान्य कराव्या लागल्या.
इ.स. १४२० साली झालेल्या या तहात असे ठरले की, चार्ल्सच्या मुलीशी म्हणजेच फ्रान्सच्या राजकन्येशी हेन्रीने लग्न करावयाचे व त्या संबंधातून होणाऱ्या संततीला फ्रान्सचे राजेपद द्यावयाचे. याचा अर्थ असा की त्या वारसाला इंग्लंड आणि फ्रान्सचे राजेपद मिळावे. त्या बदल्यात इंग्लंडने आक्रमणे बंद करावीत. या तहाला फ्रेंच सरदारांच्या व अधिकाऱ्यांचा विरोध असूनही चार्ल्सने तो मान्य केला.
तहाप्रमाणे हेन्रीने राजकन्येशी लग्न केले. १४२२ साली हेन्रीचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर गादीवर आलेल्या हेन्री सहावा हा तहात ठरल्याप्रमाणे इंग्लंडचा व फ्रान्सचा राजा होऊन पुढे त्याच्याच घराण्याकडे राज्यपदाचा वारसा येणार होता. परंतु हा बदल फ्रेंच दरबारातल्या लोकांना मान्य नसल्याने फ्रेंच लष्कराने परत इंग्लंडशी युद्ध सुरू केले. बरगंडी या पूर्व फ्रान्समधील राज्याचा इंग्लंडच्या राजाला पाठिंबा होताच.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com

इतिहासात आज दिनांक.. १२ डिसेंबर
१८९३ भारतीय समाजशास्त्रीय अभ्यासाचे आद्य प्रवर्तक गोविंद सदाशिव घुर्ये यांचा रत्नागिरी जिल्ह्य़ातील मालवण गावी जन्म झाला. उच्च शिक्षणासाठी त्यांनी मुंबईला प्रयाण केले. १९१८ मध्ये एम. ए. चे शिक्षण पूर्ण झाल्यावर प्राध्यापक या नात्याने त्यांनी कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. इंग्लंडमधील  केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेण्याची संधी मिळाली. तेथून पीएच. डी. पूर्ण केली. समाजशास्त्र आणि मानवशास्त्र या विषयांमध्ये त्यांना विलक्षण गती होती. मुंबई विद्यापीठात अध्यापन करीत असतानाच त्यांनी भरीव स्वरूपाचे लेखन केले. त्यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे ‘कास्ट अ‍ॅन्ड रेस इन इंडिया’, अ‍ॅबॉरिजिन्स सो कॉल्ड अ‍ॅण्ड देअर फ्युचर, इंडियन कॉस्च्यूम, इंडियन साधूज, फॅमिली अँड किन इन इंडो-युरोपियन कल्चर, रिलिजस कॉन्शसनेस, सोशल टेन्शन्स इन इंडिया. त्यांनी ‘इंडियन सोशिऑलॉजिकल’ सोसायटीची स्थापना करून समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. भारतातील विद्यापीठ स्तरावर समाजशास्त्र या विषयाचे महत्त्व प्रस्थापित करणे, त्यात संशोधन-लेखन करणे याला घुर्ये यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. आपल्या लेखनातून त्यांनी आजवर दुर्लक्षित राहिलेल्या एका अभ्यास विषयावर प्रकाश टाकला.
१९६३ केन्याटांच्या नेतृत्वाखाली केनिया देश प्राजासत्ताक झाला.
१९८८ तामिळनाडूच्या राज्यपालांनी राखीव जागांची मागणी मान्य करून वन्नियारांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.
डॉ. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 12:45 pm

Web Title: navneet 28
Next Stories
1 मनमोराचा पिसारा.. कंट्री रोड्स टेक मी होम..
2 कुतूहल- सर्कशीतील सामानाची वाहतूक
3 कुतूहल : सर्कशीतील प्राण्यांचे खेळ
Just Now!
X